झोप आणि मासिक पाळीवर चंद्राचा परिणाम; शास्त्रीय अभ्यासातून समोर आला रंजक निष्कर्ष

झोप आणि मासिक पाळीवर चंद्राचा परिणाम; शास्त्रीय अभ्यासातून समोर आला रंजक निष्कर्ष

चंद्राच्या स्थितीचा मानवाच्या झोपेशी आणि स्त्रियांच्या मासिक पाळीशी काय संबंध असं तुम्हाला वाटेल. मात्र याबाबत एक रंजक बाब समोर आली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 जानेवारी : चंद्राच्या किरणांचा (Moon) किंवा स्थितीचा मानवाच्या झोपेवर (sleep) आणि स्त्रियांच्या मासिक पाळीवर(Menstrual Cycle) परिणाम होतो, असं आपण पुरातन काळापासून ऐकत आलो आहोत, आजवर त्याला शास्त्रीय आधार मिळालेला नव्हता त्यामुळं हे एक मिथक असल्याचं मानलं जात होतं.

मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सत्य असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्विम्स, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार चंद्राचे विविध टप्पे झोपेवर आणि महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम करत असल्याचं सिद्ध झालं आहे.

सायन्स एडव्हान्सेस (Science Advances) या जर्नलमध्ये 27 जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात समोर आलं आहे, की 29.5 दिवसांच्या चंद्राच्या भ्रमणचक्रात लोकांच्या झोपेच्या चक्रातही चढ-उतार होतात. पौर्णिमेपर्यंतच्या (Lunar Day) दिवसांच्या कालावधीत लोक उशिरा झोपायला जातात आणि यादरम्यान ते कमी झोपतात, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

होरासिओ डे ला इग्लेसिया, लेआंड्रो कॅसिरागी, इग्नासिओ स्पियियस, गिडेन पी. डन्स्टर, कॅट्लिन मॅकग्लॉथलेन, एडुआर्डो फर्नांडीज-ड्यूक आणि क्लाउडिया वॅलेगिया या सात संशोधकांच्या गटाने हे संशोधन केलं आहे. उत्तर अर्जेंटिनातील (North ARGENTINA) फोर्मोसा भागातील टोबा-कूम (Toba Qom) हा आदिवासी समुदाय आणि सिएटलमधील साडेसात लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्यांचं निरीक्षण करून हे संशोधन करण्यात आलं आहे.

अर्जेन्टिनामधील एका ग्रामीण समुदायाच्या वास्तव्याच्या ठिकाणी विजेचं कनेक्शन नव्हतं, तर दुसऱ्या समुदायातील लोकांकडे काही प्रमाणात विजेचं कनेक्शन होतं. त्याचबरोबर तिसऱ्या शहरी भागातील समुदायाकडे विजेचं कनेक्शन होतं. दोन पौर्णिमांच्या दरम्यानच्या कालावधीत त्यांच्या झोपेच्या पद्धतीत झालेले बदल नोंदवण्यात आले. टोबा-कूम आदिवासी समुदायातील तीन-चतुर्थांश सहभागींचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

या संशोधनातील प्रमुख संशोधक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक होरासिओ डे ला इगलेसिया यांनी म्हटलं आहे की, पौर्णिमेच्या आधीच्या दिवसामध्ये झोपेचे प्रमाण कमी होतं आणि त्यानंतर झोपेच्या वेळेत वाढ झाल्याचे आढळले. विजेचा वापर नसलेल्या समुदायामध्ये हा प्रभाव ठळकपणे जाणवला तसाच तो विजेचा वापर असलेल्या शहरी विद्यार्थ्यांमध्येही सारखाच दिसून आला.

पौर्णिमेच्या काळातही झोपेमध्ये सरासरी 46 ते 58 मिनिटांचा फरक आढळून आला आहे. झोपेच्या वेळेत साधारण 30 मिनिटांचा फरक होता. पौर्णिमेपर्यंतच्या तीन ते पाच दिवसांमध्ये या तीनही समुदायातील लोकांच्या झोपेच्या वेळा उशीराच्या झाल्या आणि त्यांचा झोपेचा वेळ कमी झाल्याचं या संशोधनात आढळलं आहे.

अर्जेंटीनाच्या टोबा संस्कृतीत(Toba Culture) चंद्र हा पुरुषाचं प्रतीक मानला जातो, तर त्याच्या कलांचा संबंध स्त्रियांशी जोडला जातो. पहिली मासिक पाळी आणि पुढील मासिक पाळीच्या चक्राचे नियमन यांचा संबंध चंद्राच्या गतीचक्राशी जोडला जातो. जुन्या टोबा क्यूम समुदायाच्या लोककथांमध्येही चांदण्या रात्री लैंगिकभावना तीव्रतेनं जागृत होत असल्याचं सांगितलं गेलं आहे. शिवाय अर्जेटिनाच्या आदिवासी समाजामध्ये चंद्रप्रकाशाचा, चंद्राचा संबंध स्त्रियांच्या जननक्षमतेशी जोडण्यात आला आहे.

Published by: News18 Desk
First published: January 28, 2021, 11:25 PM IST

ताज्या बातम्या