नवी दिल्ली, 10 जून: 2021 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse) आज आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण असून, काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. उत्तर कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्येच खग्रास सूर्यग्रहण होणार असून, काही ठिकाणीच रिंग ऑफ फायरचा नजारा पाहता येणार आहे. यामध्ये सूर्य एखाद्या अंगठीप्रमाणे दिसेल. चंद्र पृथ्वीला पूर्णतः झाकून टाकणार असल्यानं सूर्याची फक्त बाह्य वर्तुळाकार कडा दिसते. त्याला रिंग ऑफ फायर (Ring of Fire) म्हणतात. अमेरिका, युरोप आणि आशियाच्या उत्तर भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. भारतात मात्र हे ग्रहण दिसणार नाही. फक्त लडाख आणि अरुणाचल प्रदेशात सूर्यास्ताच्या आधी काही मिनिटं अंशतः ग्रहण दिसण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञानी व्यक्त केली आहे. हे ग्रहण दुपारी 1:42 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 6:41 मिनिटांपर्यंत चालेल.
हिंदू पंचांगानुसार, आज अमावस्या असून शनी जयंती आहे. वृषभ आणि मृग नक्षत्रात हे ग्रहण होईल. वर्षातील हे पाहिलं ग्रहण भारतात दिसणार नसल्यानं त्याचा सूतक काळ लागू होणार नाही, त्यामुळं या काळात धार्मिक, तसंच शुभकार्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
हेही वाचा- एक चूक पडली महागात, म्हणून आल्या पावलीच माघारी फिरली वरात
सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी सूतक काळ असतो. भारतात ग्रहणकाळात काही रितीरिवाज आवर्जून पाळले जातात. प्राचीन काळापासून या परंपरा चालत आल्या आहेत. त्याला वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही आधार नाही. त्यामुळं आजच्या काळात ग्रहणकाळात काय करावे आणि काय करू नये याबद्दल बरेच संभ्रम निर्माण होतात. तरीही अनेक लोक जुन्या परंपरांचे पालन करतात. काही लोक या वेळी उपवास ठेवतात, तर या काळात कोणत्याही प्रकारचे घरगुती काम करत नाहीत. या काळात वातावरण दुषित होत असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं काही नियम पाळण्याचा आग्रह आयुर्वेदात ( Ayurveda) करण्यात आला आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून, सूर्यग्रहणादरम्यान काहीही खाऊ किंवा पिऊ नये. ग्रहण होण्याच्या दोन तास आधी हलके आणि सहज पचण्याजोगे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहण होण्यापूर्वी जे पदार्थ खाणार आहात त्यात हळद घालावी असा सल्लाही आयुर्वेदात देण्यात आला आहे. ग्रहण होण्याच्या दोन तास आधी भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तुळशीची पाने घालून केलेला चहा पिणंही योग्य ठरेल, असंही आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. ग्रहण काळात दुर्वांचा वापर करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eclipse