वॉशिंग्टन, 18 जानेवारी : राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींकडून निवडणुकीच्या वेळी काही वेळा प्रतिस्पर्धी उमेदवाराला एखाद्या प्राण्याची उपमा दिली जाण्याचे प्रकार आपल्याला पाहायला-ऐकायला मिळतात; पण निवडणुकीला प्रत्यक्षात प्राणीच उभे राहिले असले तर? खरं वाटत नाही ना? पण हे खरं आहे. अमेरिकेत व्हरमाँट इथं राबवण्यात आलेल्या एका प्रकल्पात एक बकरा आणि एका कुत्र्याने महापौरपद भूषवलं आहे.
पाळीव प्राण्यांच्या निवडणुका घेण्याची कल्पना एका टाउन मॅनेजरच्या (Town Manager) डोक्यातून आली. त्या माध्यमातून निधी उभा करून मुलांसाठी खेळाच्या स्थानिक मैदानाचं पुनरुज्जीवन आणि स्थानिक मुलांना नागरी जीवनात सहभागी करून घेणं, असा दुहेरी उद्देश त्यामागे होता. 2018मध्ये फेअर हेवन (Fair Haven) इथल्या नागरिकांनी लिंकन (Lincoln) नावाच्या बकऱ्याला ऑनररी मेयर (Honorary Mayor) म्हणून निवडून दिलं. लिंकनच्या माध्यमातून सुमारे 10 हजार डॉलर उभारण्यात यश आलं. त्यानंतर सध्या कॅव्हलियर किंग चार्ल्स स्पॅनियल (Cavalier King Charles Spanniel) या ब्रीडचा मर्फी (Murfee) नावाचा कुत्रा (Dog) मेयर आहे. त्याच्या माध्यमातून 20 हजार डॉलर्स उभारण्यात आले आहेत. टाउन मॅनेजर जो गुंटर यांनी रटलँड हेराल्डला ही माहिती दिली.
मर्फीच्या मालकीणबाई लिंडा बार्कर यांनी सांगितलं, की मर्फीला या राजकीय खेळात उतरवायचं ठरलं, तेव्हा टी-शर्टच्या माध्यमातून पैसे उभे करणं सोपं ठरेल, असं वाटलं होतं; मात्र नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे आम्ही टी-शर्टऐवजी मास्ककडे वळलो. लिंडा बार्कर यांनी सुमारे 1000 मास्क तयार केले असून, व्हॅलेन्टाइन्स डेसाठी आणखीही मास्क्स त्या करणार आहेत. त्यांनी मास्कच्या माध्यमातून पाच हजार डॉलर्स, तर बास्केट रॅफल्सच्या माध्यमातून पाच हजार डॉलर्सची कमाई केली.
फेडरल लँड अँड वॉटर काँझर्वेशन फंडकडून 50 हजार डॉलर्सचा निधीही अलीकडेच देण्यात आल्याचं लिंडा यांनी सांगितलं. आता या गोष्टीतला विरोधाभास असा, या प्राणी मेयर्सच्या माध्यमातून जमा केलेल्या निधीतून उभारलेल्या मैदानात कुत्र्यालाच प्रवेश नाकारला. कारण त्या मैदानावर कुत्र्यांना प्रवेश न देण्याचा नियम आहे.
'मर्फी लवकरच हा मुद्दा मांडणार आहे,' असं लिंडा यांनी मिश्किलपणे सांगितलं.
'शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा' हे बालगीत सगळ्यांनीच ऐकलं असेल. या गीतातल्या पोपटाची जागा या खऱ्या गोष्टीत बकरा आणि कुत्र्याने घेतली. त्या माध्यमातून निधीही उभारला गेला आणि कामंही झाली. माणसांवर खरंच या प्राण्यांचं राज्य आलं, तर अशीच लोककल्याणकारी कामं सगळीकडे होतील का, असा विचार करून पाहायला हरकत नसावी. तुम्हाला काय वाटतं?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: United States of America