Home /News /lifestyle /

परीक्षेपूर्वी आईच्या उपचारांसाठी स्कूटीवरून केला 300 किमीचा प्रवास; 87 टक्के मिळवणाऱ्या शुभांगीची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

परीक्षेपूर्वी आईच्या उपचारांसाठी स्कूटीवरून केला 300 किमीचा प्रवास; 87 टक्के मिळवणाऱ्या शुभांगीची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

दहा वर्षांपूर्वीच वडील गेले आणि अंगणवाडी सेविका असलेली आईसुद्धा आजारी पडली. परीक्षा तोंडावर आलेली आणि त्यात Coronavirus मुळे लॉकडाऊन सुरू झालं. अशा अवस्थेत बारावीची परीक्षा देणाऱ्या शुभांगीच्या जिद्दीची कहाणी

    इंदौर, 25 सप्टेंबर : दहा वर्षांपूर्वीच वडील गेले आणि मार्च महिन्यात अंगणवाडी सेविका असलेली आईसुद्धा आजारी पडली. बोर्डाची परीक्षा तोंडावर आलेली असतानाच आई अंथरुणावर होती. घरात उपचाराला पैसे नाहीत. त्यात Coronavirus चा कहर सुरू झाला आणि देशव्यापी लॉकडाऊन (lockdown) सुरू झाला. तेव्हा बारावीतल्या शुभांगी पाटीलने मोठा निर्णय घेतला. आईला स्कूटीवर मागे बसवून 300 किमीचा प्रवास करत तिने मामाकडे आणून सोडलं. मध्य प्रदेशातून उपचारांसाठी आईला महाराष्ट्रात सोडल्यानंतर ती तडक स्कूटी चालवत इंदौरला परतली आणि बारावीची परीक्षा दिली. या जिद्दी शुभांगीला बोर्डाच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळाले आहेत. दुर्दैवाने शुभांगीच्या आईचं जूनमध्ये निधन झालं आणि आता शुभांगीबरोबर लहान बहीण तेवढी राहिली आहे. आजारी आईला उपचारांसाठी इंदौरहून स्कूटरवर महाराष्ट्रात घेऊन जाणाऱ्या शुभांगी पाटीलची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. या बातमीनुसार, शुभांगीला आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री योजनेअंतर्गत 25 हजार रुपयांची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या लॅपटॉप योजनेसाठी ती पात्र ठरली आहे. शुभांहीच्या जिद्दीची ही कहाणी इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. शुभांगी पाटील ही इंदौरमध्ये राहते. तिच्या वडिलांचं 2009 मध्ये निधन झालं. त्यांना किडीनीचा विकार होता़. दुसरा धक्का म्हणजे अंगणवाडी सेविका असलेल्या तिच्या आईचं जून महिन्यात निधन झालं. आईच्या उपचारांचा खर्च झेपणारा नव्हता, म्हणून तिला मामाकडे घेऊन जायचं ठरलं. पण त्याचदरम्यान Coronavirus मुळे लॉकडाऊन सुरू झाला होता. आता जाणार कसं? प्रायव्हेट गाडीचा खर्च परवडणारा नव्हता. त्यात परीक्षा तोंडावर आलेली. आईला दुचाकीवरूनच मामांकडे नेण्याचं तिनं ठरवलं. आई आजारी पडली तेव्हा तिच्याकडे आणि तिच्या बहिणीकडे मिळून फक्त 500 रुपये शिल्लक होते. त्यात उपचार काय औषधंसुद्धा घेणं परवडणारं नव्हतं. इंदौरहून महाराष्ट्रात चोपडा इथे आईला नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्कूटरवर आईला मागे घेऊन 300 किलोमीटरचा प्रवास शुभांगीने केला आणि पुन्हा 12 वीच्या परीक्षेसाठी तेवढंच अंतर पार करत ती इंदौरमध्ये परतली. म्हणजे एकूण 600 किलोमीटरचा प्रवास तिनी स्कूटरवर केला. या परिस्थितीत परीक्षा देऊनही तिला बारावीला चांगले गुण मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री लॅपटॉप योजनेअंतर्गत तिला 25000 रुपयांची मदत मिळाली आहे. ही रक्कम कॉलेजच्या शिक्षणासाठी वापरण्याचा मानस शुभांगीने व्यक्त केला आहे. टाइम्सच्या बातमीनुसार या वर्षी इंदूर विभागातून 1964 विद्यार्थी या योजनेअंतर्गत पात्र ठरले आहेत. यातील 806 विद्यार्थी हे इंदूर जिल्ह्यातील आहेत. Corona लॉकडाऊन काळाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांना दुचाकीवर असा लांबचा प्रवास करणं भाग पडलं होतं. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एका व्यक्तीने मुलाला परीक्षेस जाण्यासाठी बस न मिळाल्याने त्याला घेऊन सायकलवर 100 किमीचा प्रवास केला होता़. मुलगा वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचला. बैदीपुरा गावातील शोभारमण या कामगाराने आपल्या मुलाला सायकलवर घेऊन 105 किमीचं अंतर पार केलं होतं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता़. सात तासांत त्यांनी हे अंतर पार केलं होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या