नवी दिल्ली, 22 जानेवारी: भारताला लाभलेला इतिहास खूप समृद्ध आहे. इतिहासातील विविध घटना देशातील वैभव-श्रीमंती दाखवणाऱ्या आहेत. भारतातील विविध महाराज आणि महाराणींच्या कथा देखील विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तू, कपडे, साड्या, तलवार, बूट, अंगठ्या, गळ्यातील हार, जोडे याबद्दल आतापर्यंत खूप गोष्टी आपण ऐकल्या आहेत. त्यांच्या अनेक मौल्यवान वस्तूचे संग्रहालय देखील आहेत.
अशीच एक कथा कूचबिहारची महाराणी इंदिरादेवी (Maharani Indira Devi) यांची आहे. दिसायला खूपच सुंदर असलेल्या महाराणी इंदिरा स्वातंत्र्यपूर्व काळात फॅशनमध्ये अग्रेसर होत्या. त्यांच्याकडे असलेल्या हिरेजडीत चपलांविषयी नेहमीच चर्चा झाली. त्यांनी इटलीमधील प्रसिद्ध कंपनीला 100 जोडी चपलांची ऑर्डर दिली होती. यामधील काही चपला हिरेजडीत, रत्नजडीत होत्या
महाराणी इंदिरादेवी त्या काळामध्ये त्या देशातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखल्या जात होत्या. जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवींच्या त्या आई होत्या. त्यांना नटायची खूप आवड होती. परदेशामधील फॅशनबद्दल त्या नेहमी माहिती ठेवायच्या आणि त्या ठिकाणावरुन वस्तू मागवायच्या. त्यांना जुगाराचे देखील व्यसन होते. अनेक हॉलिवूड स्टार्स त्यांचे खूप चांगले मित्र होते. महाराणीने आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये ते सहभागी व्हायचे.
अप्रतिम कलेक्शन
महाराणी इंदिरा देवी यांना चप्पल-बूटांचे खूप आकर्षण होते. त्याकाळामध्ये त्यांच्याकडे बूटांचे अप्रतिम कलेक्शन होते. त्यांनी इटलीमधील 'साल्वातोर फेरोगेमो' या बूटांचे उत्पादन करणाऱ्या प्रख्यात कंपनीला 100 बूटांची ऑर्डर दिली होती. ही कंपनी 20व्या शतकातील सर्वांत प्रसिद्ध डिझायनर कंपनी म्हणून परिचित होती. आज सुद्धा या कंपनीच्या लक्झरी शो-रुम जगभरामध्ये आहेत.
फॅशनची प्रचंड आवड
महाराणी इंदिरा देवी बडोदा राज्याच्या राजकुमारी होत्या. त्यांचा विवाह कूचबिहारचे महाराजा जितेंद्र नारायण यांच्यासोबत झाला होता. इंदिरा देवी नेहमी आपलं सौंदर्य आणि ड्रेसबाबत जागरुक राहायच्या. भारतात सिल्क, शिफॉन साड्याचे ट्रेंड तयार करण्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे. त्या जेव्हा नटून-सजून तयार व्हायच्या तेव्हा त्यांचा लुक डौलदार आणि शाही असायचा.
कूच बिहारची सूत्र सांभाळली
महाराणी इंदिरा देवी यांचा जन्म 1892 साली झाला होता. तर 1968 साली त्यांचे निधन झाले. महाराजा जितेंद्र नारायण यांच्या निधनानंतर त्या कूच बिहार (Cooch Bihar) राज्याच्या रिजेंट झाल्या. मुलगा लहान असल्यामुळे सर्व सूत्र त्यांनी स्वत:च्या हाती घेतली. बरीच वर्षे त्यांनी आपल्या 5 मुलांसोबत कूचबिहारचे कामकाज सांभाळले. इंदिरा देवी यांची सामाजिक जीवनातील सक्रियता अप्रतिम होती. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ युरोपमध्ये घालवला.
लग्न ठरुनही दुसऱ्या व्यक्तीवर होतं प्रेम
बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी संबंधित इंदिरा देवी यांचे लग्न लहानपणीच ग्वाल्हेरचे होणारे राजे माधोराव शिंदे यांच्याशी ठरले होते. या दरम्यान त्या आपल्या लहान भावासोबत 1911 साली दिल्ली दरबारामध्ये आल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची भेट कूचबिहारच्या तत्कालीन महाराजांचे छोटे भाऊ जितेंद्र यांच्याशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या निर्णयामुळे घरचे नाराज होतील, ग्वाल्हेर आणि बडोदामधील राजकीय संबंध बिघडतील हे माहीत असतानाही त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.
स्वत: पत्र लिहून तोडले लग्न
इंदिरा देवींनी स्वत: धाडस दाखवत आपले ठरलेले लग्न मोडले. त्याकाळामध्ये एक 18 वर्षांची राजकुमारी असं काही करेल असे कुणाला वाटले नव्हते. त्यांनी स्वत: आपल्या होणाऱ्या नवऱ्याला पत्र लिहित लग्न करण्यांची इच्छा नसल्याचे सांगितले. इंदिरा देवीच्या या निर्णयामुळे त्यांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ग्वाल्हेरच्या महाराजांनी इंदिरा देवीच्या आई-वडिलांना पत्र लिहीत परिस्थिती समजू शकतो, असं सांगितलं होतं.
कुटुंबीयांचा प्रेमविवाह करण्यास विरोध
महाराणीच्या आई-वडिलांनी तिचे ग्वाल्हेरच्या राजघराण्याशी लग्न तुटल्याचे मान्य केले पण त्यांना महाराणीचे जितेंद्र यांच्याशी लग्न होणे मान्य नव्हते. कारण जितेंद्र यांची प्रतिमा रंगेल राजासारखी होती. त्यांनी जितेंद्र यांना आपल्या मुलीपासून लांब राहण्याचे आदेश दिले होते. पण याचा काही उपयोग झाला नाही. कारण जितेंद्र आणि इंदिरा यांनी लग्न करण्याचा ठामपणे विचार केला होता.
घर सोडून लग्न करण्याचे आदेश
आपल्या मतावर ठाम असणाऱ्या महाराणी इंदिरा देवी यांनी आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. शेवटी इंदिरा देवींच्या आई-वडिलांना हे मान्य करावे लागले. त्यांनी इंदिरा देवी यांना घर सोडून लंडनला जाण्यास सांगितले. त्याठिकाणी इंदिरा देवी आणि जितेंद्र यांचे लग्न झाले. लंडनमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नाला इंदिरा देवींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते. लग्नानंतर जितेंद्रचे मोठे भाऊ महाराजा राजेंद्र नारायण आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. त्यानंतर जितेंद्र कूचबिहारचे महाराजा झाले. दोघांना पाच मुलं झाली. पण मद्यपानाच्या आहारी गेल्यामुळे जितेंद्र यांचे देखील लवकर निधन झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.