मुंबई, 28 नोव्हेंबर : जगभरात बीअर (Beer) पिणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. बीअर अन्य मद्यांच्या तुलनेत कमी नुकसानकारक आहे असा दावा केला जातो, त्यामुळे अगदी सहजपणे बीअर घेतली जाते. अनेक जणांना तर दिवसभराच्या कामानंतर दररोज एक ग्लास बीअर घेण्याची सवय असते. बीअरचे अनेक फायदे असल्याचं काही अभ्यासांमधून समोर आलं आहे. तरीही बीअरमध्ये थोड्या प्रमाणात का होईना अल्कोहोल असतंच. त्यामुळे बीअर दररोज किंवा नेहमी घेणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
बीअर पिणं हे सध्या अगदी नॉर्मल झालं आहे. अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते गृहिणींपर्यंत कोणीही बीअर पितं. बीअरमध्ये अन्य मद्यांच्या तुलनेत फक्त पाच ते 12 टक्के अल्कोहोल असतं. अल्कोहोलचं प्रमाण कमी असलं, तरी त्यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. एका पिंट बीअरमध्ये जवळपास 150 कॅलरीज असतात. अल्कोहोलचं प्रमाण वाढलं की कॅलरीजही वाढतात. सहसा बीअर पिताना कुणी एकाच बाटलीवर थांबत नाही. एका वेळेस एकापेक्षा जास्त बाटल्या बीअर प्यायली जातेच. त्यामुळे एकूण कॅलरीजचा विचार केला तर भरपूर कॅलरीज पोटात जातात.
अर्थातच अल्कोहोलमधून पोटात जाणाऱ्या कॅलरीज आणि खाद्यपदार्थांमधून मिळणाऱ्या कॅलरीज (Calories) यात फरक असतोच. अल्कोहोलमधून पोटात जाणाऱ्या कॅलरीज शरीराच्या मध्यभागात जमा होतात आणि त्यामुळे बीअर बेली (Beer Belly) तयार होतं. पोट वाढणं आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि पोट कमी करणं अत्यंत अवघड, पण महत्त्वाचं आहे.
बीअर पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart) चांगलं असतं असा दावा अनेक अभ्यासांमधून करण्यात आला आहे; मात्र प्रमाणापेक्षा जास्त बीअर पित असाल, तर मात्र ते नक्कीच धोकादायक आहे. जास्त बीअर प्यायल्यानं हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रोक, उच्च रक्तदाब, टाइप-2 मधुमेह, आणि हृदयाचे ठोके अनियमित होणं असे धोके वाढू शकतात. विशेष म्हणजे नियमित दारू पिणाऱ्यांच्या तुलनेत आठवड्यातून दोनदा जास्त दारू पिणाऱ्यांना धोका जास्त असल्याचं समोर आलं आहे. यामुळे रक्तदाब वरखाली होऊ शकतो.
पुरुषांसाठी दररोज दोन ग्लास आणि महिलांसाठी रोज एक ग्लास हे बीअरसाठीचं मध्यम प्रमाण मानलं जातं. यापेक्षा जास्त प्रमाण झालं तर त्यानं नुकसान होतं. दारू जास्त प्रमाणात प्यायल्यानं उच्च रक्तदाब आणि किडनीचे आजार होऊ शकतात.
बीअर मूत्रवर्धक असते आणि त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. त्यामुळे डिहायड्रेशनही होऊ शकतं. त्यानं शरीराचं संतुलन बिघडू शकतं. आतड्यांवर परिणाम होतो आणि किडनी स्टोन किंवा किडनी निकामी होणं असे परिणामही होऊ शकतात.
नेहमी बीअर प्यायल्यानं काही व्हिटॅमिन्स आणि खनिजांचं सेवन वाढतं. कारण शरीरातून तशी मागणी वाढते. जेव्हा ही मागणी पूर्ण होत नाही तेव्हा संपूर्ण आरोग्यावरच वाईट परिणाम होतो. अल्कोहोल पचवण्यासाठी बी व्हिटॅमिनसारख्या काही अतिरिक्त पोषक तत्त्वांचीही गरज भासते. दारू प्यायल्याने रात्री चांगली झोप येते असं म्हटलं जातं; पण हे खरं नाही. बीअर प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला चांगली झोप लागू शकते; पण नेहमी बीअर प्यायल्याने तुम्हाला शांत झोप लागेल असं नाही. संध्याकाळी बीअर प्यायलात, तर दिवसा तुम्ही तुमचं काम एकाग्रतेनं करू शकत नाही, थकवाही जाणवतो. म्हणजेच बीअर कधीकधी झोप आणि मूड असं दोन्ही खराब करते. अती दारू पिणाऱ्यांना रात्री झोप न येण्याची समस्या भेडसावते. म्हणजेच झोप शांत येण्यासाठी बीअर पिणं हा काही उपाय होऊ शकत नाही.
बीअर प्यायलानं आयुष्य वाढतं, वेदना कमी होतात आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होऊ शकतो, असं काही अभ्यासांमधून समोर आलं आहे; पण तरीही बीअरमध्ये काही प्रमाणात का होईना अल्कोहोल असतंच. अल्कोहोलचं नेहमी सेवन केलं तर ते शरीरासाठी चांगलं नसतंच. त्यामुळे रोज बीअर पिण्याची सवय असेल तर सावधान!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.