इस्लामाबाद, 17 सप्टेंबर : आपण प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. अनेकांचं हे स्वप्नं पूर्ण केलं ते टिकटॉकने (Tiktok). चिनी अॅप म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतात टिकटॉकवर बंदी असली तरी काही देशांमध्ये त्याचा वापर अजूनही केला जातो आहे. आपले टिकटॉकचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोक अशी काही ना काही शक्कल लढवत आहेत, ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पाकिस्तानमधील अशाच एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ (pakistani woman tiktok video) व्हायरल होऊ लागला. ज्यामध्ये तिनं चक्क आपल्या जिवंत पतीलाच मृत घोषित केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानातील प्रसिद्ध टिकटॉक स्टार आदिल राजपूत यांच्या पत्नीने हा व्हिडीओ बनवला. आदिल राजपूत यांचे 26 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटवरून त्यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूबाबत व्हिडीओ पोस्ट केला. "आदिलचा कार अपघातात मृत्यू झाला, तो आता या जगात नाही", असं सांगत ती महिला व्हिडीओत ढसाढसा रडू लागली. तिचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनी हळहळ व्यक्त केली. पाहता पाहता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आदिल यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्यापासून दूर राहणारे त्यांचे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींचे फोन येऊ लागले. आदिल यांच्या घराजवळ लोकांची गर्दी झाली, त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यासाठी लोक जमू लागले. इतकंच नव्हे तर त्यांच्या घराजवळील मशिदीतून त्यांच्या मृत्यूची घोषणादेखील करण्यात आली.
हे वाचा - NASA च्या कॅमेऱ्यात चित्रित झालं मंगळावरचं 'भूत'? रोव्हरने टिपलेला VIDEO पाहा
मात्र आदिल हे जिवंत होते. आदिल यांच्या घरी पोहोचल्यानंतर लोकांना सत्य परिस्थिती समजली. टिकटॉकवर त्यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूचा खोटा व्हिडीओ शेअर केला होता हे समजलं आणि मग सर्वांचाच संताप उडाला. आदिल आणि त्यांच्या पत्नीवर कारवाई व्हावी अशी मागणी सोशल मीडियावरच होऊ लागली. लोकांचा हा संताप पाहिल्यानंतर आदिल यांच्या पत्नीने आणखी एक नवा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला. ज्यामध्ये तिनं आपला पती सुरक्षित असून तो घरी आल्याचं सांगितलं.
हे वाचा - माकडालाही आवरला नाही सेल्फीचा मोह; तरुणाचा फोन पळवून काढले भन्नाट PHOTOS
ज्या उद्देशाने महिलेने हा व्हिडीओ तयार केला तो किती साध्य झाला हे माहिती नाही. या व्हिडीओमुळे फॉलोअर्स वाढले की कमी झाले याची कल्पना नाही. मात्र असा व्हिडीओ तयार करणं या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या चांगलंच अंगलट आलं आहे, इतकं मात्र नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.