मॉस्को, 09 जुलै : दुधात (Milk) मोठ्या प्रमाणात पोषणमूल्यं असल्यानं त्याचा दैनंदिन आहारात प्रामुख्याने समावेश केला जातो. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण आरोग्यासाठी दूध पिण्यास प्राधान्य देतात. त्यातही चांगल्या आरोग्यासाठी गाईचं दूध पिण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र असेही अनेक जण असतात, की ज्यांना दूध प्यायल्यानंतर अॅलर्जीचा (Allergy) त्रास होतो. काही जणांना दुधामुळे पचन बिघडून आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. ज्या व्यक्तींना दुधामुळे अॅलर्जीचा (Milk allergy) त्रास होतो, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्यांची ही समस्या भविष्यात कदाचित संपुष्टात येऊ शकते आणि याचा मार्ग म्हणजे क्लोनिंग काऊ (Cloning Cow).
जगातल्या सुमारे 70 टक्के लोकांना दुधामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अॅलर्जीचा त्रास सहन करावा लागतो. ही स्थिती लक्षात घेऊन प्रथमच अशा पद्धतीचा प्रयोग रशियात (Russia) केला गेला आहे. रशियातल्या वैज्ञानिकांनी प्रथमच अशी क्लोनिंग गाय विकसित केली आहे, जिच्या दुधामुळे मनुष्याला अॅलर्जीचा त्रास होणार नाही. ही गाय विकसित करताना तिच्या जनुकांमध्ये काही बदल करण्यात (Genetic Changes) आलेले आहेत.
हे वाचा - शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आहे उपयुक्त हे जादुई फूल
याबाबत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रयोगादरम्यान लोकांना अॅलर्जीचा त्रास होण्यासाठी पूरक ठरणारी काही विशिष्ट प्रोटीन्स या गायीच्या जनुकांमधून काढून टाकण्यात आली आहेत. गायीच्या जनुकांमधल्या या प्रोटीन्समुळेच माणसांना दुधामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. जनुकांमध्ये विशिष्ट प्रोटीन असल्याने माणसं अशा गायीचं दूध पचवण्यास सक्षम नसतात. क्लोनिंग काऊ म्हणजे क्लोनिंग गाय विकसित करण्यासाठी वैज्ञानिकांनी तिच्या भ्रूणातल्या जनुकांमध्ये काही आवश्यक बदल केले. त्यानंतर तो भ्रूण गायीच्या गर्भात सोडला. वासराचा जन्म झाल्यानंतर, जनुकांमध्ये बदल केल्याने त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही ना, हे तपासलं जातं. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं संशोधन उंदरांवर केलं जातं. कारण मोठ्या जनावरांच्या क्लोनिंगसाठी मोठा खर्च येतो. तसंच ब्रीडिंगमध्येही अनेक अडचणी निर्माण होतात.
हे वाचा - पनीरच आहे वेट लॉसचं ‘Secret’; पण खाण्याची पद्धत बदला
यापूर्वी न्यूझीलंडमध्ये ( New Zealand) अशा प्रकारे गाय विकसित करण्यात आली होती. त्या वेळी शास्त्रज्ञांनी गायीची जनुकं बदलून शरीराचा रंग फिकट करण्याचा प्रयत्न केला होता. फिकट रंगामुळे सूर्यकिरणं गायीच्या शरीरावर पडली, तरी शोषली न जाता, परावर्तित होतात. यामुळे तिला उष्णतेचा त्रास होत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.