जोधपूर, 3 जुलै : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अद्यापही कोरोनाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाही. तर दुसरीकडे कोरोनावरुन नवनव्या कल्पना लढवल्या जात आहे. काहींनी कोरोना विषाणूचा पोशाख तयार केलाय तर काहींनी आपल्या जन्मजात मुलांची नाव कोरोनावरुन ठेवली.
आता तर कहरच झाला आहे. एकीकडे कोरोनाची भीती असताना दुसरीकडे नागरिकांनी कोरोना करीवर ताव मारला आहे. आता अनेक रेस्टॉरंटमध्ये कोरोना व्हायरस थीमवर खाद्य पदार्थ तयार केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मजुराईच्या एका रेस्टॉरंटमध्ये मास्क पराठा सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला होता. आता या यादीत जोधपूरच्या रेस्टॉरंटच्या नावाचा समावेश झाला आहे.
द इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार याबाबत सांगण्यात आले आहे. या बातमीत रेस्ट़ॉरंट मालकाच्या हवाल्याने सांगण्यात आले की येथे शुद्ध शाकाहारी खाणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी रेस्टॉरंटने हा प्रयोग केला आहे. सोबतच कोरोना संक्रमणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे.
तर या प्रयोगाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून लोक अधिक नवनव्या कॉम्बोबाबत विचारणा करीत असल्याचे मालकाने सांगितले. मलाई कोफ्त्याला विषाणूच्या रुपात तयार करण्यात आले असून याची किंमत 220 रुपये तर मास्क नानची किंमत 40 रुपये आहे.