मुंबई, 23 मार्च : हृदयविकार ही आता फक्त 'पुरुषांची समस्या' राहिलेली नाही. अलीकडच्या काळात स्त्रियांना देखील हार्ट अटॅकसारख्या हृदयविकारांचा सामना करावा लागत आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनं (एनएफएचएस) प्रकाशित केलेल्या अहवालात असं आढळलं आहे की, भारतात 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये निदान न झालेल्या हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण 18.69 टक्के आहे. पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो या प्रचलित मिथकाला ही आकडेवारी तडा देते.
इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्टडींमध्येही निदर्शनास आलं आहे की, हृदयविकार हे आता स्त्रियांमधील मृत्यूचं एक प्रमुख कारण ठरत आहे. हृदयविकारांमुळे स्तनाच्या कर्करोगापेक्षा दहापट अधिक महिलांचे मृत्यू होतात. महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत असताना जागरूकतेच्या अभावामुळे अनेकींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. कित्येक महिलांतील हृदयविकाराचं वेळेवर निदानही होत नाही. बेंगळुरू येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रदीप कुमार डी. यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
महिलांमधील हृदयविकारांचं निदान का होत नाही?
आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेताना भारतातील स्त्रिया स्वतःच्या गरजांकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेच्या छातीत हलक्याशा वेदना होत असतील तर ती या लक्षणांकडे दुर्लक्ष करेल आणि डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरातील कामं करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करेल. आपल्या समाजातील पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थादेखील स्त्रियांनी स्वतःची काळजी घेण्याऐवजी इतरांच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची अपेक्षा करते. त्यामुळे बहुतांशी स्त्रियांतील आजारांचं उशीरा निदान होतं. हेच आपल्या देशातील स्त्रियांमधील वाढत्या हृदयविकाराचे मुख्य कारण आहे.
हार्ट अॅटॅकची लक्षणं पुरुष आणि स्त्रियामध्ये भिन्न असल्यानं बऱ्याच स्त्रियांना याची देखील जाणीव नसते की, त्यांना भूतकाळात एक किंवा दोन हार्ट अॅटॅक येऊन गेले आहेत की नाही. त्या एकदम शेवटी डॉक्टरकडे जातात. पुरुषांना हार्ट अॅटॅक आल्यास सहसा त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होतात आणि घाम फुटतो. स्त्रियांमधील हार्ट अॅटॅकची लक्षणं सहसा सौम्य असतात. त्यांना वारंवार आणि कमी तीव्रतेचे अनेक अॅटॅक येऊ शकतात. जबडा दुखणं, थकवा येणं, मान आणि पाठदुखी जाणवणं, घाम येणं किंवा फक्त छातीत जळजळ होणं, अशी लक्षणं स्त्रियांना हार्ट अॅटॅकपूर्वी जाणवू शकतात. ही लक्षणं जाणवत असल्यास स्त्रियांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
कोणत्या वयोगटातील स्त्रियांना हार्ट अॅटॅक येण्याची सर्वाधिक शक्यता असते आणि प्राथमिक काळजीचे घटक कोणते आहेत?
45 ते 55 वयोगटातील स्त्रियांच्या शरीरामध्ये मेनोपॉजनंतर कमी झालेली इस्ट्रोजेनची पातळी, काम आणि कुटुंबाशी संबंधित तणाव, एकटेपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे त्यांना हार्ट अॅटॅक येण्याचा धोका असतो. पुरुषांच्या तुलनेत या वयोगटातील अधिक महिलांना असामान्य लक्षणं दिसूनही त्यांचं निदान होत नाही. दुसरा सर्वात प्रभावित वयोगट हा वयाच्या साठीमधील आहे. वयाच्या साठीमध्ये असलेल्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही जैविक कारणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता असते. हाय कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, धूम्रपान, बैठी जीवनशैली आणि मधुमेह या समस्यांमुळे देखील स्त्रियांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.
हार्ट अॅटॅकपासून सुरक्षित राहण्यासाठी स्त्रियांनी आपली काळजी कशी घ्यावी?
1. हृदयाच्या आरोग्याबद्दल स्वतःला शिक्षित करा आणि ब्लॉकेज होण्यास कारणीभूत असलेल्या रिस्क फॅक्टर्सबद्दल जागरूकता वाढवा.
2. धूम्रपान किंवा तंबाखूचा वापर टाळला पाहिजे.
3. हृदयाच्या आरोग्यासाठी आणि लठ्ठपणावर मात करण्यासाठी दररोज 30 ते 45 मिनिटे योगासने, डान्स, रनिंग आणि वॉकिंगसारख्या फिजिकल अॅक्टिव्हिटी करा.
4. जंक फूड आणि एरेटेड पेये टाळा व संतुलित आहार घ्या. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, शेंगा, फळं, भाज्यांचा समावेश असलेला आहार घ्या. आहारातील साखर, मीठ आणि फॅट्सचं प्रमाण कमी करा. संतुलित आहार हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो.
हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की, हृदयविकारांचा व्यक्तीच्या लिंगाशी काहीही संबंध नाही. हे विकार पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सारख्या प्रमाणात प्रभावित करतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनीही निरोगी जीवनशैली अंगीकारणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle