Home /News /lifestyle /

गंभीर आजाराशी दोनहात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली टोमॅटोची नवी जात

गंभीर आजाराशी दोनहात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली टोमॅटोची नवी जात

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जनुकीय सुधारणा (Genetic Modification) तंत्राच्या साह्याने टोमॅटोची एक खास जात विकसित केली आहे.

ब्रिटन, 12 डिसेंबर  : पार्किन्सन्स (Parkinson’s Disease) अर्थात कंपवात हा विकार विकसनशील देशांमध्ये वाढत चालला असून, त्याचे परिणाम भयंकर असतात. त्यात शरीराच्या काही भागांना कंप सुटतो आणि नंतर संपूर्ण शरीराचं संतुलन बिघडत जातं. एल-डीओपीए (L-DOPA) हा घटक पार्किन्सन्सच्या औषधयोजनेत अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र ते औषध नियमितपणे घेणं रुग्णांना आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. म्हणूनच हा घटक पार्किन्सन्सच्या रुग्णांना कमी खर्चात आणि सहज उपलब्ध व्हावा, यासाठी ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जनुकीय सुधारणा (Genetic Modification) तंत्राच्या साह्याने टोमॅटोची एक खास जात विकसित केली आहे. त्या टोमॅटोपासून L-DOPA हा घटक नैसर्गिक माध्यमातून सुलभपणे उपलब्ध होणार असल्याने औषधाच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते. ‘सायन्स डेली’च्या हवाल्याने ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधल्या जॉन इनस सेंटरमधल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. पार्किन्सन्सची सुरुवातीची लक्षणं सहज लक्षात येत नाहीत. ती हळूहळू वाढत जातात. संबंधित व्यक्तीच्या अंगाला कंप सुटतो. त्याची सुरुवात बोटं, हातांपासून होते आणि मग ही लक्षणं शरीरभर दिसू लागतात. शरीराचा लवचिकपणा संपतो, संबंधित व्यक्तीला चालण्यास, हालचालींना त्रास होतो, त्यामुळे शरीराच्या संतुलनाची समस्या निर्माण होते. हे वाचा - तुमच्यामध्ये iodine ची कमी तर नाही ना? शरीर देतंय 5 संकेत L-DOPA हा पार्किन्सन्सवरच्या औषधांमधला प्रमुख घटक असतो. तो घटक असलेली टोमॅटोची जात विकसित करण्याच्या शास्त्रज्ञांच्या चमूचा भाग असलेल्या डॉ. कॅथी मार्टिन (Cathy Martin) यांच्या म्हणण्यानुसार, हा विकार विकसनशील (Developmental) देशांमध्ये अधिक प्रमाणात आढळत असून, नियमित औषधांचा खर्च पेलणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणूनच हे नवं संशोधन उपयुक्त ठरू शकेल. L-DOPA हा घटक पार्किन्सन्सच्या उपचारांत महत्त्वाचा आहे. कारण मेंदूमध्ये गेल्यावर त्याचं डोपामाइनमध्ये रूपांतर होतं. डोपामाइन (Dopamine) हा घटक रासायनिक संदेश वहनाचं (Neurotransmitter) काम करतो. पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींमध्ये डोपामाइनचं प्रमाण कमी झालेलं असतं. L-DOPA हा औषधी घटक सध्या मुख्यतः रासायनिक संश्लेषणातून (Chemical Synthesis) तयार केला जातो; पण अनेक फळांच्या बियांमध्येही तो असतो; मात्र बियांमधून तो घटक थेट काढता येत नाही. कारण त्यासोबत काही विषारी घटकही येतात. म्हणूनच टोमॅटोसारख्या, खाण्यासाठी सुरक्षित असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर पिकविल्या जाणाऱ्या पिकामध्ये हा घटक निर्माण करता आला, तर त्यातून तो घटक औषधासाठी बाहेर काढणं सोपं होऊ शकेल, या विचाराने शास्त्रज्ञांनी टोमॅटोची ही नवी जात विकसित केली आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोनाची लस घेतली आणि झालं HIV इन्फेक्शन? त्यात जनुकीय सुधारणा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक बाह्य जनुक (Gene) त्यात घातला आहे. या जातीच्या टोमॅटोचं विश्लेषण केल्यावर त्यात त्या घटकाचं प्रमाण वाढलं असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावर अधिक संशोधन आवश्यक असून, या टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड करून, त्यापासून औषधनिर्मिती करणं शक्य असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या जातीच्या टोमॅटोमध्ये L-DOPA या घटकासोबतच अमिनो अँसिड्स, अँटिऑक्सिडंट्स यांचंही प्रमाण जास्त असेल. तसंच या टोमॅटोची टिकवणक्षमताही जास्त असेल आणि पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य विकारांना प्रतिबंध करण्याची क्षमताही टोमॅटोच्या या जातीत असेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Tomato

पुढील बातम्या