आफ्रिकेत आढळले 78 हजार वर्षांपूर्वीच्या बालकाचे अवशेष; अंत्यसंस्काराच्या पद्धतीबाबत मोठा खुलासा

आफ्रिकेत आढळले 78 हजार वर्षांपूर्वीच्या बालकाचे अवशेष; अंत्यसंस्काराच्या पद्धतीबाबत मोठा खुलासा

आफ्रिका खंडातल्या (Africa) आतापर्यंतच्या ज्ञात इतिहासातल्या सर्वांत जुन्या दफनभूमीचे (Burial Site) अवशेष पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सापडले आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 मे: माणसाला आपल्या प्रगतीची आस असते आणि त्यासाठी तो सतत भविष्याचा वेध घेत राहत असतो. पृथ्वीतलावरच्या प्राण्यांचा विचार करायचा झाला, तर माणूस हा एकमेव असा प्राणी आहे, की जो इतिहासाचाही धांडोळा घेत असतो, त्यातून आपल्या वर्तनाचा, वाटचालीचा माग काढत असतो आणि भविष्यातल्या प्रवासाची दिशा ठरवत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास हा त्यातलाच एक भाग. होमो सेपियन्स अर्थात आजच्या माणसाचं पहिलं अस्तित्व साधारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात होतं आणि तिथून तो जगभर पसरला. त्याच आफ्रिका खंडातल्या (Africa) आतापर्यंतच्या ज्ञात इतिहासातल्या सर्वांत जुन्या दफनभूमीचे (Burial Site) अवशेष पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे अवशेष सुमारे 78 हजार वर्षांपूर्वीचे असून, त्यात अडीच ते तीन वर्षांच्या एका बालकाच्या मृतदेहाचे अवशेष आढळले आहेत. त्या बालकाच्या मृत्यूनंतर त्याला अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने गुंडाळून, त्याच्या डोक्याखाली उशी ठेवून त्याचं दफन करण्यात आल्याचं अवशेषांवरून स्पष्ट होत आहे. अंत्यसंस्कारांची रीत तेव्हाही सुरू असल्याचं यावरून दिसून येत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने'इंडिया टु़डे'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

स्पेन मधल्या मानवी उत्क्रांती विषयक राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या (CENIEH) संचालिका आणि मानववंशशास्त्रज्ञ मारिया मार्टिनन-तोरेस यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झालं असून, त्यांच्यासह यात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी 'नेचर' या जर्नलमध्ये या उत्खननाबद्दलचा लेख लिहिला आहे. केनिया (Kenya) देशातल्या किनारी भागातल्या किलिफी काउंटीमधल्या'पांगा या सैदी'या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केव्ह साइटवर (Cave Site) सुरू असलेल्या उत्खननात बालकाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी मटोटो (Mtoto) असं त्याचं नामकरण केलं असून, स्वाहिली भाषेतल्या या शब्दाचा अर्थ मूल असा होतो.

हे ही वाचा-OMG! 2026 ला जग अंधारात बुडणार? टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं टेन्शन

हे बालक शिकार करणाऱ्या (Hunter-Gatherer) समुदायातलं होतं, असे पुरावेही आढळले आहेत. उष्ण कटिबंधीय जंगलाच्या (Tropical Forest) परिसरात असलेल्या या ठिकाणी काही हरिणांचे अवशेषही सापडले असून, दगडाची काही हत्यारंही सापडली आहेत. होमो सेपियन्सचं (Homo sapiens) सामाजिक वर्तन गुंतागुंतीचं आहे आणि ते कसं विकसित होत गेलं, यावर या अवशेषांच्या अभ्यासातून प्रकाश पडणार आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

मारियामार्टिनन-तोरेस यांनी याविषयी अधिक माहिती दिली.'होमो सेपियन्सच्यामनाच्या जडणघडणीचं मूळ इथे आढळतं. त्यांचा समुदाय जिथे राहत होता, त्या जागेच्या जवळपासच या बालकाचं दफन करण्यात आलं. जीवन आणि मृत्यू या गोष्टी एकमेकांशी किती जोडलेल्या आहेत, हे यावरून कळतं. जिवंत असताना दिल्या जाणाऱ्या आदरा इतकाच आदर मृत झाल्यानंतरही देणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. आपण मेलो, तरी आपल्या समुदायाशी असलेलं आपलं नातं तुटत नाही. खास करून या उदाहरणाबाबत बोलायचं, तर आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या बालकाचं एवढ्या लवकर जाणं, त्याच्या कुटुंबीयांना किती दुःखात लोटून गेलं असेल, त्याची कल्पना या अंत्यसंस्कारांवरून करता येऊ शकेल,'असं त्यांनी सांगितलं.

या उत्खननात कुजलेल्या स्थितीतली बालकाची हाडं गोलाकार खड्ड्यात सापडली. ती हाडं पुढील अभ्यासासाठी CENIEH संस्थेत पाठवण्यात आली आहेत. त्या बालकाची लिंगनिश्चिती अद्याप झालेली नाही; मात्र त्याचं दफन अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक करण्यात आल्याचं तिथे आढळलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. मृत बालकाला उजव्या कुशीवर झोपवून, त्याचे गुडघे छातीजवळ घेऊन त्याला खड्ड्यात ठेवण्यात आलं होतं. त्याच्या डोक्याखाली उशी असल्याचं आणि शरीराचावरचा भाग कशाने तरी गुंडाळण्यात आल्याचंही दिसून आलं आहे. तसंच, मृतदेह खड्ड्यात ठेवल्यानंतर त्यावर लगेचच आजूबाजूची माती पसरून त्याचं दफन करण्यात आलं असावं, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

'त्या बालकाच्या कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रितपणे त्याला मूठ माती दिली असावी,असं म्हणायला वाव आहे. आपल्या मनुष्यजातीत आजही या बाबतीत जे वर्तन पाहायलामिळतं,त्याचं या बालकाच्या मृत्यूवेळच्या सर्वांच्या वर्तनाशी साधर्म्यअसल्याचे पुरावे आढळत आहेत,'असं पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि जर्मनीतल्यामॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर दी सायन्स ऑफ ह्युमन हिस्ट्री या संस्थेच्यासंचालिका निकोल बोइव्हिन यांनी सांगितलं. निअँडरथरल मानवाचीसंभाव्य दफनभूमी इस्रायलमध्ये यापूर्वी सापडली असून, ती एक लाख 20 हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज असल्याचंही बोइव्हिन यांनी सांगितलं.

अंत्यसंस्कारांची (Funerary) पद्धत आफ्रिकेत सुरू होऊन नंतर जगभर पसरली, की बाहेरून आफ्रिकेत आली, याबद्दल अद्याप कल्पना नाही. तसंच, मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत नेमकी कधी सुरू झाली, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र आत्ताचे होमो सेपियन्स आणि त्याआधीचे निअँडरथल मानवही अंत्यसंस्कार करत होते. अंत्यसंस्कार म्हणजे मृतांशी असलेले आपले संबंध कायम राखण्याची आणि त्यांना निरोप देण्याची पद्धत असं मारिया यांना वाटतं. कविवर्य ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर'झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया'ही भावना मानवी मनात कदाचित पूर्वीपासूनच घर करून असावी. म्हणूनच तो आप्ताच्या मृत्यूबाबत इतका हळवा होतो आणि त्याच्याशी असलेलं आपलं नातं कायम राहण्याच्या भावनेने त्याला निरोप देतो, त्याची आठवण काढतो,असं म्हणायला वाव आहे.

First published: May 7, 2021, 4:31 PM IST

ताज्या बातम्या