Home /News /lifestyle /

तुम्ही 30 वर्षांचे झालात? आणखी किती जगू शकाल? भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

तुम्ही 30 वर्षांचे झालात? आणखी किती जगू शकाल? भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

वैद्यकीय सोयी-सुविधा, माहितीचा प्रसार-प्रचार यामुळे आरोग्यपूर्ण जगण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे.

    नवी दिल्ली, 13 जून : भारतानं सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. त्यातही वैद्यकीय क्षेत्रातली प्रगतीही कोरोना महामारीच्या काळात देशानं अनुभवली. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे देशातल्या नागरिकांचं वाढलेलं आयुर्मान. (Life Expectancy) नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी वाढल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. आता देशातल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान 69 वर्षं 7 महिने असं आहे. दहा वर्षांपूर्वी भारतीयांचं सरासरी आयुर्मान 67 वर्षं 5 महिने एवढं होतं. सँपल रजिस्ट्रेशन सिस्टीमच्या (SRS) एका रिपोर्टनुसार भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात दोन वर्षांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. 'आज तक'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतातल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान 32 वर्षं इतकं होतं. म्हणजेच त्या काळात नागरिक साधारणपणे 32 वर्षांपर्यंत जगत होते. आता हे आयुर्मान 69 वर्षांपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या (SRS) रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. अजूनही जागतिक सरासरीपेक्षा (Global Average) भारतातल्या नागरिकांचं आयुर्मान कमीच आहे. जगातल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान 72 वर्षं 6 महिने एवढं आहे. एसआरएसचा Abridged Life Table Report 2015-2019 हा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यातून आणखीही काही गोष्टी समोर आल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अडीच वर्षं अधिक जगतात. पुरुषांच्या आयुर्मानाची सरासरी 68 वर्षं 4 महिने इतकी आहे, तर स्त्रियांचं सरासरी आयुर्मान 71 वर्षं 1 महिना एवढं आहे. ग्रामीण व शहरी आयुर्मानातही फरक दिसतो आहे. शहरातले नागरिक सरासरी 73 वर्षं जगतात, तर ग्रामीण भागातल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान 68 वर्षं 3 महिने इतकं आहे. या अहवालानुसार, सगळ्यात जास्त आयुर्मान दिल्लीवासीयांचं आहे. तिथल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान 75 वर्षं 9 महिने आहे. दिल्लीनंतर केरळचा दुसरा क्रमांक लागतो. तिथल्या नागरिकांचं सरासरी (Average Age Of Indians) आयुर्मान 75 वर्षं 2 महिने आहे. सगळ्यात कमी आयुर्मान छत्तीसगढमधल्या नागरिकांचं आहे. तिथले नागरिक साधारणपणे 65 वर्षं 3 महिने इतकंच जगतात. महाराष्ट्रातल्या पुरुषांचं सरासरी आयुर्मान 71.6 वर्षं, तर स्त्रियांचं 74 वर्षं इतकं आहे. जन्मल्यानंतर भारतीय साधारणपणे किती वर्षं जगू शकतात, याबाबतचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार, एखाद्या बाळाचं जन्मल्यानंतरचं अंदाजित आयुर्मान 69 वर्षं 7 महिने एवढं असतं. बाळ एका वर्षाचं झाल्यानंतर त्याचं अंदाजित आयुर्मान 71 वर्षं 3 महिने एवढं असू शकेल, असा अंदाज असतो. ते मूल पाच वर्षांचं झाल्यावर ते आणखी 67.7 वर्षं जगू शकतं, असा अंदाज आहे. तसंच, याचप्रमाणे ते दहा वर्षांचं झाल्यावर आणखी 62.9 वर्षं जगू शकतं, असा अंदाज आहे. वीस वर्षांचे झाल्यावर आणखी 53.3 वर्षं, 30 वर्षांचे झाल्यावर आणखी 43.9 वर्षांचं सरासरी आयुष्य नागरिकांना मिळतं. तसंच, चाळिशी पार झाल्यावर आणखी 34.7 वर्षं, पन्नाशीनंतर 26 वर्षं, साठीनंतर 18.3 वर्षं आणि सत्तरीनंतर 11.8 वर्षं भारतीय जगू शकतात, असा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. वैद्यकीय सोयी-सुविधा, माहितीचा प्रसार-प्रचार यामुळे आरोग्यपूर्ण जगण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. त्याचा चांगला परिणाम म्हणून देशातल्या नागरिकांचं आयुर्मान दोन वर्षांनी वाढलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या