नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं. कोंडा झाल्यामुळे टाळूला खाज सुटते आणि सतत डोकं खाजवत राहावं लागतं. इतकंच नाही तर बऱ्याचदा केसांमधील कोंडा कपड्यांवरही पडतो. केसांमधील कोंडा घालवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिडँड्रफ शॅम्पू आणि केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांची मदत घेतात. पण यामुळेही आराम मिळेलच असं नाही. जास्त केमिकलयुक्त उत्पादनं वापरल्याने कोंडा जाण्याऐवजी केस गळू शकतात, त्यामुळे काही घरगुती वस्तू वापरून तुम्ही या समस्येपासून सुटकारा मिळवू शकता. जाणून घेऊयात कोंडा घालवण्याचे काही घरगुती उपाय. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.
अॅलोव्हेरा
एका भांड्यात अॅलोव्हेरा जेल घ्या. त्यात लिंबाचा रस घाला, या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि ते मिश्रण स्कॅल्पवर लावा. हा पॅक काही वेळ केसांवर राहू द्या, नंतर केस धुवून घ्या. यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा - health tips : हात थरथरणं, बोटांवरची सूज ही तर अनेक आजारांची लक्षणं; नेमका काय आहे उपचार
मेथी
मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यांची पेस्ट बनवा. आता त्यात लिंबाचा रस घाला. हे मिश्रण स्कॅल्प तसेच केसांना लावा. हे मिश्रण केसांवर अर्धा तास तसंच राहू द्या, यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या.
अंडी
एका भांड्यात दोन अंडी घ्या. त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस घाला, त्यात थोडं दही घाला. या सर्व गोष्टी मिसळून त्याचं मिश्रण करा आणि स्कॅल्पवर लावा आणि थोडा वेळ राहू द्या. यानंतर केस माइल्ड शॅम्पूने धुवून घ्या. यामुळे कोंड्यापासून आराम मिळेल, तसेच केस चमकदार होतील.
दही
एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धा कप दही घ्या. त्यात लिंबाचा रस घाला आणि थोडे मध घाला. हे मिश्रण टाळूला केसांना लावा. हे मिश्रण 30 मिनिटं केसांवर तसंच राहू द्या. नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. दह्यातील पोषकतत्त्वं केसांसाठी खूप उपयुक्त असतात. हे मिश्रण केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारेल, तसेच कोंड्यापासूनही मुक्ती मिळेल.
या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही हिवाळ्यात केसांमध्ये होणाऱ्या कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. घरगुती उपाय दीर्घकाळ केल्यास त्यांचा आणखी चांगला परिणामही दिसू शकतो. कोंडा कमी झाल्याचं लक्षात आलं तर पुन्हा हे उपाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Woman hair