पुणे, 06 डिसेंबर: लॉकडाऊनचे (Lockdown) तोटे किती झाले? असा प्रश्न विचारला तर आपण बरीच उदाहरणं देऊ. पण लॉकडाऊनचा फायदा काय झाला? असा प्रश्न विचारला तर तुमच्याकडे कदाचित उत्तर नसेल. पण लॉकडाऊनमुळे अनेक पती-पत्नींच्या आयुष्यात अनेक मोठे फायदे झाले आहेत. लॉकडाऊनमुळे पती-पत्नींमध्ये सुसंवाद वाढला असल्याची माहिती खुद्द भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांनीच दिली आहे. पुणे पोलिसांकडे येणाऱ्या कौटुंबिक तक्रारींमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांमध्ये भरोसा सेलकडे महिलांच्या 908 तक्रारी आल्या. त्यापैकी 139 तक्रारींवर मार्ग काढण्यात ती दाम्पत्य आणि भरोसा सेलचे अधिकारी यशस्वी झाले आहेत. केवळ 24 प्रकरणं न्यायालयामध्ये नोंदवण्यात आली. महिलांना त्रास देणाऱ्या 48 नवऱ्यांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात पती-पत्नींमध्ये सलोखा निर्माण झाला आणि तक्रारींचं प्रमाण घटलं अशी माहिती मिळत आहे.
लॉकडाऊनपूर्वी हे प्रमाण जास्त होतं. जानेवारी ते मार्च या पहिल्या तीन महिन्यात 715 तक्रारींची नोंद करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या काळात दरदिवशी भरोसा सेलकडे 7 तक्रारी येत होत्या. त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण 3 ते 4 वर आलं होतं. लॉकडाऊनमध्ये पती पत्नींना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता आला. यावेळी त्यांनी एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतलं. आणि कौटुंबिक हिंसाचार कमी व्हायला मदत झाली. अशी माहिती तेथील अधिकारी देतात.
भरोसा सेल काय काम करते?
महिलांवर होणारा कौटुंबिक अत्याचार कमी करण्याचं काम भरोसा सेलकडून करण्यात येतं. प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे पक्षकार आणि ज्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे, अशा दोन्ही व्यक्तींना बोलवून त्यांचं समुपदेशन करण्यात येतं. अनेकांचे संसार यामुळे सावरले आहेत.