Home /News /lifestyle /

Pregnancy planning: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तीन महिन्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका सर्वांत जास्त

Pregnancy planning: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तीन महिन्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका सर्वांत जास्त

बऱ्याचदा प्रेग्नन्सीमधील गुंतागुंतींमुळे महिलांचा गर्भपात होतो. उन्हाळ्यात (Summer) महिलांचा गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

    मुंबई, 03 जुलै: गर्भपात म्हणजेच मिसकॅरेज (Miscarriage ) हा कोणत्याही स्त्रीला शारीरिक आणि मानसिक वेदना देणारा अनुभव असतो. अनेक महिलांचा वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भपात होऊ शकतो. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमधील गुंतागुंतींमुळे महिलांचा गर्भपात होतो. उन्हाळ्यात (Summer) महिलांचा गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो, असं एका अभ्यासातून समोर आलंय. अमेरिकन संशोधकांच्या एका टीमने आठ वर्षांच्या अभ्यासादरम्यान 6,000 महिलांच्या गर्भधारणेला ट्रॅक केलं. त्यांच्या अभ्यासात गर्भपातासंबंधीत अनेक बाबी उघडकीस आल्या. त्यातली महत्त्वाची म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत गर्भपात होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यातील जास्त उष्णता (Heat) आणि लाईफस्टाईल (Lifestyle) यामुळे गर्भपात होण्याची शक्यता बळावते. परंतु, त्यासाठी अजून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गर्भपात होण्याचं प्रमाण फेब्रुवारीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी जास्त असल्याचं आढळून आलं आहे. गरोदर महिलांमध्ये गर्भपाताची बहुतेक प्रकरणं गर्भधारणेचे 8 आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच दिसून आली. यादरम्यान, गर्भाचा आकार रसभरी या छोट्या फळाएवढा असतो. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. बोस्टन युनिव्हर्सिटीतील (Boston University) या अभ्यासाच्या लेखिका डॉ. अमेलिया वेसेलिंक म्हणाल्या, "उन्हाळ्यात लवकर गर्भपात होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो, असं आम्हाला अभ्यासादरम्यान आढळलं. उष्णतेमुळे गर्भधारणेदरम्यान वेळेआधी बाळ जन्माला येणं, बाळाचं वजन कमी असणं किंवा गर्भातच बाळाचा मृत्यू होणं, अशा इतर अनेक समस्यांचा धोका उन्हाळ्यात वाढतो.” हेही वाचा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग संशोधकांनी गर्भपाताचा डेटा दिलेल्या महिलांच्या सर्वेक्षण डेटाचं विश्लेषण केलं. यामध्ये प्रसूतीसाठी किती वेळ शिल्लक असताना गर्भपात झाला, याबद्दल महिलांनी सांगितलं होतं. संशोधकांनी या रिसर्चमध्ये अशा महिलांचा समावेश केला ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा प्रयत्न करत होत्या. या गर्भवती महिलांची प्रसूती होईपर्यंत त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती. दरम्यान, या संशोधनाचे निष्कर्ष एपिडेमिऑलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधनानुसार, गर्भधारणेच्या कोणत्याही आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका फेब्रुवारीच्या अखेरच्या तुलनेत ऑगस्टच्या शेवटी 31 टक्क्यांनी जास्त होता. ज्या गर्भवती महिला जास्त उष्णतेच्या ठिकाणी राहतात, त्यांच्यामध्ये गर्भपाताचा धोका खूप जास्त असतो, असं तज्ज्ञ सांगतात. परंतु, वातावरणातील उष्णता गर्भधारणेवर परिणाम करू शकते का? याबद्दल तज्ज्ञांकडे खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मात्र, उष्णतेमुळे गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने नाळेच्या विकासावर वाईट परिणाम होतो, तसंच गर्भाशयातील रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचं ते सांगतात. गर्भपात कधी आणि कसा होतो? गर्भधारणेच्या पहिल्या 23 आठवड्यांत गर्भपात होतो. योनीतून रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना ही गर्भपाताची सामान्य लक्षणं आहेत. सलग तीनपेक्षा जास्त गर्भपात होणं चांगलं मानलं जात नाही. मात्र, ही समस्या 1% स्त्रियांमध्ये आढळते. बहुतेक गर्भपात हे बाळामध्ये असलेल्या असामान्य गुणसूत्रांमुळे होतात, असं डॉक्टरांचं मत आहे. गर्भपात टाळता येत नाही, परंतु गर्भधारणेदरम्यान धूम्रपान, अल्कोहोल आणि ड्रग्जचा वापर टाळल्याने धोका कमी होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी गरोदरपणाच्या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असते.
    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy

    पुढील बातम्या