मुंबई, 24 नोव्हेंबर : रवीचं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा त्याची पत्नी (wife) निकिता त्याच्या अवतीभोवतीच असायची. त्याला काय हवं-नको ते पाहायची. त्याच्या आवडीनिवडी सर्व काही जाणून घ्यायची. आपली काळजी घेणारी पत्नी आपल्याला भेटली म्हणून रवी खूप आनंदी होता. पण हळूहळू त्याच्या पत्नीचा जोडीदार झाला तो तिचा मोबाईल फोन (wife talking on mobile phone). पतीपेक्षा जास्त वेळ ती आपल्या मोबाईल फोनला देऊ लागली. रवी घराबाहेर असताना निकिताला फोन करायचा तेव्हा तो नेहमी बिझी असायची, शिवाय तो घरी आल्यानंतरही ती फोनमध्येच रमलेली असायची. रवीच्या मनात संशयानं कल्लोळ घातला. आपली पत्नी इतकं फोनवर कुणाशी आणि का बोलते? तिच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरा एखादा पुरुष तर नाही ना? असे बरेच प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले.
अशी परिस्थिती फक्त रवीची नाही तर अनेक पुरुषांची आहे. जेव्हा बघावं तेव्हा बायको फोनवर बोलताना दिसली की असाच संशय बहुतेक पुरुषांच्या मनात निर्माण होतो. काहींना ना तर आपल्या बायकोवर विश्वास असतो मात्र तरी मनात संशय खदखदत असतो. तुमच्याबाबतही असंच होतं आहे का? आणि असं वाटत असेल तर तुमच्या मनाच्या अशा अवस्थेमागे नेमकी कारणं काय आहेत आणि हा नात्याला तडा जाऊ न देता हा संशय दूर कसा करावा याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.
न्यूज 18 लोकमतशी बोलताना मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद म्हणाल्या, "आपल्या पत्नीबाबत असे विचार मनात येणं हे नैसर्गिक आहे. ही एक संरक्षणात्मक वृत्ती आहे. असा अविश्वास आणि मनात संशय निर्माण होण्यामागे अनेक कारणं असतात"
हे वाचा - होणाऱ्या नवऱ्याला कधी भेटले नाही आणि आता लग्न करायचं आहे, काय करू?
"विवाहबाह्य संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाहिलं असेल, अशी व्यक्ती तुमच्या चांगल्या ओळखीची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीबाबतदेखील तसाच विचार करू लागता. तुम्ही पत्नीच्या फोनवर असं काही तरी पाहता ज्यामुळे तुमच्या मनात संशय, गैरसमज निर्माण होतो. पत्नी अनेकदा घराच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्या आपल्या पतीला योग्य वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे पती वैतागलेले असतात. आपल्या पत्नी आपल्यात रस नाही, त्यामुळे ती आपल्याला वेळ देत नाही, असं पतींना वाटतं", असं डॉ. आनंद म्हणाल्या.
हे वाचा - 'निगेटिव्ह सेल्फ टॉक' मानसिक आरोग्यासाठी धोकादायक; यातून कसं मुक्त व्हाल
"अनेकदा जोडीदारांनाच एकमेकांसोबत राहायला आवडत नसतं, त्यावेळी इतर रिलेशनशिपच्या शोधात असतात. याशिवाय मेन्टल डिसॉर्डरदेखील याला कारणीभूत असू शकतं. मद्यपान, मादक पदार्थांचं व्यसन आणि मानसिक विकृतीही यामागील कारण असू शकतं", असं डॉ. आनंद यांनी सांगितलं.
"त्यामुळे तुमच्या मनात संशय निर्माण होण्याचं नेमकं कारण काय ते समजून घ्या. जोडीदारावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर सुरुवातीला जोडीदाराशीच बोलून घ्या. यावर तोडगा काढा. नाहीतर समुपदेशकाची मदत घ्या", असा सल्ला डॉ. आनंद यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.