UK मधील नव्या कोरोनाला टक्कर देते भारतीय कोरोना लस; शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं

UK मधील नव्या कोरोनाला टक्कर देते भारतीय कोरोना लस; शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं

भारत बायोटेकनं (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin ) या कोरोना लशीचा (corona vaccien) कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर (corona new strain) प्रयोग करून पाहिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: कोरोना विषाणूमध्ये (Corona Virus) जनुकीय सुधारणा (Mutation) होऊन तयार झालेल्या नव्या दोन स्ट्रेन्सपासून (New Strains) आपली लस संरक्षण देते, असा दावा मॉडर्ना (Moderna) या अमेरिकेतल्या औषध कंपनीने नुकताच केला होता. त्यानंतर आता भारत बायोटेक (Bharat Biotech) या भारतीय कंपनीनेही कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेली कोरोनाचा नवा स्ट्रेन वुहानमध्ये गेल्या वर्षी आढळलेल्या आणि जगभर धुमाकूळ घातलेल्या स्ट्रेनपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आणि मृत्यूला कारणीभूत ठरणारा आहे. 'सार्स सीओव्ही - टू' (SARS CoV-2) या विषाणूच्या नव्या स्ट्रेन्सवर कोव्हॅक्सिन ही लस प्रभावी ठरते आहे. असं भारत बायोटेक कंपनीने सांगितलं आहे. त्यासोबत कंपनीने आपलं संशोधनही प्रसिद्ध केलं आहे.

bioRxiv वेबसाइटवर आलेल्या रिव्ह्यूमध्येही कंपनीच्या दाव्याला पुष्टी देण्यात आली आहे. कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी ही न्यूयॉर्कमधील ना नफा तत्त्वावर चालणारी संशोधन आणि शिक्षणविषयक संस्था आहे. त्या संस्थेद्वारे bioRxiv वेबसाइट चालवली जाते.

हे वाचा - लसीकरणाआधी 2 गोष्टी करणं MUST; तर अधिक प्रभावी ठरेल कोरोना लस

कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या 26 जणांच्या शरीरातून सेरा (Sera - द्राव) घेऊन त्यावर भारत बायोटेक कंपनीने प्लेक रिडक्शन न्यूट्रलायझेशन टेस्ट केली. कोरोनाच्या ब्रिटनमधल्या स्ट्रेनवर, तसंच अन्य एका स्ट्रेनवर त्याची चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीत ही लस दोन्ही स्ट्रेनवर प्रभावी ठरत असल्याचं आढळून आल्याचं bioRxiv वेबसाइटवरच्या अहवालात म्हटलं आहे.

bioRxiv च्या रिव्ह्यूवर प्रतिक्रिया देताना आयसीएमआर संस्थेने ट्विट केलं आहे की, 'कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या ब्रिटनमधील स्ट्रेनवर आणि अन्य स्ट्रेन्सवरही तितकीच प्रभावी आहे. एनआयव्ही ही संस्था कोरोनाच्या ब्रिटनमधील स्ट्रेनची प्रयोगशाळेत वाढ करणारी जगातील पहिली संस्था ठरली आहे.'

भारतासह डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबॅनॉन, सिंगापूर आदी देशांमध्ये कोरोनाचा ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन आढळला आहे. भारतात आतापर्यंत या स्ट्रेनचे 150 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारताने या स्ट्रेनचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आणि थांबवण्यासाठी वेगळं धोरण अवलंबलं आहे.  23 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ब्रिटनमधून येणारी सर्व विमानं बंद ठेवण्यात आली होती. तसंच ब्रिटनमधून आलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती.

हे वाचा - मास्क वापरणं Must! फक्त शिंक किंवा खोकल्यातून नव्हे तर संसर्गित व्यक्तीच्या बोलण्यातूनही पसरू शकतो कोरोना

कोव्हॅक्सिन ही संपूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली लस आहे.  भारत बायोटेक कंपनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थांनी ती विकसित केली आहे. भारत बायोटेक कंपनीच्या 'बायो-सेफ्टी लेव्हल थ्री' असलेल्या बायो-कंटेन्मेंट फॅसिलिटीमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे.

कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सध्या सुरू आहेत. तसंच या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी ही लस वापरली जात आहे.

Published by: Aditya Thube
First published: January 28, 2021, 7:52 AM IST

ताज्या बातम्या