मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चिरतरुण राहण्याचं गुपित म्हणजे ‘ही’ भाजी, उत्तम आरोग्यासाठी तिचं सेवन जरुरीचं

चिरतरुण राहण्याचं गुपित म्हणजे ‘ही’ भाजी, उत्तम आरोग्यासाठी तिचं सेवन जरुरीचं

चिरतरुण राहण्याचं गुपित भोपळ्याची भाजी

चिरतरुण राहण्याचं गुपित भोपळ्याची भाजी

लठ्ठपणा आणि वाढत्या वयाच्या खुणा मिटवण्यासाठी तर भोपळ्यासारखं उत्तम औषध नाही. भोपळ्याचे आणखीही काही गुणधर्म आहेत.

    म्हातारीला टुणूक टुणूक घेऊन जाणारा भोपळा आपल्याला लहान मुलांच्या गोष्टीमधून नेहमी भेटतो. वीणेसारख्या वाद्यांमधून त्याच्या साह्यानं मधूर स्वर उमटतो. इतकंच नाही, तर वेलीवर उगवणारा, भलामोठा किंवा उभट लांब भोपळा शरीरासाठीही अतिशय गुणकारी असतो. भोपळ्याचे गुणधर्म ऐकले, तर आजवर भोपळा न खाणारेही आहारात त्याचा समावेश नक्की करतील. लठ्ठपणा आणि वाढत्या वयाच्या खुणा मिटवण्यासाठी तर भोपळ्यासारखं उत्तम औषध नाही. भोपळ्याचे आणखीही काही गुणधर्म आहेत.

    भोपळा ही वेलीवर उगवणारी भाजी आहे. कलिंगड, खरबूज या प्रकाराच्या फळांच्या प्रजातीमध्ये याचा समावेश होतो. लांबट, उभट पोपटी-हिरवा दुधी भोपळा, नारिंगी रंगाचा गोलसर लाल भोपळा हे भोपळ्याचे प्रकार भाजी किंवा इतर गोष्टींसाठी वापरले जातात. जगभरात भोपळ्याच्या 150 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. या दोन्ही प्रकारचे भोपळे आरोग्यावर्धक आहेत. यातील खनिजं आणि जीवनसत्त्वांमुळे डोळ्यांपासून हृदयापर्यंत सर्व अवयवांचं आरोग्य चांगलं राहतं. हाडांच्या मजबुतीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळा खाल्लाच पाहिजे.

    रोगप्रतिकारक शक्तीसाठी

    कोरोना महामारीनंतर रोगप्रतिकारक शक्तीबाबत सर्वच जागरूक झाले आहेत. मात्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोळ्या घेण्यापेक्षा तसा आहार घेणं केव्हाही चांगलं. भोपळ्यामध्ये क जीवनसत्त्व असतं. हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवतं. शरीरातील न्यूट्रोफिल चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी क जीवनसत्त्व आवश्यक असतं. विविध जीवाणूंपासून आपलं रक्षण करणारी न्यूट्रोफिल ही शरीरातील प्रतिकार करणारी पेशी आहे. भोपळा खाल्ल्यामुळे या पेशीला बळकटी मिळते व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

    वजन कमी करण्यासाठी

    लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांसाठी भोपळा वरदानच आहे. यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तसंच कॅलरी कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी भोपळा भरपूर खावा.

    दृष्टी सुधारण्यासाठी

    भोपळ्यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर असतं. या जीवनसत्त्वामुळे डोळ्यांच्या समस्या दूर व्हायला मदत होते. भोपळ्यातील अ जीवनसत्त्वामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. बऱ्याचदा मोतीबिंदूमुळे दृष्टिदोष येऊ शकतो, त्यासाठी भोपळ्याचं सेवन करावं, असं आहारतज्ज्ञ क्रिस्टी गॅगनन यांचं म्हणणं आहे.

    शरीराला लवचिक बनवण्यासाठी

    ज्याप्रमाणे केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर असतं, त्याचप्रमाणे ते भोपळ्यातही असतं. एका प्रौढ पुरुषाला रोज 3,400 ग्रॅम, तर प्रौढ स्त्रीला 2,400 ग्रॅम पोटॅशियमची गरज असते. अर्धा कप शिजवलेल्या भोपळ्यातून 250 मिलिग्रॅम पोटॅशियम मिळतं. यामुळे शरीर लवचिक बनतं.

    तारुण्य टिकवण्यासाठी

    भोपळ्यात तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे त्वचेसाठी भोपळा हितकर असतो. यातील मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, मॅंगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींची झीज कमी करते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन हेही त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी महत्त्वाचं अँटीऑक्सिडंट आहे.

    कोलेस्टेरॉल कमी करतं

    भोपळ्यामधील तंतुमय घटकांमुळे आपल्याला बराच काळ भुकेची जाणीव होत नाही. पोट भरलेलं राहतं व रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलही तयार होत नाही. आतड्यांचं आरोग्यही यामुळे सांभाळलं जातं. रक्तातील साखर वाढू न देण्याचं काम भोपळा करतो.

    भोपळा ही बाराही महिने उपलब्ध असणारी भाजी आहे. वास्तविक भाजी, खीर, हलवा, घारगे, पराठे अशा अनेक गोड-तिखट पदार्थांमधून वैविध्यपूर्ण पद्धतीनं हा भोपळा खाता येतो. मात्र अनेकांना तो आवडत नाही. त्याचे गुणधर्म लक्षात घेतले तर भोपळ्याला नाकं मुरडणारे त्याचं सेवन नक्की करतील.

    First published:

    Tags: Health, Health Tips, Vegetable