इंदोर, 26 नोव्हेंबर : स्वतंत्र भारतात संस्थानं विलीन झाली, तरी संस्थानिकांचा थाट अनेक ठिकाणी अजूनही कायम आहे. त्या त्या संस्थानच्या राजे-रजवाड्यांवर जनतेचं प्रेमही कायम आहे. असंच एक मध्य भारतातलं प्रसिद्ध राजघराणं म्हणजे होळकर घराणं. इंदूरचे होळकर महाराष्ट्रालाही जवळचे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या राजघराण्यात काही वर्षांपासून थोडे रुसवे-फुगवे सुरू होते आणि राजघराण्याचे युवराज आणि त्यांची पत्नी यांच्यात काही पटत नसल्याच्या चर्चा होत्या. पण प्रिन्स रिसर्ड आणि शालिनी देवी यांना Coronavirus काळातल्या लॉकडाउनने 25 वर्षांनंतर पुन्हा जवळ आणल्याची गोड बातमी महेश्वर किल्ल्यावरून आली आहे.
मध्य प्रदेशात खरगोन जिल्ह्यातील इंदौरजवळचा महेश्वर किल्ला म्हणजे होळकर घराण्याचा बालेकिल्ला. तिथे आलिशान राजवाड्यात सध्याच्या रॉयल फॅमिलीचं वास्तव्य असतं. मराठी सत्तेसाठी लढणाऱ्या, मराठा साम्राज्यातल्या प्रमुख सरदार घराण्यांपैकी एक असणाऱ्या मल्हारराव होळकरांचे हे वंशज. होळकर घराण्याचे प्रिन्स रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकर आणि त्यांची पत्नी शेली उर्फ शालिनी देवी यांच्यात गेली काही वर्षं बेबनाव होता. शालिनी देवी महेश्वर किल्ल्यावरच्या महालात राहात नव्हत्या. अजूनही त्या वेगळ्या राहात आहेत. पण हे दांपत्य औपचारिकरीत्या विभक्त झालेलं नाही. शालिनी देवी शाही लग्नसोहळ्यांना किंवा समारंभांना हजर असल्या, तरी त्यांचा कुटुंबाबरोबरचा दुरावा लपून राहिलेला नव्हता. पण आता कोरोनाकाळात तब्बल 25 वर्षांनंतर शालिनीदेवी पुन्हा एकदा महेश्वरच्या राजवाड्यात राहायला आल्या आहेत, अशी बातमी दैनिक जागरणने दिली आहे. Covid-19 च्या काळातल्या लॉकडाऊन दरम्यान प्रिन्स रिचर्ड यांच्या पत्नी राजवाड्यात परतल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत या जोडप्याचा मुलगा यशवंतराव यांना विचारलं असला, ही आमची कौटुंबिक बाब आहे, असं उत्तर त्यांनी दिल्याचं 'नयी दुनिया'ने म्हटलं आहे.
होळकरांचं फ्रेंच कनेक्शन
शालिनी देवी ऊर्फ शेली रिचर्ड यांना 38 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये भेटल्या. रिचर्ड यांची आईसुद्धा फ्रेंच वंशाचीच होती. पण सुरुवातीच्या काही वर्षांनंतर शालिनीदेवींनी महेश्वरचा राजवाडा सोडला आणि त्या तीन किलोमीटर अंतरावर नर्मदा काठी एक फार्महाऊस बांधून राहू लागल्या. त्यांनी राजवाडा सोडला तर महेश्वर सोडलं नाही. तिथे स्थानिक स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी काही कापड उद्योग, कलाकुसर उद्योग सुरू केले. नवीन घराकडे गेल्यानंतर त्यांनी 25 वर्षांत गडावर पाऊलही ठेवलं नव्हतं. लॉकडाउनदरम्यान मात्र शालिनीदेवी किल्ल्यावर राहायला आल्या. त्यांच्या नात्यातील हा दुरावा कमी होत असल्याची चर्चा आहे.
मुलाच्या लग्नातही होत्या दूर
रिचर्ड आणि शालिनी यांना दोन मुलं आहेत. मुलगी सब्रिना आणि मुलगा यशवंत दोघेही विवाहित आहेत. या दोघांच्या लग्नाच्या निमित्तानेसुद्धा शालिनीदेवी किल्ल्यावर आलेल्या नव्हत्या. कुटुंबाच्या कार्यक्रमात त्या दुरूनच सहभागी होत. 13 डिसेंबर 2015 रोजी मुलगा यशवंत यांचे लग्न झालं. 1935 सालच्या व्हिंटेज कारमधून लग्नाची वरात निघाली. वरातीत यशवंतसोबत वडील प्रिन्स रिचर्ड आणि बहीण होते, पण आई शालिनीदेवी त्या वेळी दिसल्या नाहीत. त्यांनी नंतर त्यांच्या फार्महाऊसवर या लग्नाची पार्टी दिली होती, असं म्हणतात.
लोकप्रिय जोडी
रिचर्ड (शिवाजीराव होळकर) आणि शालिनी देवी होळकर ही राजघराण्यातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. रिचर्ड यांना किल्ल्याची फारच ओढ आहे. महेश्वर ही अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीचं ठिकाण. दुसरीकडे शालिनीदेवी यासुद्धा महेश्वरमध्ये लोकप्रिय आहेत. माहेश्वरी कापडापासून बनवलेले मास्क तयार करण्याचा उद्योग शालिनी देवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. याशिवाय माहेश्वरी साड्या बनवणाऱ्या आणि विकणाऱ्यांसाठी काम केल्यामुळे शालिनी देली महेश्वरच्या ग्रामस्थांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.नर्मदेच्या तीरावरचा महेश्वरचा राजवाडा खूप सुंदर आहे. तिथेच प्रिन्स रिचर्ड होळकर यांचं वास्तव्य असतं. किल्ल्याच्या एका भागामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलदेखील आहे. हे सर्व रिचर्ड होळकर सांभाळतात.
राजघराणं आणि घराणेशाहीचा इतिहास
वडील महाराजा यशवंतराव होळकर यांनी प्रिन्स रिचर्डचे नाव शिवाजीराव ठेवलं होतं. यशवंतराव होळकर यांनी तीन विवाह केले होते. त्यांना पहिली पत्नी संयोगिताराजेंपासून उषाराजे ही मुलगी झाली. पहिल्या पत्नीचं लग्न झाल्यावर दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर घटस्फोट घेऊन तिसरं लग्न फ्रान्सच्या युफेमियाशी झालं. त्यांचा मुलगा प्रिन्स रिचर्ड.
आता रिचर्ड यांचा मुलगा यशवंतरावचा विवाह पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती गोदरेज यांची नात नायरिकाशी झाला होता. त्यांच्या शाही विवाह सोहळ्यात सर्व अभिनेते राजघराण्याचे सदस्य गोदरेज ग्रुपचे सर्व अधिकारी आणि इतर आप्तेष्ट उपस्थित होते.