'तो'ची 'ती' झाली आणि तिनं सौंदर्यस्पर्धाही जिंकली

वयाच्या ३२व्या वर्षापर्यंत अभिनव आपण चुकीच्या शरीरात जगतोय या भावनेखाली दिवस घालवत होता. अखेर सेक्स चेंज सर्जरीनंतर तिला हक्काचं शरीर मिळालं. मुंबईत नुकत्याच झालेल्या ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सानियाची ही गोष्ट.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2018 03:37 PM IST

'तो'ची 'ती' झाली आणि तिनं सौंदर्यस्पर्धाही जिंकली

रेश्मा कश्यप

सिमला (हिमाचल प्रदेश), २४ ऑक्टोबर : वयाच्या ३२व्या वर्षापर्यंत अभिनव आपण चुकीच्या शरीरात जगतोय या भावनेखाली दिवस घालवत होता. त्याचं मन आपण स्त्री असल्याचं सांगत होतं. भावनाही तशाच होत्या पण त्याला वाढवलं गेलं होतं एक पुरुष म्हणून. २ वर्षांपूर्वी अखेर तिला तिच्या हक्काचं शरीर मिळालं... समाज ज्याला 'तो' म्हणत होता त्याची 'ती' झाली... सानिया म्हणून ओळखली जाऊ लागली.  मुंबईत नुकत्याच झालेल्या ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सानिया सूदची ही गोष्ट.

तिनं २ वर्षांपूर्वी सेक्स चेंज सर्जरी केली आणि अभिनवची सानिया झाली. हिमाचल प्रदेशातल्या शिमल्याला राहणारा अभिनव लहानपणापासूनच थोडा वेगळा होता. त्याला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नटण्या- सजण्याची हौस होती. मुलीसारखे कपडे घालून नटायला त्याला आवडायचं. स्त्रीमनासारख्याच भावना मनात यायच्या, पण शारीरिक वाढ मात्र पुरुषासारखी होती. याला शास्त्रीय भाषेत जेंडर डिस्फोरिया म्हणतात.

जेंडर डिस्फोरिया म्हणजे काय?

आपण नक्की कोण आहोत, आपल्याला काय झालंय याची स्वतःला जाणीव होईपर्यंत अभिनव २५ वर्षांचा झाला होता.

Loading...

जेंडर डिस्फोरिया हा काही आजार नाही, ती एक शारीरिक ठेवण आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी जेंडर डिस्फोरिया असल्याचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय सेक्स चेंज सर्जरी होऊ शकत नाही.

'दुसऱ्या मुलीचं आयुष्य बरबाद करायचं नव्हतं'

सुरुवातीला घरच्यांनी अभिनव (आताची सानिया) काय सांगतोय याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तरुण वयात मुलानं सेक्स चेंज सर्जरीविषयी सांगितलं तर उलट पालकांनी त्याचं लग्न लावून द्यायचंच ठरवलं. 'पण मला कुठल्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य बरबाद करायचं नव्हतं. त्यामुळे मी लग्नाला अजिबात तयार झाले नाही',  सानिया सांगते. शेवटी कसेबसे आईवडील या उपचारांसाठी तयार झाले. समाज काय म्हणेल, नातेवाईक नावं ठेवतील याचीच पालकांना भीती होती.  अखेर २०१६सालच्या सुरुवातीला अभिनव उपचार सुरू झाले. दुसऱ्याच वर्षी त्याचे वडील गेले. आता अभिनवची सानिया झाल्यानंतर मात्र आईला तिचा अभिमान वाटतो. आईनं आता मात्र तिला पूर्ण पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे.

शाळेपासूनच संघर्ष

मुंबईत झालेल्या ट्रान्सजेंडर क्वीन स्पर्धेत सानिया दुसरी आली आणि सगळ्या नातेवाईकांतच ती अभिमानाचा विषय ठरली. पण इथपर्यंतचा सानियाचा संघर्ष काही सोपा नव्हता . शाळेत अभिनव कसा चालतो, कसा बोलतो यावरून इतर मुलं त्याला चिडवायची. त्यामुळे आपलं बालपण खूप दुःखात गेलं, असं सानिया सांगते. लहानपणीच आपण स्त्री असल्याची जाणीव तीव्र होत असतानाच हा अशा सगळ्या पातळ्यांवर संघर्ष सहन करावा लागतो, असं ती सांगते.

बंगळुरूमध्ये केली ८ वर्षं नोकरी

आपण मुलगी असायला हवं होतं, ही भावना उराशी बाळगलेली असली तरीही सानिया उच्चशिक्षण घेऊन अगदी नोकरी लागेपर्यंत एक पुरुष म्हणूनच वावरली. अभिनव नावानंच त्यानं बंगळुरूमध्ये ८ वर्षं नोकरी केली. पण तिथे त्याच्या गुणवत्तेवर त्याला स्वीकारलं गेलं. सानिया सांगते, 'लोकांच्या मनात प्रचंड पूर्वग्रह असतात. आम्ही पुरुष की बाई की ट्रान्सजेंडर यावरून आमची पत ठरवण्याऐवजी आमच्या गुणवत्तेची कदर करा. आम्हाला सन्मान द्या'

समाजानं स्वीकारावं

सानिया सांगते की, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली होती. मी तशा सधन घरातून आले असल्यानं सेक्स चेंजसारखी महागडी ट्रीटमेंट आणि सर्जरी मला शक्य झाली. पण माझ्यासारख्या इतर अनेक व्यक्तींना हे शक्य होईल असं नाही. त्यांची समाजात हेटाळणीच होते. चुकीच्या शरीरात आपला जन्म झाला ही भावनाच आधी खूप दुःखदायी असते, त्यात समाजानं असं झिडकारलं तर जगणं नको होतं. समाजानं ट्रान्सजेंडर्सना स्वीकारायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 02:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...