Home /News /lifestyle /

पतीनं पत्नीला गिफ्ट केला 'चांद का टुकडा'; खरंच चंद्रावर जमीन विकत घेता येते का?

पतीनं पत्नीला गिफ्ट केला 'चांद का टुकडा'; खरंच चंद्रावर जमीन विकत घेता येते का?

खरंच चंद्रावर जमीन (moon land) विकत घेता येते आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आम्हीही केला. वाचा यातून काय तथ्यं समोर आलं आहे.

अजमेर, 29 डिसेंबर : तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून असं कित्येक तरुण आपल्या प्रेयसीला सांगतात. आपल्या 'चांद का टुकडा'वर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी प्रियकर असं म्हणतो खरं. पण प्रत्यक्षात ते शक्य नाही हेदेखील तितकंच खरं. पण नुकतंच राजस्थानातल्या अजमेरमधल्या एका व्यक्तीने मात्र पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट (Anniversery Gift) म्हणून चक्क चंद्रावरची जमीन (Lunar Land) दिली आहे. राजस्थानमधील धर्मेंद्र यांनी 24 डिसेंबरला आपली पत्नी भावनाच्या हातात तिच्या नावे चंद्रावर जमीन (moon land) असल्याचं सर्टिफिकेट दिलं.  चंद्रावरची तीन एकर जमीन विकत घेऊन त्यांनी ती आपल्या पत्नीच्या नावावर केली आहे. त्यांच्या पत्नीला जितकं आश्चर्य वाटलं तितकाच आनंदही झाला. पण खरंच चंद्रावर जमीन विकत घेता येते आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आम्हीही केला. प्रश्न : चंद्रावर कोणाची जमीन आहे का? उत्तर : वर उल्लेख केल्याप्रमाणे करार असला, तरी आतापर्यंत चंद्रावर जमीन (Lunar Land) खरेदी केल्याबद्दलचे काही लोकांचे दावे चर्चेत आले आहेत. त्यात सुशांतसिंह राजपूत, शाहरुख खान, एक पाकिस्तानी दाम्पत्य आदींचा समावेश आहे. हे वाचा - काय सांगता?... या उद्योजकाने बांधलं समुद्रावर तरंगणारं घर इंटरनॅशनल लुनार लँड्स रजिस्ट्री (International Lunar Lands Regitry) नावाच्या संस्थेकडून सुशांतसिंह राजपूतने 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केल्याचं सांगितलं जातं. शाहरुख खानने एका मुलाखतीत असा दावा केला, की एका चाहत्याने त्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दर वर्षी चंद्रावरच्या जमिनीचा तुकडा दिला आहे. या अभिनेत्यांपासून प्रेरणा घेऊन एका पाकिस्तानी पतीने आपल्या पत्नीसाठी इंटरनॅशनल लुनार लँड्स रजिस्ट्रीमार्फत 45 डॉलर म्हणजे सुमारे 3200 रुपये खर्चून चंद्रावर जमीन खरेदी केली. त्याचा आणि सुशांतचा चंद्रावरचा प्लॉट 'सी ऑफ मस्कोव्ही' (Sea of Muscovy) या प्रदेशात असल्याचं सांगितलं जातं. प्रश्न : लोक चंद्रावरची जमीन खरेदी कशी करतात? उत्तर : 1967 च्या शीतयुद्धानंतर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांनी आउटर स्पेस ट्रीटी अर्थात अंतराळविषयक करार तयार केला होता. त्या करारात असलेल्या एका त्रुटीमुळे हे होत असावं, असा अंदाज आहे. त्या करारात केवळ सार्वभौम राष्ट्रीय मालकीचा (Soverign Nationality) उल्लेख आहे. त्यामुळे खासगी कंपन्या किंवा व्यक्ती यांना बंदी आहे की नाही, याबद्दल कायदेतज्ज्ञात एकमत नाही. त्याचा फायदा घेऊन जमीनखरेदी केली जात असावी. प्रश्न : चंद्रावर जमीन खरेदी करणं कायदेशीर आहे का? उत्तर : या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. अंतराळात वसाहती होऊ नयेत यासाठी आउटर स्पेस ट्रीटी करार करण्यात आला. या करारावर त्यानंतर भारतासह 109 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार चंद्रावर जमीन खरेदी करणं बेकायदा आहे. कारण त्या करारात असं म्हटलं आहे, की पृथ्वीबाहेरचं अंतराळ हा असा घटक नाही, की त्याचा वापर किंवा अन्य कोणत्याच प्रकारे सार्वभौम राष्ट्रीयत्व सांगता येईल. अंतराळातल्या कोणत्याही मोहिमा या सार्वजनिक लाभासाठीच्याच असायला हव्यात. खासगी किंवा एखाद्या संस्थेच्या लाभाच्या नकोत. हे वाचा - काय सांगता? नवऱ्यानं बायकोला दिली चंद्रावर जमीन गिफ्ट! आता चंद्रावर जमीन विकत घेणं खरंच शक्य आहे का, तर याचं उत्तर 'नाही' असं आहे. आउटर स्पेस ट्रीटी अर्थात अंतराळविषयक करारानुसार अशा प्रकारचे दावे खोडून जातात. कारण कोणीही व्यक्ती किंवा संस्था चंद्रावर प्रॉपर्टी विकत घेऊ शकत नाही. कराराच्या जुन्या शब्दरचनेबद्दल काहीसा संभ्रम असला, तरी त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे, की चंद्रासह अंतराळातल्या कोणत्याही संपत्तीची विक्री किंवा खरेदी केली जाऊ शकत नाही. लुनार लँड्स रजिस्ट्रीसारख्या संस्था ही प्रकरणं कोर्टात उभी करू शकतीलच, याची खात्री देता येत नाही.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Lifestyle, Space

पुढील बातम्या