Home /News /lifestyle /

इतके सेकंद तुम्ही विनाआधार एका पायावर उभं राहू शकत नसाल तर ही आहे धोक्याची घंटा

इतके सेकंद तुम्ही विनाआधार एका पायावर उभं राहू शकत नसाल तर ही आहे धोक्याची घंटा

risk of death

risk of death

बरेच जण तर आजार झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्याची पाळी येते. दररोज केल्या जाणाऱ्या व्यायामातूनही आपण आजारी आहोत किंवा नाही, याचे संकेत मिळू शकतात.

नवी दिल्ली, 23 जून : आपल्या गरजा भागवताना दैनंदिन आयुष्यात मोठी कसरत करावी लागत आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवन याचं संतुलन ठेवणं प्रत्येक व्यक्तीला शक्य होईलच, याबद्दल सांगता येत नाही. परिणामी, आजार जडण्याची शक्यता बळावत आहे. बरेच जण तर आजार झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्याची पाळी येते. दररोज केल्या जाणाऱ्या व्यायामातूनही आपण आजारी आहोत किंवा नाही, याचे संकेत मिळू शकतात. यातीलच एक म्हणजे, कोणताही आधार न घेता 10 सेकंदांपर्यंत तुम्ही एका पायावर उभं राहून शरीराचं संतुलन ठेवण्यात अपयशी ठरत असाल तर 10 वर्षांच्या आत तुमचा मृत्यू होण्याचा धोका दुपटीने वाढू शकतो, असं ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या (British Journal Of Sports Medicine) संशोधनातून समोर आलं आहे. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. ‘ब्रिटिश जर्नल’च्या संशोधनानुसार, व्यायाम करताना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने शरीराचं संतुलन करू शकता यावरून तुमच्या आरोग्याची माहिती मिळू शकते. 10 सेकंदापर्यंत एका पायावर शरीराचं संतुलन होत नसेल तर मध्यम वयाच्या आणि ज्येष्ठांच्या मृत्यूचा धोका 10 वर्षांत दुपटीने वाढू शकतो. या संदर्भात यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिनलंड आणि ब्राझीलमधल्या तज्ज्ञांनी 12 वर्षे अभ्यासही केला आहे. यातूनही हेच तथ्य समोर आलं आहे. जी व्यक्ती एका पायावर उभं राहून शरीराचं संतुलन करू शकत नाही, तिला लकवा (Stroke) मारण्याचाही धोका अधिक असतो म्हणजे त्या व्यक्तीला पॅरेलिसिसचा आजार होण्याची शक्यता असते. हेही वाचा - Male Fertility: दुर्लक्ष टाळा, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी ठरू शकते धोकादायक या संशोधनात असं लक्षात आलं की, 10 सेकंदापर्यंत शरीराचं संतुलन करण्याच्या चाचणीत ज्या व्यक्ती अपयशी ठरल्या त्यांच्या प्रकृती इतरांच्या तुलनेत बिघडलेल्या होत्या. 10 सेकंदांपर्यंत एका पायावर उभं न राहू शकणाऱ्या व्यक्तींना टाइप-2 डायबेटिस (Diabetes) झाल्याचं समोर आलं. अशा व्यक्तींना जास्त जाड असणं, उच्च रक्तदाब (High Blood Pressure), हृदयाशी संबंधित आजार (Heart Disease) झाल्याचंही या संशोधनातून स्पष्ट झालं. प्रमुख संशोधक डॉ. क्लाडिओ गिल अराजुओ यांनी म्हटलं की, शरीराच्या संतुलनाचा संबंध थेट आपल्या जीवनशैलीशी जोडला गेला आहे. याचाच अर्थ संतुलन न करू शकणाऱ्या व्यक्ती शारीरिक हालचाली वा व्यायाम करत नाहीत. ज्येष्ठ नागरिक अनेकदा कुठेतरी पडतात आणि त्यांचं हाड मोडतं. यालाही आपण संतुलनाशी जोडू शकतो. 51 ते 75 वर्षांच्या ज्येष्ठांनी नियमित आरोग्य तपासणी करताना संतुलनाची चाचणी (Balance Test) करून घेणं गरजेचं असल्याचा सल्ला त्यांनी दिला. संशोधनात या गोष्टींचा होता समावेश संशोधनात 51 ते 75 वर्षांच्या 1702 ज्येष्ठांचा समावेश करण्यात आला. 2008 ते 2020 दरम्यान हे संशोधन करण्यात आलं. सर्वप्रथम चाचणी केल्या जाणाऱ्या व्यक्तींना कसलाही आधार न घेता 10 सेकंदासाठी एका पायावर उभं राहण्यास सांगण्यात आलं. यात एका पायाला दुसऱ्या पायाच्या मागे व हात बाजूला ठेवण्यास सांगितलं गेलं. एका पायावर उभं राहण्यासाठी त्यांना तीन संधी देण्यात आल्या. संशोधनात दर 5 व्यक्तींमागे एका व्यक्तीची चाचणी नकारात्मक आली. चाचणीनंतर पुढील 10 वर्षांच्या आत 123 लोकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. यातील बहुतांश लोक चाचणीत अपयशी ठरलेले होते. चाचणीत सहभागी झालेले सर्वजण ब्राझीलमधले होते. त्यामुळे चाचणीचे निष्कर्ष इतर देशांना पूर्णपणे लागू होणार नाहीत, असे संशोधनकर्त्यांनी म्हटलं. दरम्यान, आपण एखाद्या आजाराचा सामना करत आहोत किंवा नाही हे अनेकदा दैनंदिन व्यायामातूनही जाणून घेऊ शकतो. समस्या अधिक गंभीर वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणं कधीही चांगलं.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या