शिक्षणापासून दूर पळून रवींद्रनाथ टागोरांनी का स्थापन केलं विश्व भारती विद्यापीठ? जाणून घ्या इतिहास

शिक्षणापासून दूर पळून रवींद्रनाथ टागोरांनी का स्थापन केलं विश्व भारती विद्यापीठ? जाणून घ्या इतिहास

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindra Nath Tagore) यांनी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) स्थापन केलेलं विश्व भारती विद्यापीठ (Vishwa Bharti University) 100 वर्षांचं झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर :  नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindra Nath Tagore) यांनी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) स्थापन केलेलं विश्व भारती विद्यापीठ (Vishwa Bharti University) 100 वर्षांचं झालं आहे. टागोर यांनी स्थापन केलेल्या या विद्यापीठाचा इतिहास फारच रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी लादलेल्या शिक्षण पद्धतीला झुगारून भारतीय संस्कृतीचं बीज रोवण्यासाठी टागोर यांनी केलेला हा प्रयत्न त्याकाळी एक प्रकारची बंडखोरीच होती. असं असतानाही या विद्यापीठाची उभारणी करणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांना स्वतःला मात्र शिक्षण घेण्याची फारशी आवड नव्हती, हे विशेष.

भारतातील प्रसिद्ध अशा विद्यापीठांपैकी एक असलेल्या पश्चिम बंगालमधील शांती निकेतनमधील विश्व भारती विद्यापीठ हे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने आयोजित प्रमुख कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Naredra Modi) यांनीही संबोधन केलं. या संस्थेला 1951 मध्ये केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान हे या विद्यापीठाचे कुलगुरू असतात.

या विद्यापीठाची स्थापना 1921 मध्ये झाली. मात्र याची उभारणी 1863 मध्ये म्हणजेच टागोर हे केवळ दोन वर्षांचे असतानाच सुरू झाली. या विद्यापीठाला जगभरातील प्रमुख शिक्षण संस्थेचा दर्जा मिळवून देणाऱ्या टागोर यांनी स्वतः अनेकदा शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलं होतं.

टागोर यांना प्रथम कोलकतामधील (Kolkata) ओरिएंटल सेमिनारी स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. 1868 मध्ये सात वर्षांचे असलेले टागोर हे शाळेत न जाण्यासाठी हट्टाला पेटले. ज्या शाळेत शिक्षा दिली जाते, विद्यार्थ्यांना छडीनं मारलं जातं, त्या शाळेत मी जाणार नाही, असा हट्ट ते करु लागले. परिणाम अवघ्या एक महिन्यातच त्यांनी शाळा सोडली. 1876 मध्ये त्यांना सेंट झेवियर स्कूलमध्ये दाखल करण्यात आले पण तिथेही त्यांनी सहा महिनेच शिक्षण घेऊन शाळा सोडली. परंतु, ही शाळा टागोर यांच्या विशेष आठवणीत राहिली. शाळेतील फादर डेपेनरेंडा यांनी दाखवलेली सहानुभुती टागोर कधीच विसरु शकले नाहीत. त्यानंतर सेंट झेवियर स्कूलच्या प्राचार्यांनी सांगितले की 1927 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शाळेला जिझस ख्राईस्ट यांची प्रतिमा भेट दिली होती.

शाळेतील औपचारिक शिक्षणात टागोर यांचे मन कधीच रमले नाही. टागोर यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर यांची रविंद्रनाथ हे बॅरिस्टर व्हावेत अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडमधील (England) ईस्ट ससेक्समधील पब्लिक स्कूलमध्ये रविंद्रनाथ टागोर यांनी दाखल केले. त्यानंतर काही महिन्यांनी टागोर यांनी लंडनमधील विद्यापीठात शिक्षण घेतले आणि पुन्हा शिक्षण सोडले. त्यानंतर टागोर यांना प्रेसिडेन्सी कालेजनेही प्रवेश दिला होता. मात्र केवळ एकच दिवस ते महाविद्यालयात गेले आणि त्यानंतर त्यांनी परत महाविद्यालयाचे तोंडही पाहिले नाही. यासर्वाचा विचार केला तर या प्रवृत्तीचा नेमका अर्थ काय होता?  त्यांना काही मानसिक त्रास होता की अन्य काही कारणे होती, हा प्रश्न कायम राहतो.

हे वाचा - Covid काळात हा HR मॅनेजर ठरला गरिबांसाठी सुपर हिरो! Rice ATM ने शेकडोंना आधार

ओरिएंटल स्कूलचे शिक्षक मनोज भट्टाचार्य आणि इंग्रजीच्या शिक्षिका चंदिका प्रसाद घोषाल टागोर यांच्या शिक्षण सोडण्याविषयी म्हणतात, कदाचित टागोर यांना चार भिंतींमध्ये दिल्या जाणाऱ्या औपचारिक शिक्षणामध्ये विशेष रस नसावा. रविंद्रनाथ यांनी जर आपले शिक्षण पूर्ण केले असते तर नक्कीच ते आयएएस अधिकारी बनले असते. याचाच अर्थ यामुळे जगाचे मोठे नुकसान झाले. परंतु त्यांनी औपचारिक शिक्षण पूर्ण न केल्याने फायदा मात्र अधिक प्रमाणात झाला.

असं असतानाही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने शांतीनिकेतन येथे येत त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली, तसंच त्यांना नोबेल पुरस्कारानेही (Nobel Prize) सन्मानित करण्यात आलं आहे. नोबेल पुरस्कार जिंकल्यानंतर 27 वर्षांनी 1940 मध्ये रविंद्रनाथ टागोर यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford University) शांती निकेतनमध्ये जाऊन मानद पदवीने सन्मानित केले होते. खुल्या वातावरणातील शिक्षण हे अधिक परिणामकारक आणि फायदेशीर ठरते असा टागोर यांना विश्वास होता. चार भिंतींमध्ये घेतलेल्या शिक्षणामुळे मेंदूचा अपेक्षित विकास होत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. तसेच त्यांचा इंग्रज भारतात राबवत असलेल्या पाश्चिमात्य शिक्षण पध्दतीला देखील विरोध होता.

हे वाचा - अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मशिदीचे आर्किटेक्ट आहेत हे प्राध्यापक अख्तर

प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही विलक्षण आणि अलौकीक असते, त्यामुळे सर्व विद्यार्थी एकत्रितपणे शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशी टागोर यांची शिक्षण पद्धतीविषयी कल्पना होती. त्यांनी विश्व भारती विद्यापीठाच्या माध्यमातून अध्यापनाची नवी तंत्रे विकसित केली होती. येथे अभ्यासक्रम,  परीक्षा आणि व्यवस्था विद्यार्थी त्यांच्या मनाप्रमाणे ठरवू शकत होते. मला आठवत नाही की मला कोणते शिक्षण दिले गेले, परंतु, मी काय शिकलो हे मात्र माझ्या चांगले लक्षात आहे, असं टागोर म्हणायचे.

शिक्षणापेक्षा शिक्षण व्यवस्थेत बदलाचा आग्रह धरणाऱ्या टागोर यांनी भलेही शाळा, महाविद्यालये सोडून दिली. परंतु, त्यांनी कला, साहित्य, संस्कृतीचा केलेला अभ्यास आणि कमावलेली विव्दत्ता ही पुढे जाऊन विव्दानांना देखील मान्य करावी लागली. कवी, संगीतकार, चित्रकार, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ तसेच समाजसुधारक आणि राजकीय विचारवंत म्हणून रविंद्रनाथ टागोर आपल्याला परिचित आहेत.

Published by: Priya Lad
First published: December 24, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या