Home /News /lifestyle /

Toycathon 2021: मुलांच्या खेळण्यांतून भारतीय संस्कृती जगभरात पोहोचवण्यासाठी मोदी सरकारची नवी कल्पना

Toycathon 2021: मुलांच्या खेळण्यांतून भारतीय संस्कृती जगभरात पोहोचवण्यासाठी मोदी सरकारची नवी कल्पना

भारतातील खेळण्यांच्या बाजारपेठेचं मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे, पण दुर्दैवाने 80% खेळणी आयात केली जातात. म्हणूनच मोदी सरकारने भारतीय खेळांच्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी टॉयकथॉन आयोजित केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या घोषणेचा हा भाग आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 19 जानेवारी: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh pokhriayal nishank) आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आज संयुक्तपणे टॉयकॅथॉन - 2021 चे (Toycathon 2021) उदघाटन केलं. भारताला, जागतिक खेळण्यांचं उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉन आयोजित केलं जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी संयुक्तपणे टॉयकॅथॉन पोर्टलचे लोकार्पण देखील केलं. लहान मुलांच्या खेळण्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पोहचवण्याच्या उद्देशाने आणि देशी खेळण्यांना चालना देत हा उद्योग पुढे नेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही नवी संकल्पना सुरू केली आहे. भारतीय संस्कृती आणि मूलभूत प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळण्यांची संकल्पना हे या टॉयकॅथॉनचं उद्दीष्ट असून ते मुलांमध्ये सकारात्मक वर्तन आणि चांगल्या मूल्यांची रुजवण करेल, अशी अपेक्षा रमेश पोखरियाल यांनी व्यक्त केली. भारतातील खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे परंतु दुर्दैवाने 80% खेळणी आयात केली जातात. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा धांडोळा घेऊन त्यांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी वातावरण तयार करण्याचा टॉयकॅथॉन सुरु करण्यामागचा सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती यावेळी पोखरियाल यांनी दिली. देशाला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवून स्वदेशी खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांनी नमूद केले. शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने देशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितले. टॉयकॅथॉन - 2021 विषयी हे एक खास प्रकारचे हॅकेथॉन आहे जिथे शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी आणि शिक्षक, डिझाइन तज्ज्ञ, खेळणी तज्ज्ञ आणि स्टार्टअप्स, भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यावर आधारित खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करतील. टॉयकॅथॉन 2021 मधील सहभागासाठी  https://toycathon.mic.gov.in वर भेट द्या, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे. यासंबंधीचे प्रस्ताव 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन सादर करता येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
    First published:

    Tags: Games

    पुढील बातम्या