टोकियो, 9 डिसेंबर : दुसऱ्या महायुद्धात बेचिराख होऊनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेणारा देश अशी जपानची ओळख आहे. तंत्रज्ञानातल्या प्रगतीसाठी आज जगात हा देश आघाडीवर आहे. प्रामाणिकपणा, कामसू वृत्ती आणि कार्यतत्परता हे गुणधर्म असलेले नागरिक म्हणून जपानी माणसाची ओळख आहे. त्याच देशासमोर आज एक मोठं संकट उभं आहे. जपानी तरुणांमध्ये लग्न केल्यानंतरही शरीरसंबंधांबद्दल उत्सुकता किंवा इच्छा नाही. ‘आज तकच्या’ वेबसाइटवर याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे.
आजन्म सिंगल रहाण्याची इच्छा
जपानमध्ये (Japan) नागरिकांनी लग्न न करण्याचं प्रमाण मोठं आहे. आजन्म एकटे (Single) राहण्यावर त्यांचा भर असतो. तसंच, लग्न करूनदेखील ते शरीरसंबंध (sex) ठेवत नाहीत. त्यामुळे जपानमध्ये मुलांच्या जन्मदरात मोठी घट झाली आहे.
जपानमध्ये ‘सिंगल’ राहणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे साहजिकच तिथल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. आगामी काळातलं मोठं संकट म्हणून याकडे पाहिलं जात आहे असं डीपीए वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.
जोडीदारालाच नकोत संबंध
मेरिको नावाच्या एका महिलेने याबद्दलचा आपल्या मैत्रिणीचा अनुभव सांगितला. तिच्या मैत्रिणीला मूल हवंय पण तिचा पती शरीरसंबंधांसाठी नकार देतो. त्यामुळे तिला इच्छाअसूनही संभोग करता येत नाही. अशीच काहीशी अवस्था मेरिकोची आहे. तिलाही मुलं हवी आहेत पण तिला योग्य जोडीदार मिळत नसल्यानं तिचं लग्नच झालं नाही.
चुओ युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक मसाहिरो यमदा यांनी तरुणांचा अभ्यास करून त्यांच्याशी संवाद साधून काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार जपानमधले 25 टक्के युवक आजन्म सिंगलच राहणार आहेत. मागच्या तीन दशकांमध्ये सिंगल नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
शरीरसंबंधांबद्दल अनिच्छा का?
जपानमध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे पुरुषांनी नोकरी आणि घराबाहेरचं काम करायचं आणि महिलांनी घर सांभाळायचं असा नियम आहे. परंतु देशाची अर्थव्यवस्था उत्तम नसल्याने महिलांना चांगलं कमावणारा जोडीदार मिळत नाही. त्यामुळे अनेक जण सिंगल राहतात. अतिकामामुळे त्यांच्याकडे संसारासाठीही वेळ नसल्याचं कारणही यामागे आहे. या सगळयामुळे त्यांच्यात ही अनिच्छा निर्माण होत असावी असा अंदाज आहे.
तरुण अविवाहितच
2015मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 1992 च्या तुलनेत देशभरातल्या 18 ते 39 वयोगटातल्या महिलांमध्ये सिंगल महिलांची संख्या 22 लाखांहून अधिक आहे. सध्या जपानची लोकसंख्या साडेबारा कोटी असून, त्यात या वयोगटातल्या सिंगल पुरुषांची संख्या 17 लाख आहे. पाच वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासानुसार, जपानमधल्या दर चार महिलांपैकी एक महिला आणि तीन पुरुषांपैकी एक पुरुष 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सिंगल आहेत. जपानच्या माध्यमांच्या माहितीनुसार व्हर्जिन (ब्रह्मचारी) नागरिकांची संख्याही वाढत आहे. अनेकांना शरीरसंबंधांमध्ये रस नसल्याचं समोर आलं आहे.