• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • रोज 10 हजार पावलं चालणं आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?

रोज 10 हजार पावलं चालणं आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?

स्वतःला फिट (Fitness), तंदुरुस्त राखण्याचं महत्त्व कोरोना काळात लोकांना चांगलंच पटलं आहे. निरोगी राहण्यासाठी लोक बरंच काही करत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दररोज (Walking) 10 हजार पावलं चालणं.

  • Share this:
मुंबई, 13 जुलै : स्वतःला फिट (Fitness), तंदुरुस्त राखण्याचं महत्त्व कोरोना काळात लोकांना चांगलंच पटलं आहे. निरोगी राहण्यासाठी लोक बरंच काही करत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दररोज 10 हजार पावलं चालणं. हा उपाय शरीरासाठी खूपच फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं; पण लोक खरंच दररोज एवढं चालतात (Walking) का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. अमेरिका, कॅनडा यांसारख्या पाश्चिमात्य देशांत तर बहुतांश वयस्कर व्यक्ती खूप प्रयत्न करूनही दिवसाला जास्तीत जास्त पाच हजार पावलं चालतात. मग, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी खरंच दररोज 10 हजार पावलं चालणं आवश्यक आहे का? की त्याशिवायही तंदुरुस्त राहता येऊ शकतं? फिटनेस ट्रॅक (Fitness Tracking Gadgets) करणारी बहुतांश उपकरणं असं दाखवतात, की प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज 10 हजार पावलं चालायला हवं. अनेक लोक यावर विश्वास ठेवतात आणि तेवढं चालायचा प्रयत्नही करतात. काही जण त्यात यशस्वी होतात, तर अनेक जण हे लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीत. या अनेक लोकांत तुमचाही समावेश होतोय का? पण त्यामुळे चिंतित होण्याची काही गरज नाही. कारण 10 हजार पावलं चालण्याच्या गोष्टीला वैज्ञानिक आधार नाही. हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेतले प्राध्यापक डॉ. एई मिन ली यांनी सांगितलं, की 10 हजार पावलं चालण्याची संकल्पना जपानमध्ये 60च्या दशकात सुरू झाली होती. 1964 मध्ये टोकियोत (Tokyo) झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान जपानमधले नागरिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी बरंच काही करू लागले होते. त्या वेळी घड्याळ निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने एक पेडोमीटर तयार केला होता. त्याच्या चित्रावर एक पुरुष चालताना दिसत होता आणि त्यासोबत जपानी भाषेत लिहिलं होतं - '10 हजार पावलं.' यातून चालण्याचं एक उद्दिष्ट देण्यात आलं होतं आणि ते अगदी सहज म्हणून देण्यात आलं होतं; मात्र काही वर्षांत ही संकल्पना जगभर पोहोचली. फिटनेट ट्रॅकर्सच्या उत्पादकांनी कोणत्याही संशोधनाशिवायच ट्रॅकर्ससोबत असं लिहायला सुरुवात केली, की दररोज 10 हजार पावलं चालणं आरोग्यासाठी चांगलं असतं; मात्र विज्ञान सांगतं, की निरोगी राहण्यासाठी एवढी पावलं दररोज चालण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातला एक अभ्यास गेल्या वर्षीच करण्यात आला होता. त्यात वेगवेगळ्या देशांमधल्या आणि तरुण, तसंच मध्यम वयातल्या पाच हजार लोकांनी सहभाग घेतला होता. ज्या व्यक्ती दररोज 8 हजार पावलं चालत होत्या, त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता खूप कमी चालणाऱ्या व्यक्तींएवढीच होती, असं त्या अभ्यासात आढळलं. त्यावरून हे सिद्ध होतं, की जास्त चालल्यामुळे तुम्ही जास्त निरोगी राहाल, या समजाला वैज्ञानिक आधार नाही. तसं पाहायला गेलं, तर दररोज 10 हजार पावलं चालू शकणाऱ्यांची संख्या कमीच आहे. कॅनडा आणि अमेरिकेत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झालेल्या लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं, की दररोज 10 हजार पावलांचं उद्दिष्ट दीर्घ काळासाठी देण्यात आलं, तर लोक चालणंच बंद करतात. स्वतःचं उद्दिष्ट ठरवून नंतर ते पूर्ण करू न शकल्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे अनेक विकारांचा धोका वाढतो. त्यामुळे शास्त्रज्ञ आता 10 हजार पावलांऐवजी छोटं उद्दिष्ट ठेवण्यासंदर्भात काम करण्याची गरज व्यक्त करत आहेत. त्यासोबत व्यायाम आणि संतुलित आहार यांची जोड असेल, तर विचित्र लाइफस्टाइलमुळे होऊ शकतील असे विकार होण्याची शक्यता कमी होते. अमेरिका, कॅनडा (USA, Canada) यांसारख्या विकसित देशांतल्या नागरिकांमध्ये आळशीपणा मोठ्या प्रमाणावर आहे, असं अभ्यासात आढळून आलं आहे. यापूर्वीही ही गोष्ट समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वेगवेगळ्या देशांतले नागरिक शारीरिकदृष्ट्या किती सक्रिय (Physically Active) आहेत, याचं रँकिंग जाहीर केलं होतं. युगांडाचे (Uganda) नागरिक सर्वांत जास्त मेहनती आणि सक्रिय असल्याचं त्यात जाहीर करण्यात आलं होतं. त्या देशाचे केवळ 5.5 नागरिक आवश्यक त्या प्रमाणात सक्रिय नसल्याचं आढळलं होतं. या 168 देशांच्या यादीत अमेरिकेसह अनेक संपन्न देश मागच्या स्थानावर होते. त्या देशांमधले निम्म्याहून अधिक प्रौढ नागरिक शारीरिक व्यायाम (Exercise) करत नाहीत. भारताची परिस्थिती काही फारशी चांगली नाही. भारत या यादीत 117 व्या स्थानावर आहे. आपल्या देशातले 34 टक्के नागरिक शारीरिकदृष्ट्या आवश्यकतेएवढे सक्रिय नाहीत. यापूर्वी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) केलेल्या संशोधनातही भारताला (India) सर्वांत आळशी देशांच्या (Lazy Countries) यादीत टाकलं होतं. या देशांमध्ये भारत 39व्या स्थानावर होता. भारतातले नागरिक दररोज सरासरी 4297 पावलं चालतात. हाँगकाँगमधले नागरिक दररोज सर्वांत जास्त म्हणजे सरासरी 6880 पावलं, इंडोनेशियातले नागरिक दररोज सरासरी 3513 पावलंच चालतात. त्यामुळे त्या देशाचा समावेश सर्वांत कमी सक्रिय देशांमध्ये झाला.
First published: