Home /News /lifestyle /

खरंच माउथवॉश कोरोना विषाणूला मारू शकतो? शास्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये वाद

खरंच माउथवॉश कोरोना विषाणूला मारू शकतो? शास्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये वाद

तोंड स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लिस्टरिनसारख्या माउथवॉश लिक्विडमुळे 30 सेकंदांत तोंडातील कोरोना विषाणू मरतो आणि आपण त्याला रोखू शकतो असा दावा काही डॉक्टरांनी व संशोधकांनी केला आहे.

  लंडन, 19 नोव्हेंबर : वर्षाच्या सुरूवातीपासून संपूर्ण जगाला संक्रमित करणाऱ्या कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगातील शास्रज्ञ लस शोधत आहेत. विविध कंपन्यांनी केलेलं लशीचं संशोधन वेगवेगळ्या टप्प्यांवर आलं आहे. अशातच तोंड स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लिस्टरिनसारख्या माउथवॉश (mouthwash) लिक्विडमुळे 30 सेकंदांत तोंडातील कोरोना विषाणू मरतो आणि आपण त्याला रोखू शकतो असा दावा काही डॉक्टरांनी व संशोधकांनी केला आहे. या दाव्याचा अभ्यास करून लस विकसित करणाऱ्या संशोधकांनी मात्र या दाव्यातील पुरावे पुरेसे नाहीत असं म्हटलं आहे. त्यामुळे माउथवॉशचा कोरोना विषाणूवरील उपाय वापर करता येईल की नाही यावर डॉक्टर आणि संशोधकांमध्ये वाद सुरू झाला आहे. ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील (Cardiff University) संशोधकांनी माउथवॉशमुळे कोरोना विषाणू मरतो का हे पाहण्यासाठी ट्रायल्स केल्या. त्याबाबत त्यात सहभागी पिरिआँटॉलॉजिस्ट (periodontologist) डॉ. निक क्लेडॉन (Dr Nick Claydon) म्हणाले, ‘माउथवॉशमुळे लाळेतील विषाणू मेले पण कोरोना विषाणू मानवी शरीरात फुफ्फुसं, घसा, श्वासनलिका या सगळ्या भागांवर हल्ला करतो त्या ठिकाणी माउथवॉशचा विषाणू मारण्यासाठी उपयोग करता येईल हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनावरील उपचारांसाठी माउथवॉश वापरता येईल असं खात्रीने म्हणता येणार नाही. ’

  (वाचा - PHOTO: कोरोना काळात पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा नेमकं कसं काम करतं)

  माउथवॉशमध्ये 0.07 टक्के सायटॅपॅरिडिनियम क्लोराइड (cetypyridinium chloride - CPC) असतं जे लॅबमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूला नष्ट करतं असं या संशोधनात दिसून आलं. पण कोरोनावरील ट्रिटमेंट म्हणून माउथवॉश कितपत उपयोगी ठरेल याबाबत संशोधकांनाच शंका आहे. दुसऱ्या अभ्यासातून असं दिसलं य की CPC असलेल्या माउथवॉशच्या वापरामुळे कोरोना विषाणूंची संख्या कमी होते. लस संशोधकांना शंका - कोरोनाची लस विकसित करणाऱ्या संशोधकांना मात्र वाटतं की, माउथवॉशच्या दाव्यांबाबत आणखी सखोल संशोधन व्हायला हवं. अमेरिकेतील पीटर्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातील (University of Pittsburgh School of Medicine) संक्रामक आजार विभागातील (Infectious Diseases)संशोधक प्राध्यापक डॉ. ग्रॅहॅम स्नॅडर (Dr Graham Snyder) यांनी सीएनएनला सांगितलं की, ‘अल्कोहोल, क्लोरहेक्साडाइन, हायड्रोजन पेरॉक्साइड यांच्या संपर्कात कोरोना विषाणू आला की तो लगेच किंवा थोड्या वेळात मरतो. पण यांच्या वापरामुळे कोरोना विषाणूचं संक्रमण रोखलं जातं असा पुरावा उपलब्ध नाही.’ (वाचा - वीजेच्या खांबाला बांधून पत्रकाराला मारहाण; बेकायदेशीर गुन्हांबाबत माहिती उघड केल्यानंतर हल्ला) मेरीलँड विद्यापीठातील (University of Maryland) विषाणू संसर्ग विषयातील संशोधक डॉ. डोनाल्ड मिल्टन (Dr Donald Milton) म्हणाले, ‘जरी माउथवॉश तोंडातील कोरोना विषाणूंना मारत असला तरीही नाकातल्या, श्वासनलिकेतल्या आणि फुफ्फुसांतल्या विषाणूला तो मारू शकत नाही.’ कार्डिफ विद्यापीठातील शास्रज्ञांनीही हे स्पष्ट केलं आहे की, हे संशोधन हे इतर संशोधकांनी निरीक्षण करून मान्य केलेलं नाही. त्यामुळे त्याला कोरोना विषाणूविरुद्धची वैद्यकीय ट्रिटमेंट मानलं जाऊ नये. हा अभ्यास एका वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार आहे. शास्रज्ञांनी लोकांना असं आवाहनही केलं आहे की, सध्यातरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने प्रमाणित केलेल्या पद्धतींचाच उपयोग करावा.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Coronavirus, Scientist

  पुढील बातम्या