Covid - 19 तर काहीच नाही; त्यापेक्षाही भयंकर आहेत 7 आजार

Covid - 19 तर काहीच नाही; त्यापेक्षाही भयंकर आहेत 7 आजार

संसर्गजन्य रोगांविषयीचे तज्ज्ञ असं सांगतात, की इथून पुढच्या काळात आपल्याला आणखीही अनेक रोगांपासून, रोगकारक विषाणूंपासून धोका होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : कोरोना विषाणूने (Coronavirus) गेल्या वर्षभराहून अधिक काळ जगभर थैमान घातलं आहे. कोव्हिड-19 महासाथीने (Pandemic) जगाची सगळी गणितंच बदलून टाकली. या  आजाराने लाखोंचे प्राण घेतले; अर्थव्यवस्थेवरही मोठे दुष्परिणाम केले, जे पुढची अनेक वर्षं मनुष्यजातीला भोगावे लागणार आहेत. आता अनेक देशांमध्ये कोरोनाप्रतिबंधक लशी (Vaccines) विकसित झाल्या आहेत किंवा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे कोरानावर मात करण्याचा विश्वास मनात जागृत झाला आहे.

मात्र हे सगळं एवढ्यावरच थांबेल असं नाही. कारण संसर्गजन्य रोगांविषयीचे तज्ज्ञ असं सांगतात, की इथून पुढच्या काळात आपल्याला आणखीही अनेक रोगांपासून, रोगकारक विषाणूंपासून धोका होण्याची शक्यता आहे. आपण सावधानता बाळगली नाही, तर भविष्यात त्यातून नवी महासाथ पसरू शकते. जी कोरोनापेक्षाही अधिक भयंकर असू शकते, असं तज्ज्ञांना वाटतं. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्यातल्या काही रोगांची माहिती इथे देत आहोत.

एबोला (Ebola)

या आफ्रिकेतून फैलावणाऱ्या रोगाचा मोठा धोका आहे. तापाचा हा आजार जनावरांतून माणसांमध्ये पसरतो. हा रोग माणसातून माणसांमध्येही संक्रमित होऊ शकतो, असा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे. एबोलाच्या 3400 केसेसपैकी 2270 जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. 2020 च्या जानेवारी महिन्यात एबोलावरील लसही आली होती; मात्र ती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली नाही. एबोलाचा संसर्ग रोखण्यासाठी आत्ताच काही पाऊल उचललं गेलं नाही, तर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येऊ शकते, असं तज्ज्ञांना वाटतं.

लासा फीव्हर (Lasa Fever)

हादेखील एक विषाणूजन्य आजार असून, आफ्रिकेत त्याचा प्रभाव मोठा आहे. या व्याधीने अनेकांचे प्राण घेतले आहेत; मात्र अद्याप त्यावर प्रतिबंधक लस विकसित करण्यात आलेली नाही. या आजारामुळे रक्तस्राव होतो. हा आजार झालेल्या दर पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीची मूत्रपिंडं, यकृत आणि प्लीहा या महत्त्वाच्या अवयवांवर अत्यंत वाईट परिणाम होतो. ब्लड ट्रान्स्फ्युजन, मलमूत्र, घरातल्या दूषित वस्तू आदींच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होऊ शकतो.

मार्बर्ग व्हायरस डिसीज (Marburg)

हादेखील अत्यंत भयानक विषाणूजन्य रोग आहे. एबोलासारख्या भयानक रोगाला कारणीभूत असलेल्या विषाणूंच्याच कुळातले विषाणू या रोगाला कारणीभूत असतात. हा रोग भयानक आहे, कारण त्याचा संसर्ग वेगाने होतो.

हे वाचा - धक्कादायक! सॅनिटायजरमुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू; प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा

या रोगाने मृत झालेल्या किंवा हा रोग झालेल्या जिवंत व्यक्तीला स्पर्श केल्यासही या रोगाची लागण होऊ शकते. युगांडामध्ये 2005 साली या रोगाचा प्रथम उद्रेक झाला होता. संसर्ग झालेल्यापैकी 90 टक्के लोकांचा या साथीत बळी गेला होता.

मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS)

हे नाव तुम्ही ऐकलं असेल. नावात म्हटल्याप्रमाणेच हा मध्य-पूर्वेत आढळलेला विषाणूजन्य रोग असून, श्वसनाशी संबंधित आहे. सध्याच्या कोरोना विषाणूप्रमाणेच नाकाच्या स्रावातून हा विषाणू पसरतो. त्यामुळे योग्य ती काळजी घेतली नाही, तर जगभर या रोगाचा प्रसार होऊ शकतो, असं शास्त्रज्ञ सांगतात.

सार्स अर्थात सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) हादेखील विषाणूजन्य रोग असून, सध्या पसरलेल्या कोरोना विषाणूसारखा विषाणू यासाठी कारणीभूत आहे. 2002 मध्ये चीनमध्ये हा रोग पसरला होता. तो 26 देशांत पसरून आठ हजार जणांचा मृत्यू झाला होता. त्याता कोरोनाप्रमाणेच लक्षणं दिसत होती आणि मृत्युदर जास्त होता. नाकातल्या स्रावाद्वारे पसरणाऱ्या या विषाणूवर त्या वेळी कोणताही उपाय नव्हता.

निपाह व्हायरस (Nipah Virus) 

2018 मध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावलेल्या निपाह व्हायरसला (Nipah Virus) त्या वेळी नियंत्रित करण्यात यश आलं होतं; मात्र वटवाघळांमधून माणसात संक्रमित होणाऱ्या या विषाणूचा प्रसार भविष्यात मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. तीव्र डोकेदुखी, मज्जासंस्थेचा दाह, उलटी, चक्कर अशी लक्षणं या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीत दिसतात.

Disease X

या सगळ्यांनंतर आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे डिसीज एक्स (Disease X). 2021 मध्ये हा रोग डोकं वर काढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जीन जॅक्स मुयेम्बे हे शास्त्रज्ञ गेली 40 वर्षं एबोला महासाथीवर संशोधन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जगाचा कोरोनाविरुद्धचा लढा सुरू असतानाच डिसीज एक्स नावाचा विषाणू फैलावण्याची शक्यता आहे. त्याच्या कारणांचा शोध अद्याप शास्त्रज्ञांना लागलेला नाही; मात्र हा रोग झालेल्यांपैकी 80 ते 90 टक्के जणांचा मृत्यू होऊ शकतो, इतका तो भयानक असू शकेल, असं शास्त्रज्ञ म्हणतात.

हे वाचा - Covisheild पेक्षा स्वस्त की महाग? स्वदेशी कोरोना लस Covaxin लशीची किंमत पाहा

त्यामुळे आरोग्यविषयक चांगल्या सवयी स्वतःला लावणं आणि त्या अंगवळणी पाडणं याच गोष्टी सध्याच्या काळात आपल्या हातात आहेत.

Published by: Priya Lad
First published: January 12, 2021, 7:47 AM IST

ताज्या बातम्या