नवी दिल्ली, 19 जानेवारी : डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश या आजाराचा धोका वयोवृद्ध लोकांना सर्वाधिक असतो. डिमेन्शिया हा एक सिंड्रोम आहे, ज्यामध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होते आणि त्यामुळे काही विकार उद्भवतात. यामुळे संबंधित व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमी होते. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.
डब्ल्यूएचओच्या एका रिपोर्टनुसार, डिमेन्शिया हे जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूचं सातवं सर्वांत मोठं कारण आहे. यासोबतच या आजारामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये अपंगत्वाचा धोकाही वाढतो. 20 वर्षं आधीपासूनच डिमेन्शियाची लक्षणं दिसू लागतात, असं म्हटलं जातं. यातील काही लक्षणं तुमच्या झोपेशीदेखील संबंधित आहेत, ती वेळेवर ओळखल्यास या आजाराचे गंभीर परिणाम कमी होऊ शकतात.
डिमेन्शिया व झोपेचा संबंध
मेयो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार, वयोवृद्ध लोकांना झोपेचा त्रास होतो. परंतु डिमेन्शिया असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अनेक वेळा जास्त गंभीर आणि कायमस्वरुपी राहते. तसंच, डिमेंशिया जसजसा वाढत जातो, तसतसं झोपेचे प्रॉब्लेम्स अधिक वाढत जातात.
डिमेन्शियाशी संबंधित झोपेची लक्षणं
प्रत्येकाला कधीकधी झोपायला त्रास होतोच. बऱ्याचदा वाईट स्वप्नांतून जागं झाल्यानंतरदेखील हे होऊ शकतं. ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, जर तुम्ही झोपेत ओरडत असाल किंवा लाथ मारत असाल तर ते मेंदूच्या शिरांमधील नुकसानाशी संबंधित डिमेन्शियाचं लक्षण असू शकतं.
डिमेन्शियाची लक्षणं कोणती आहेत
मेमरी लॉस, लक्ष केंद्रीत करण्यात त्रास होणे, दैनंदिन कामं करताना अडचणी जाणवणं, वेळ आणि ठिकाणाबद्दल गोंधळ होणं, मूड बदलणे ही डिमेन्शियाची काही लक्षणं आहेत.
याशिवाय स्मृतिभ्रंश असलेले लोक त्यांच्या जीवनशैलीत किंवा ते राहत असलेल्या सभोवतालच्या वातावरणात होणारे बदल पाहून अस्वस्थ होतात. या बदलांमुळे त्यांना भीती किंवा चिंतादेखील वाटू शकते, ज्यामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. तसंच ज्या लोकांमध्ये डिमेन्शियाची सुरुवातीची लक्षणं दिसत असतात, त्यांना संभाषणादरम्यान खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यातदेखील अडचण येते, ज्यामुळे लोकांशी त्यांच्या संभाषणाची कार्यक्षमता आणखी बिघडते.
हे वाचा - डायबिटीज आणि कोलेस्टेरॉलचा त्रास सोबतच संपेल, फक्त करा हे काम
डिमेन्शियाचा सर्वाधिक धोका कुणाला असतो
वृद्ध लोकांना स्मृतिभ्रंश डिमेन्शियाचा धोका सर्वांत जास्त असतो. यासोबतच धूम्रपान, हृदयविकार, मेंदूला झालेली दुखापत, आजाराचा कौटुंबिक इतिहास, डायबेटिस, डाउन सिंड्रोम, स्लीप अॅपनिया, खराब जीवनशैली यामुळेही डिमेन्शियाचा धोका वाढतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Mental health