मुंबई, 21 मार्च : हृदयविकारांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सर्व वयोगटातील महिला व पुरुषांना हा त्रास भेडसावत आहे. तरुण स्त्रिया काम आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा तणाव मॅनेज करू शकत नाहीत. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पुरेसा व्यायाम न करणं आणि लठ्ठपणा ही महिलांमध्ये हृदयविकाराची इतर प्रमुख कारणं आहेत. जे तंदुरुस्त दिसतात, त्यांनीही याबाबत खबरदारी घ्यावी. बऱ्याच जणांना अनुवांशिक कारणांनी अॅटॅक येऊ शकतो. यासंदर्भात 'हिंदुस्थान टाइम्स'ने वृत्त दिलंय.
स्त्रियांच्या हार्ट हेल्थबद्दल अनेक मिथकं आहेत, ज्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट कार्डिअॅक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी स्त्रियांच्या हार्ट अॅटॅकबद्दलच्या अशाच गैरसमजांची उत्तरं दिली आहेत. ती जाणून घेऊयात.
"सध्या हार्ट अॅटॅक, कार्डिअॅक फेल्युअर आणि कोरोनरी आर्टरी डिसिजचं प्रमाण महिलांच्या बाबतीत प्रचंड वेगाने वाढत आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुण स्त्रियांनाही हृदयविकाराचा त्रास होत असल्याचं निदान होत आहे. तणाव, उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची उच्च पातळी, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे महिला आणि पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. बऱ्याच महिलांना याचा त्रास होतो. त्यामुळे हृदयाच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या सभोवतालचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे," असं डॉ. भामरे म्हणतात.
हार्ट अटॅक आणि मेनोपॉज दोन्हींमध्ये दिसतात 'ही' लक्षणं! ओळखण्यात करू नका चूक
गैरसमज: हृदयविकार फक्त पुरुषांमध्येच दिसून येतात
फॅक्ट: महिलांना फक्त ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो, त्यामुळे त्यांनी त्याची चिंता करावी, पण हार्ट अॅटॅकची नाही, असं म्हटलं जातं. पण हे खोटं आहे. हृदयविकारामुळे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लवकर येणारा मेनोपॉज आणि संधिवात असलेल्या स्त्रियांना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय, ज्या स्त्रियांना प्रीक्लेम्पसिया होतो, त्यांनी जास्त खबरदारी घ्यावी.
गैरसमज: हार्ट फेल्युअर हृदयाचे ठोके थांबले आहेत, हे दर्शवते
फॅक्ट: हार्ट फेल्युअर आणि कार्डिअॅक अरेस्ट याबाबत अनेकदा गोंधळ होतो. कार्डिअॅक अरेस्ट होतं तेव्हा हृदय रक्त पंप करणं थांबवतं. हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय अपेक्षेप्रमाणे कार्य करू शकत नाही. त्यामुळे, एखाद्याला दम लागणं, घोट्यात किंवा पायांना सूज येणं आणि झोप न येणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. हार्ट फेल्युअर आणि कार्डिअॅक अरेस्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा.
गैरसमज: एखाद्या महिलेचं हृदय वेगाने धडधडत असल्यास हार्ट अॅटॅक येऊ शकतो
फॅक्ट: जास्त व्यायाम आणि कॅफीन घेतल्यावरही हृदयाची गती म्हणजेच हार्टबीट वाढते. जोपर्यंत ते वारंवार होत नाही आणि तुमच्या हृदयावर त्याचा परिणाम होत नाही तोपर्यंत चिंता करू नका. पण नंतर मात्र तुम्हाला हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल आणि वेळीच त्याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
गैरसमज: पाय दुखणं आणि हृदयाची समस्या यांचा काहीही संबंध नाही
फॅक्ट: पायांच्या स्नायूंमध्ये वेदना या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार झाला आहे, हे सूचित करू शकतात आणि त्यामुळे एखाद्याला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका असतो. त्यामुळे पाय दुखण्याकडे दुर्लक्ष करणं टाळा आणि डॉक्टरांच्या मदतीने त्यामागील मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
गैरसमज: जेव्हा डायबेटिस असणारी एखादी व्यक्ती डॉक्टरांनी शिफारस केलेली औषधे घेते तेव्हा त्याचा हृदयावर परिणाम होत नाही.
फॅक्ट: एखाद्याचे ब्लड शुगर नियंत्रणात असले तरीही, मधुमेह असलेल्या कोणालाही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आढळून येण्याची शक्यता असते. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान टाळा, वजन मेंटेन करा, व्यायाम करा आणि सकस आहार घ्या.
गैरसमज: हृदयाच्या समस्या केवळ वृद्ध महिलांमध्येच दिसून येतात
फॅक्ट: तणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा यांमुळे तरुण स्त्रियांनाही हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हृदयाच्या समस्या केवळ वृद्ध महिलांनाच होतात, हा गैरसमज आहे. अनेक तरुण महिलांनाही या समस्या जाणवतात.
गैरसमज: तंदुरुस्त आणि निरोगी महिलांवर हृदयविकाराचा परिणाम होत नाही.
फॅक्ट: तुम्ही तंदुरुस्त असलात तरीही, खाण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान, हाय ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलची पातळी आणि हृदयाच्या विकारांचा कौटुंबिक इतिहास यासारखे काही घटक हृदयविकाराला आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी सुचविल्यानुसार नियमित हृदय तपासणी करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack