मुंबई, 15 जुलै : बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेक शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. लठ्ठपणा ही त्यापैकीच एक होय. खरंतर लठ्ठपणा हा अनेक आजारांचं मूळ कारण ठरतो. त्यामुळे वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवणं आवश्यक आहे. लठ्ठपणा (Obesity) कमी करण्यासाठी अनेक जण डाएट (Diet), व्यायाम आदी गोष्टी करतात. काही जण वेगानं वजन कमी करतात. परंतु, त्या तुलनेत हळूहळू वजन कमी करणाऱ्या व्यक्तींचं वजन दीर्घ काळ स्थिर राहतं, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे वजन कमी करताना घाई करू नये. आज अनेक महिला लठ्ठपणाचा सामना करत आहेत. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. वजन कमी करण्यासाठी महिलादेखील अनेक मार्ग अवलंबतात. परंतु, त्यातून यश मिळतंच असं नाही. परंतु, कोलकात्यामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं अत्यंत संयमाने 35 किलो वजन कमी करण्यात यश मिळवलं आहे. प्रेग्नन्सीनंतर (Pregnancy) या महिलेचं वजन खूप वाढलं होतं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी या महिलेला सुमारे अडीच वर्षं लागली. वेटलॉससाठी (Weight Loss) एवढा वेळ लागूनही या महिलेनं आपलं वजन गेल्या काही वर्षांपासून मेंटेन ठेवलं आहे. यासाठी ही महिला काही खास गोष्टी करते. याविषयीची माहिती देणारं वृत्त `आज तक`ने प्रसिद्ध केलं आहे.
काही जण वजन तत्काळ कमी व्हावं म्हणून घाईघाईनं उपाययोजना करतात. परंतु, हे करणं चुकीचं आहे. हळूहळू वजन कमी करणं हेल्दी मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते दर आठवड्याला 1 ते 2 पौंड म्हणजेच 0.5 ते 1 किलो वजन कमी होणं आवश्यक आहे. कोलकात्यातल्या सुप्रीत कौर (Supreet Kaur) यांनी वजन कमी करण्यासाठी बराच वेळ घेतला; पण त्याचा त्यांना अजूनही फायदा होत आहे. त्यांना वजन कमी करण्यासाठी अडीच वर्षं लागली. आज काही वर्षांनंतरही त्यांचं वजन नियंत्रणात आहे. सुप्रीत कौर यांचा वेटलॉसचा प्रवास काहीसा अनोखा आहे. वजन नियंत्रणासाठी प्रयत्न करत असलेल्या महिलांसाठी सुप्रीत यांचा प्रवास नक्कीच दिशादर्शक आहे.
(फक्त 500 रुपयात 5G मोबाईल, 6GB RAM आणि प्रचंड चांगले फिचर्स, एकदम भारी ऑफर)
कोलकाता इथल्या सुप्रीत कौर या न्यूट्रिशन आणि फिटनेस कन्सल्टंट आहेत. त्यांची उंची 160 सेमी आहे. त्याचं वजन 92 किलो होतं. परंतु, आता त्यांचं वजन 57 किलो आहे. त्यांनी सुमारे 35 किलो वजन कमी केलं आहे. स्वतःची क्षमता अजून वाढवण्याचं त्याचं नियोजन आहे.
`मी मूळ पंजाबची (Punjab) आहे. आम्हा पंजाबी लोकांची खाण्याची सवय कशी असते, हे सर्व जण जाणतात. आम्ही कधीच कॅलरीज पाहून खात नाही. मला विविध पदार्थ खाण्याची खूप आवड होती. त्यामुळे मी मनसोक्त खायचे. लग्नापूर्वी मी खूप खात असे, तरीही माझं वजन 60 किलोच्या आतच होतं; पण लग्नानंतर मी गरोदर राहिले आणि माझं वजन वाढू लागलं. बाळाच्या आरोग्यासाठी मला पंजिरी, तूप, ड्रायफ्रूट्स असे पदार्थ खायला दिले गेले. त्यामुळे माझं वजन हळूहळू वाढू लागलं आणि ते सुमारे 92 किलोपर्यंत पोहोचलं,` असं सुप्रीत कौर यांनी `आज तक`शी बोलताना सांगितलं.
`सिझेरियननंतर मला बाळ झालं तेव्हा माझं वजन इतकं वाढलं होतं, की मी स्वतःला ओळखू देखील शकत नव्हते. भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी वजन कमी करणं गरजेचं आहे, असं मला वाटू लागलं; पण बाळाच्या फीडिंगमुळे मला जेवण कमी करता येत नव्हतं. प्रेग्नन्सीनंतर 10 ते 12 किलो वजन वाढणं हे सामान्य आहे; पण माझं वजन 25 ते 30 किलोने वाढलं होतं. बाळ जसजसं मोठं होऊ लागलं, तसा मी वजन कमी करण्याचा विचार सुरू केला. धावणं आणि वेटलॉसविषयीची माहिती इंटरनेटवर वाचली. या गोष्टी केल्यानं माझं 6 ते 7 किलो वजन कमी झालं. त्यानंतर मी फेसबुकवर (Facebook) एक फिटनेस ग्रुप जॉइन केला. तसंच फिटनेसचा बेसिक कोर्सही केला. हा कोर्स केल्यानंतर वेटलॉसविषयीच्या गोष्टी बारकाईनं अभ्यासल्या आणि त्यानंतर अडीच वर्षांत सुमारे 35 किलो वजन कमी केलं. सध्या माझं वजन 57 किलो आहे,` असं सुप्रीत यांनी सांगितलं.
`वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम मी धावणं (Running) सुरू केलं; मात्र फिटनेसबाबत कोर्स केल्यानंतर मी घरीच वर्कआउट सुरू केलं. होम वर्कआउटमध्ये मी बॉडी वेट एक्सरसाइज (Body weight exercises) करायचे. वजन उचलण्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाल्यावर मी 2.5 किलोचे डंबेल्स मागवले आणि एक्सरसाइज सुरू केले. यानंतर माझी क्षमता हळूहळू वाढू लागली. मग मी जिममध्ये जाऊन व्यायाम सुरू केला. पुश-पुल-लेग एक्सरसाइज सुरू केले. मी आठवड्यातले सहा दिवस व्यायाम करत असे. चालण्याच्या व्यायामावरही माझा भर होता. एका दिवसात किमान 10 हजार स्टेप्स चालण्याचा माझा प्रयत्न असायचा. दिवसभर सक्रिय राहण्यासाठी मी एवढ्या स्टेप्स चालत असे,` असं सुप्रीत यांनी नमूद केलं.
सुप्रीत म्हणाल्या, `मी वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट केला नाही. माझ्या शरीराच्या गरजेनुसार आहार घेतला. मी मेंटेनन्स कॅलरीपेक्षा (Maintenance calories) 200 ते 300 कॅलरीज कमी घेत होते. जसजसं वजन कमी होत गेलं, त्यानुसार मी कॅलरीज कमी करत गेले. त्यानंतर मी कॅलरीज कमी करण्याऐवजी फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढवल्या. आहारात घरात बनवलेले पदार्थ समाविष्ट केले. वजन कमी करताना मी आहारात अंडी, पनीर, स्पाउट्स, डाळ, चपाती, भाज्या घेत होते. आताही माझा आहार असाच आहे. पहिल्यापेक्षा माझे स्नायू अधिक पीळदार झाले असल्याने मी आता 2500 ते 2600 कॅलरीज घेते. नाश्त्यावेळी मी ब्रेड-ऑम्लेट खात असे. दुपारच्या जेवणात डाळ, चपाती, भात आणि सोया चंक असायचे. स्नॅक्स म्हणून चहा, फुटाणे आणि फळं खायचे. याशिवाय रात्रीच्या जेवणात डाळ, भात आणि चिकन खायचे.`
`वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटची गरज नाही. शरीराच्या गरजेपेक्षा 200 ते 300 कॅलरीज कमी खाणं गरजेचं आहे. याला कॅलरी डेफिसिट म्हणतात. डाएटसोबत फिजिकल अॅक्टिव्हिटी (Physical Activity) गरजेच्या आहेत. यामुळे कॅलरी बर्न व्हायला मदत होते. यासोबतच तुम्ही गरजेनुसार जिममध्ये जाऊन व्यायाम करू शकता. ताण-तणाव व्यवस्थापन करणं, संयम ठेवणं, पुरेशी झोप घेणं, योग्य आणि पोषक आहाराच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती अगदी सहजपणे वजन कमी करू शकते,` असं सुप्रीत नमूद करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips