चेन्नई, 16 डिसेंबर : फक्त 58 मिनिटं म्हणजे एक तासभर पकडा. फार फार आपण या वेळात स्वयंपाकाची सर्व तयारी धरून जास्तीत जास्त डाळ-भात, पोळी-भाजी इतकंच बनवू शकतो. काही जण तर 58 मिनिटांत 46 पदार्थांची नावंही सांगू शकत नाहीत. पण याच वेळेत एखाद्यानं 46 पदार्थ बनवले असं सांंगितलं तर... विश्वास बसणार नाहीच. त्यातही असं एखाद्या लहान मुलीनं केलं असेल तर बिलकुल खरं वाटणार नाही. मात्र भारताच्या लेकीनं ते करून दाखवलं आहे.
भारताची ही मास्टर शेफ जगात भारी ठरली आहे. तामिळनाडूतील एस एन लक्ष्मी साई श्री हिनं कुकिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. UNICO बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये तिची नोंद झाली आहे.
Tamil Nadu: A girl entered UNICO Book Of World Records by cooking 46 dishes in 58 minutes in Chennai yesterday. SN Lakshmi Sai Sri said, "I learnt cooking from my mother. I am very happy". pic.twitter.com/AmZ60HWvYX
लक्ष्मीनं चेन्नईमध्ये 58 मिनिटांत 46 पदार्थ बनवले. एएनआयशी बोलताना लक्ष्मी म्हणाली, मी माझ्या आईकडून स्वयंपाक करायला शिकली. मी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला मला खूप आनंद वाटतो आहे.
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार लक्ष्मीची आई म्हणाली, मी तामिळनाडूतल्या वेगवेगळ्या डिशेस बनवते. लॉकडाऊनमध्ये माझी मुलगीही स्वयंपाकात मला हातभार लावायची. तीसुद्धा स्वयंपाक करायला शिकली. याबाबत मी तिच्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिला वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा सल्ला दिला.
लक्ष्मीच्या वडिलांनी यावर काही रिसर्चही केला. याआधी केरळमधील एका 10 वर्षांच्या मुलीनं 30 डिशेस बनवल्या होत्या. लक्ष्मीला त्यांनी यापेक्षा अधिक डिशेस बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं.
लॉकडाऊनमध्ये दुसरं काहीच काम नव्हतं तेव्हा ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच किचनमध्ये पाय ठेवलं नाही त्यांनी स्वयंपाक शिकण्याचा प्रयत्न केला. ज्यांना स्वयंपाक येत होता त्यांनी आपल्या या कौशल्याला चालना दिली. ज्यांना कुकिंगची आवड होती त्यांनी नवनवीन डिशेस करून पाहिल्या. तामिळनाडूतील ही लहान मुलगीही याला अपवाद ठरली नाही. तीदेखील ल़ॉकडाऊनमध्ये आपल्या आईकडून कुकिंग शिकली. पण फक्त टाइमपास म्हणून नाही तर तिनं आपल्या या कौशल्याचं सोनंही केलं. सोशल मीडियावरही तिच्यावर कौतुकाचा वर्षावर होतो आहे. तिचं खूप गुणगान गायलं जातं आहे.