Home /News /lifestyle /

फक्त 10 रुपयात पोटभर जेवा, वाचा कुठं मिळतं इतकं स्वस्त जेवण!

फक्त 10 रुपयात पोटभर जेवा, वाचा कुठं मिळतं इतकं स्वस्त जेवण!

लॉकडाऊनचा (Lockdown) फटका बसलेल्या व्यक्तींना मदत व्हावी या उद्देशानं फक्त 10 रुपयांमध्ये भरपेट भोजन देणारे रेस्टॉरंट सुरु झालं आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या व्यक्तींना नोकरी देण्यात आली आहे.

    दिल्ली, 11 डिसेंबर:  लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात देशभरात अनेक ठिकाणी मजूर अडकले होते. अनेकांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याची आणि खाण्याची चिंता निर्माण झाली. सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेल्या या व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्थांनी तसेच दानशूर व्यक्तींनी त्यांच्या पातळीवर सामाजिक कामं सुरु केली. वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना गावी पोहचण्यास कुणी मदत केली तर कुणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. याच काळात एक अनोखं रेस्टॉरंट सुरु झालं असून तिथं फक्त 10 रुपयांमध्ये भरपेट जेवणाची सोय आहे. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये जिथं 10 रुपयात पिण्याचं पाणी देखील अनेक ठिकाणी मिळत नाही, त्याच शहरात हे रेस्टॉरंट सुरु झालंय. ‘10 रुपयात पोटभर खा’ अशी या रेस्टॉरंटची टॅगलाईन असून अगदी कमी कालावधीमध्ये हे लोकप्रिय झालं आहे. दिल्लीमधील अनेक गरिबांच्या पोटाची चिंता यामुळं दूर झाली आहे. मित्राची अवस्था पाहून सुचली कल्पना दिल्लीतल्या मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्टेशन (Maujpur-Babarur Metro) जवळ हे रेस्टॉरंट असून किरण वर्मा हे यांनी ते सुरु केले आहे. सामाजिक कामांमध्ये नेहमी हातभार लावणाऱ्या किरण यांना लॉकडाऊनमध्ये मित्राची झालेली अवस्था पाहून ही कल्पना सुचली. किरण यांचा मित्र कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती झपाट्यानं खालावली. तो व्यसनाधीन बनला. मित्राची ही अवस्था पाहून लॉकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या सर्वाचा विचार मनात आल्याचं किरण यांनी सांगितलं. किरण यांच्या या भोजनालयात सध्या 10 कामगार असून त्या सर्वांची नोकरी लॉकडाऊनच्या काळातच गेली होती. किरण दर महिना या जागेचं 60 हजार रुपये भाडं देखील भरत आहेत. जेवणात काय-काय असते? गरिबांना कमी किंमतीमध्ये भरपेट जेवता यावं यासाठी हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटमधील एका थाळीमध्ये पूरी, भाजी, भात आणि पोटभर हलवा देण्यात येतो. तसेच दर शनिवार-रविवार मेन्यू वेगळा असतो. सध्या हे रेस्टॉरंट फक्त सकाळीच सुरु आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Lockdown

    पुढील बातम्या