मुंबई, 30 नोव्हेंबर : आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडासारखं जपतात. त्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. मुली तर घरात खूप लाडक्या असतात. मुलं कितीही मोठी झाली, तरीही आई-वडिलांना ती लहानच वाटतात, पण योग्य वयात पालकांनी मुलांशी मैत्री करून काही गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं असतं. त्यामुळे मुलं मोठेपणी उत्तम व्यक्ती होतात, यशस्वी होतात व त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो. खासकरून मुली मोठ्या होत असताना त्यांना काही गोष्टी पालकांनी सांगितल्या पाहिजेत.
मुलांना योग्य वयात योग्य गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत, तर मुलं चुकीच्या मार्गाला जावू शकतात. किशोरावस्थेत मुलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होतात. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत, तर ती चुकीच्या पद्धतीनं उत्तरं मिळवतात. त्यासाठी मुलांशी बोललं पाहिजे. मुली वयात आल्यावर त्या पालकांशी तुटक वागू शकतात. त्या काळात त्यांच्याशी संवाद साधून त्यांना बोलतं करणं गरजेचं असतं.
स्वावलंबी करा
लहानपणापासून पालक मुलांची सगळी कामं करतात. पण मोठं झाल्यावर मुलींना आपली कामं आपण करण्याची सवय पालकांनी लावली पाहिजे. स्वतःचा अभ्यास करण्यापासून ते स्वतःच्या गोष्टी सांभाळणं इथपर्यंत मुलींना स्वावलंबी केलं पाहिजे. यामुळे मुली स्वतःच्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहणार नाहीत. तसंच स्वतःची कामं स्वतः केल्यानं त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल.
सामाजिक शिष्टाचार शिकवा
मुली वयात येताना त्यांना समाजात कसं वावरावं हेही शिकवलं पाहिजे. मोठ्यांचा आदर राखणं, छोट्यांवर माया करणं व पाहुण्यांचा योग्य आदर करणं याबाबत मुलींना शिकवलं पाहिजे. समाजात वावरताना हॉटेल, शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी कसं योग्य पद्धतीनं वागायचं याबद्दल त्यांना सल्ला द्यावा.
वाचा - हे 8 गुण असलेली माणसं कधीच होत नाहीत दु:खी; काय सांगते विदुर नीति?
राग व्यक्त करण्याची पद्धत शिकवा
लहानपणी राग आल्यावर मुलं मोठ्यांना कसंही बोलतात, कधी छोट्याशा हातांनी मारतातही; पण मोठेपणी असं करून चालत नाही. मोठेपणी आपला राग कसा व्यक्त करावा, याबद्दल मुलांना व मुलींना योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दलची नाराजी किंवा असहमती कशी दर्शवावी, हे त्यांना शिकवलं पाहिजे. याचप्रमाणे चूक केल्यावर ती स्वीकारणंही शिकवलं पाहिजे.
पुस्तक वाचनाची सवय लावा
काही चांगले छंद मुलींच्या विकासात हातभार लावतात. त्यापैकीच एक म्हणजे पुस्तक वाचन. त्याची सवय मुलींना पहिल्यापासून लावा. मोठ्या झाल्यावर मुली पालकांशी मनमोकळ्या बोलत नाहीत. एकट्या राहतात. त्यावेळी पुस्तकं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे त्यांची समज वाढेल व वाचनानं आनंदही मिळेल. वयात आलेल्या मुलामुलींशी योग्य संवाद साधला, तर मुली स्मार्ट व समजूतदार होतील. त्यांच्या हुशारीबरोबरच त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mental health