नवी दिल्ली, 27 जानेवारी: प्रदूषण हा शहरात राहणाऱ्या लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रगतीबरोबर फायदे येतात तसेच तोटेही. प्रदूषणामुळे मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत आहे. अतिशय प्रदूषित भागात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये दृष्टिदोष निर्माण होऊन त्यांना कायमचे अंधत्व येण्याचा धोका निर्माण झाला आहे. एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (AMD) ही समस्या निर्माण होण्याची खूप मोठी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार सामान्य प्रदूषित परिसरातील लोकांपेक्षा अतिशय प्रदूषित परिसरात राहणाऱ्या लोकांना एएमडी होण्याचा धोका 8 पट अधिक असतो.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील प्राध्यापक आणि या अभ्यासातील सहअभ्यासक पॉल फॉस्टर म्हणाले, ‘अतिप्रदूषित हवेतील पार्टिक्युलेट मॅटर किंवा रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कणांमुळे डोळ्यांचे विकार होऊ शकतात असा निष्कर्ष आम्ही या संशोधनातून काढला आहे. प्रदूषणाचा जसा फुप्फुसांवर घातक परिणाम होतो तसाच तो डोळ्यांच्या आरोग्यावरही होतो आणि मोठ्या लोकसंख्येला त्याचा फटका बसू शकतो. तसंच प्रदूषणाचा आपला संपर्क कमी काळासाठी जरी आला तरीही डोळ्यांचे आजार संभवतात असंही आमच्या लक्षात आलं आहे.’
(हे वाचा-या महिलेनं 20 वर्ष करत असलेली नोकरी सोडत सुरू केला बिझनेस, आज आहे करोडपती)
उच्च आर्थिक उत्पन्न (high-income countries) असलेल्या देशामध्ये 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या एएमडीच्या रुग्णांना कायमचं अंधत्व येण्यासाठी प्रदूषण महत्त्वाचं कारण ठरत आहे. या अभ्यासातील अंदाजानुसार 2040 पर्यंत या रुग्णांची संख्या 300 मिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाढणारं वय, धुम्रपान आणि जेनेटिक मेक-अप या घटकांमुळे हा आजार होण्याचा धोका अधिक संभवतो.
या अभ्यासासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधील 40 ते 69 वयोगटातील 115954 जणांची माहिती घेतली होती. हा अभ्यास सुरू झाला तेव्हा 2006 मध्ये या सर्वांना डोळ्यांची कुठलीही समस्या नव्हती. एएमडीची लक्षणं आहेत का असं डॉक्टरांनी या सर्वांना विचारणा केली होती. यापैकी 53 हजार 602 जणांच्या रेटिनाच्या जाडीमध्ये किंवा लाइट रिसेप्टर्सच्या संख्येमध्ये बदल झाल्याचं लक्षात आलं. ही दोन्ही एएमडीची लक्षणं आहेत.
(हे वाचा-मास्क वापरणं Must! कोरोनाच्या प्रसाराबाबतच्या अभ्यासातून समोर आलेलं कारण वाचा)
ओलावा असलेल्या हवेत पार्टिक्युलेट मॅटर (PM2.5), नायट्रोजन डायऑक्साइड (NO2), आणि नायट्रोजन ऑक्साइड (NOx) असल्याचंही त्यांनी निरीक्षण केलं. ज्या भागातील प्रदूषित हवेत पार्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण खूपच जास्त आहे अशा परिसरात राहणाऱ्या व्यक्तींना एएमडी होण्याची शक्यता जास्त असते. कोर्स पार्टिक्युलेट मॅटरव्यतिरिक्त इतर सर्व प्रदूषकांमुळे डोळ्याच्या रेटिनल स्ट्रक्चरवर परिणाम होऊ शकतो.