Love Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम

Love Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम

1936ला लिहिलेल्या पत्राची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांनी केली होती, 'माझ्या हृदयाची राणी. तुझ्यामुळेच मी माझ्या देशापासून दूर राहिल्याचं दु:ख विसरू शकलोय.'

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : तू माझ्या आयुष्यातली पहिली महिला आहेस, जिच्यावर मी प्रेम केलं. देवाजवळ हीच इच्छा, की तूच माझ्या आयुष्यातली शेवटची स्त्री असू दे


इतकं रोमँटिक लिहिलंय सुभाषचंद्र बोस यांनी. वर्ष होतं 1934. सुभाषचंद्र बोस या महिलेच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तिलाच त्यांनी इतक्या सुंदर ओळी लिहिल्या.  1936ला लिहिलेल्या पत्राची सुरुवात त्यांनी केली होती, 'माझ्या हृदयाची राणी. तुझ्यामुळेच मी माझ्या देशापासून दूर राहिल्याचं दु:ख विसरू शकलोय.'

याच पत्रात त्यांनी लिहिलं, 'एक स्त्री मला प्रेमाच्या बंधनात इतकी बांधू शकते, हा विचार मी कधीच केला नव्हत. अनेकींनी माझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाकडेच पाहिलं नाही.'

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1934पासून जिवंत असेपर्यंत एमिली शेंक्ले यांना खूप पत्र लिहिली. नंतर 200हून अधिक पत्र मिळाली आणि त्यांना प्रकाशितही केलं गेलं. सुभाषचंद्र बोस यांची ओळख लंडनच्या आयसीएस परीक्षेसाठी होतीच, पण त्यांच्यावर अनेक स्त्रिया जीव ओवाळून टाकायच्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व जोशपूर्ण, बुद्धिमान होतं. त्यांच्यात नेतृत्वगुण होते. त्यांच्यात असं काही अनोखेपण होतं, जे त्यांना इतरांपासून उठावदार बनवायचं. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकींपासून त्यांनी स्वत:ला दूरच ठेवलं.

एकही दिवस तुझ्या आठवणीशिवाय जात नाही

इकोनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीच्या 2005च्या मासिकात शर्मिला बोस यांनी  लव इन द टाइम ऑफ वारः सुभाष चंद्र बोस जर्नी टू नाझी जर्मनी (1941)अँड टुवार्ड्स द सोवियत युनियन (1945)  या शीर्षकाखाली  सुभाषचंद्रांनी एमिली यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा केलीय.

या लेखानुसार 1937मध्ये सुभाषचंद्र आपल्या प्रेयसीला पत्र लिहायचे. ते लिहायचे, ' असा एकही दिवस जात नाही की मला तुझी आठवण येत नाही. तू नेहमीच माझ्या आठवणीत असतेस. तुझ्याशिवाय मला कसलीच आठवण येत नाही. मला सध्या खूप एकटं आणि उदास वाटतं.' त्यादिवसात सुभाषचंद्र यांची आत्मकथा लिहीत होते लियोनार्डो गाॅर्डन. त्यांनाही सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेमाची जाणीव झाली होती.

पहिली भेट

हे प्रेम समजून घेण्यासाठी आपल्याला 1934मध्ये जावं लागेल. सुभाषचंद्र पहिल्यांदा आॅस्ट्रेलीयन तरुणीला भेटले होते. ती होती एमिली. 1934मध्ये सुभाषचंद्र यांची प्रकृती बिघडली होती. ब्रिटिश सरकारनं त्यांना भारतातून निर्वासित केलेलं. म्हणून ते युरोपला गेले होते. त्यांना व्हिएन्नामध्ये राहायला सांगितलेलं, म्हणजे त्यांची बिघडलेली तब्येतही सुधारेल. त्यावेळी ते भारतातले नेते आणि कार्यकर्ते यांना पत्र पाठवायचे. त्यावेळी इंग्लिश येणारा टायपिस्ट त्यांना हवा होता. त्यांचे मित्र माथुर यांनी एमिलीची ओळख करून दिली.

...आणि जुळले प्रेमाचे बंध

एमिली सुंदर आणि तरुण होती. तिला इंग्लिश टायपिंग यायचं. तिला नोकरीचीही गरज होती. सुभाषचंद्र यांची सहाय्यक म्हणून तिनं काम सुरू केलं. दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले. प्रेमात पडले. सुभाषचंद्र भारतात परतले, तेव्हा ते एमिलीला पत्र लिहायला लागले. आपल्या व्यग्र दिनचर्येत ते वेळ काढायचेच.

एमिली आणि सुभाषचंद्र यांचा गुप्त विवाह

1937मध्ये एमिलीच्या आठवणींनी सुभाषचंद्रांचं काहूर वाढलं. बेचैनी वाढली. ते 1937मध्ये आॅस्ट्रियाला पोचले. त्यावेळी एमिलीनं सुभाषचंद्रांची आत्मकथा लिहिणाऱ्या लेखकाला आपण लग्न केल्याची माहिती दिली. या लग्नात ना कुणी भटजी होती, की कुठलं मंदिर. दोघांनीही एकमेकांना पती-पत्नीच्या रुपात स्वीकार केला. दोघांनी उगाच वादंग माजू नये म्हणून आपलं लग्न गुप्त ठेवलं होतं. सुभाषचंद्र त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष बनणार होते. लग्नानंतर ते काही दिवस एमिलीसोबत होते. 1938च्या जानेवारीत ते भारतात परतले. नेहरूही त्यावेळी युरोपला होते. कमला नेहरूंचं निधन झालं तेव्हा सुभाषचंद्र व्हिएन्नात होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला ते गेले होते.

लेखक गार्डननं लिहिलंय, त्यांचं लग्न खरंच झालं होतं का याचा पुरावा कधीच सापडला नव्हता. काहींनी त्यांचं लग्न 1942मध्ये झाल्याचं म्हटलंय.


नेहरूंना लग्नाबद्दल माहीत होतं

त्यावेळी गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात दुरावा वाढत होता. त्यांच्या लग्नाबद्दल फक्त नेहरूंना माहीत होतं. बोस यांच्या कुटुंबालाही ते 40च्या शतकात कळलं. म्हणूनच नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवेसाठी नियमित ठराविक रक्कम पाठवायला सुरुवात केली. ती 6 हजारापर्यंत होती.

सुभाष आणि एमिलीचे संबंध 9 वर्ष टिकले. दोघं जेमतेम 3 वर्ष एकत्र राहिले. असं म्हणतात 1941 ते 43 काळात सुभाषचंद्रांच्या जवळच्या व्यक्तींना या लग्नाबद्दल माहीत होतं. 29 नोव्हेंबर 1942 रोजी त्यांची मुलगी अनिताचा जन्म झाला. तेव्हा आपला मोठा भाऊ ळरतला त्यांनी या लग्नाची माहिती दिली. पण बोस कुटुंब दुसरं महायुद्ध सुरू असल्यानं एमिलीला भेटू शकले नव्हते. पण 1940मध्ये त्यांची भेट झाली.

मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजे 8 जानेवारी 1943 रोजी सुभाषचंद्र जपानला निघाले. एमिली आणि मुलगी अनिता यांची ही शेवटची भेट ठरली कारण 1945मध्ये विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

बोस कुटुंबाची भेट

सुभाषचंद्र बोस यांचे भाऊ शरतचंद्र बोस यांचे नातू सुगाता बोस यांनी 'हिज़ मेजेस्टी अपोनेंट्स' पुस्तक लिहिलं. त्यात सुभाषचंद्र बोस यांच्या निधनानंतर सगळं कुटुंब एमिलीला भेटलं. तिला कोलकत्याला यायलाही सांगितलं. पण एमिली आपल्या आईची काळजी घेत होती. तिनं नम्र नकार दिला. एमिलीनं आपल्या मुलीला तिच्या वडिलांबद्दलची छोटी माहितीही दिली.

सुभाषचंद्रांची मुलगी अनिता

अनिता आणि एमिली यांचा बोस कुटुंबाशी चांगला संपर्क होता. अनिता 1960मध्ये कोलकत्यालाही आलेली. नंतर तिनं जर्मनीच्या आगसबर्ग युनिव्हर्सिटीत मार्टिबरोबर लग्नही केलं. इकाॅनाॅमिक्सची  प्राध्यापक झाली.  पुढे अमिता महापौरही बनली.

प्रेमाची गहराई

सुभाषचंद्र बोस आणि एमिलीचं प्रेम अद्वितीय होतं. बोस यांचं पहिलं प्रेम देश होता. त्याच्या आड एमिली कधी आली नाही.


- संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 09:03 PM IST

ताज्या बातम्या