मुंबई, 31 ऑक्टोबर : मानसिक आजारांसाठी (mental disease) सोशल मीडियाचा (social media) जास्त वापर बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचं या आधी अनेक संशोधकांनी सांगितलं आहे. मित्र, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी, अप टू डेट राहण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वांत सोपं माध्यम आहे. तरीही या माध्यमांमुळे ती वापरणाऱ्यांमध्ये एकटेपणाची भावना, सायबर बुलिंग करण्याची वृत्ती आणि त्याचा परिणाम होऊन स्वत: ला कमी समजण्याची भावना तसंच झोप उडाल्यामुळे नैराश्य येण्याच्या समस्या वाढल्या आहेत.
सोशल मीडियामुळे थेट डिप्रेशन म्हणजे नैराश्य येत नसलं तरीही त्याच्या वापरामुळे नैराश्याकडे घेऊन जाणाऱ्या सवयी लागतात. लोकं सोशल मीडिया साइट्स वापरताना सगळं जग विसरून जाऊन त्यांच्या स्मार्ट डिव्हाइसमध्ये अडकून पडतात, उशिरा झोपतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही विसरून जातात.
जामा नेटवर्कवर प्रकाशित Association of Screen time and Depression in Adolescent या अभ्यासात किशोरवयीन मुलांच्या जास्त वेळ स्क्रीन पाहण्याशी डिप्रेशनचा काय संबंध आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सातवीतल्या मुलांनी एक तास अधिक स्क्रीन टाइम वाढवला की त्यांना मोठ्या प्रमाणात नैराश्य येत असल्याचं दिसून आलं आहे. एकटेपणा, दु:खी वाटणं तसंच नैराश्य येणं हे प्रकार जाणवत आहेत.
या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आलेला नाही की सोशल मीडियामुळे डिप्रेशनचा त्रास होतो पण तो नियंत्रित वापरणं गरजेचं आहे यावर मात्र हा अभ्यास जोर देतो.
हे वाचा - वर्क फ्रॉम होममध्ये तुमचा छळ होतोय का? आत्ताच 'ही' पावलं उचला !
सोशल मीडिया वापराचे दुष्परिणाम मानसिक आरोग्यावर खूपच घातक आणि नकारात्मक परिणाम करत आहे. नेहमी जाणवणारे दुष्परिणाम असे :
एकटं पडण्याची भीती (Fear Of Missing Out FOMO) – फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या साइट्सचा वापर करणाऱ्यांच्या मनामध्ये उगीच न्यूनगंड तयार होतो की इतर लोक जगण्याचा अधिक आनंद लुटत आहे आणि आपल्यापेक्षा उत्तम आयुष्य जगत आहेत. त्यामुळे सगळे प्रगती करताहेत आणि आपणच मागे राहत आहोत अशी भावना मनात तयार होऊन माणूस स्वत: ला कमी लेखायला सुरुवात करतो. त्यामुळे चिंता वाढते आणि त्यामुळे माणूस सतत सोशल मीडिया साइट्सवरचं आपलं स्टेटस तपासतो. मग गाडी चालवतानाही त्याला आपण जीव धोक्यात घालून स्टेटस चेक करतोय याचं भान राहत नाही.
एकटेपणा – फेसबुक, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या साइट्सचा सतत वापर केल्याने एकटेपणाची भावना मनात बळावते.
डिप्रेशन आणि चिंता – जेव्हा लोकं नात्यांपेक्षा सोशल मीडियाला प्राधान्य देतात तेव्हा त्यांचा लहरीपणा वाढण्याची चिंता आणि डिप्रेशन येण्याची शक्यता वाढते.
सायबरबुलिंग - सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन माध्यमांमध्ये कुणी आपला अपमान केला किंवा टीका केली तर माणसाच्या आत्मसन्मानाला ठेच लागून त्याची मानसिक स्थिती बिघडू शकते. अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर सायबर बुलिंगच्या घटना घडतात आणि त्या वाढत आहेत.
हे वाचा - मानसिक आजार असलेल्यांना COVID-19 चा धोका; बळावतोय गंभीर कोरोना
सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम कमी करण्याचे काही मार्ग:
ऑनलाईन टाइम कमी करा- आपण किती वेळ सोशल मीडिया वापरत आहोत हे दाखवणारं एखादं अॅप वापरा आणि ठराविक वेळेनंतर सोशल मीडियाचा वापर बंद करा. घरातील कामात मन रमवण्याचा प्रयत्न करा.
सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद करा – नोटिफिकेशन्स बंद केल्यामुळे सारखं तुमचा फोन चेक करण्याची तुमची इच्छा कमी करायला मदत होईल.
कुटुंबीय आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवा – कुटुंबीय आणि मित्रांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत आनंदात क्षण घालवा आणि प्रत्येक किरकोळ गोष्टींचे फोटो काढणं बंद करा.
सोशल मीडियाचा विचारपूर्वक वापर करा – FOMO किंवा नकारात्मकता येऊ नये म्हणून सतत दुसऱ्याशी तुलना करणं थांबवा. तुमची सर्जनशीलता आणि कौशल्य वाढवण्यासाठी सकारात्मक सोशल मीडिया साइट्वर लक्ष केंद्रीत करा.