नवी दिल्ली, 25 एप्रिल : देशात सध्या कोविड-19 च्या (Covid-19) रुग्णसंख्येत अतिप्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यानं, ऑक्सिजनचाही (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. अनेक रूग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणं (Respiration Problem) हे सर्वसाधारण लक्षण दिसून येत असून, फार त्रास नसणारे अनेक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यांच्यामध्ये रक्तातील ऑक्सिजन कमी-जास्त होत असल्याचं किंवा अचानक कमी झाल्याचं लक्षण दिसत आहे. अशावेळी ऑक्सिजनची व्यवस्था होईपर्यंत एक साधा सोपा उपाय तज्ज्ञांनी सुचवला आहे.
ही एक साधी सोपी क्रिया आहे. यामध्ये रुग्णाने पोटावर झोपून, चेहरा खाली जमिनीकडे ठेवून छातीचा भाग थोडासा उंच करून सतत श्वास घ्यायचा आहे. याला प्रोन पोश्चर (Prone Posture) किंवा प्रोन व्हेंटिलेटर मेथड (Prone Ventilator Method) म्हणतात. यामुळे ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत होते.
पाटणा येथील एम्स रूग्णालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या उपायाचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्या आणि दुसर्या लाटेत होणाऱ्या मृत्यूच्या टक्केवारीत कोणताही फरक नाही. मात्र या लाटेत ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याचं दिसून आलं असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे. देशात सध्या 20 लाख रुग्ण उपचार घेत असून, ऑक्सिजनची मागणी प्रचंड आहे.
प्रोन व्हेंटिलेटर मेथडबाबत दिल्लीतील बीएलकेसी सेंटर फॉर क्रिटिकल केअरचे (BLKC Centre for Critical Care) वरिष्ठ संचालक डॉ. राजेश पांडे यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘फुफ्फुसात (Lungs) पुढचा, मधला आणि मागचा असे भागअसतात. जेव्हा एखादी व्यक्ती पाठीवर झोपते, तेव्हा छातीचा भाग वरच्या दिशेला असतो. तेव्हा, फुफ्फुसाच्या मागच्या भागाला रक्तपुरवठा अधिक होतो, तर पुढच्या भागाला कमी होतो. आत जाणाऱ्या हवेचा प्रवाह लक्षात घेतला, तर मागच्या भागाला कमीतकमी ऑक्सिजन पुरवठा होतो, हे लक्षात येईल.'
'जेव्हा एखादी व्यक्ती प्रोन पोश्चर ठेवते तेव्हा हृदयाला छातीच्या हाडांचा आधार मिळतो आणि फुफ्फुसांना विस्तारण्यासाठी अधिक जागा मिळते. त्यामुळे फुफ्फुसाच्या मागच्या भागाला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक होतो. या भागात रक्ताभिसरण अधिक होतं. त्यामुळे दोन्हीचा एकत्रित परिणाम चांगला होऊन ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) वाढते.’
ते पुढे म्हणाले की, ‘कोविड-19 उद्भवण्यापूर्वी देखील श्वसनाला अतिशय त्रास होणाऱ्या, व्हेंटिलेटरची गरज भासणाऱ्या रुग्णाबाबत असा उपचार केला जात असे. आम्ही रुग्णाला 16 तास अशा प्रोन पोश्चरमध्ये ठेवत असू, यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होण्यात मदत होत असे. अर्थात कोविडपूर्वी असा उपाय सर्वसामान्य नव्हता; त्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या प्रत्येक रुग्णावर असा उपाय करता येत नाही. अशा रुग्णांसाठी नाकातून नळी घालून किंवा मास्क लावून ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या पद्धतींचा वापर केला जातो. व्हेंटिलेटरवर असलेल्या किंवा उच्च प्रमाणात सीडेटीव्ह दिलेल्या रुग्णांना अशा प्रोन पोश्चरमध्ये ठेवून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आता सरसकटपणे कोविड-19 च्या रूग्णांसाठीही पध्दत वापरली जात आहे.’
Oxygen saturation can become the difference between home-care & hospitalisation for COVID patients.
Our amazing team @AaynaClinic just made a guide to proning. Everyone must know about it at this time. Pls share widely! pic.twitter.com/2HRoi9oEQP — Dr. Simal Soin (@DrSimalSoin) April 21, 2021
या उपायामुळे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचं आढळलेलं नाही, उलट सकारात्मकच परिणाम दिसून आल्याचं डॉ. पांडे यांनी नमूद केलं. घरातच उपचार घेत असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा रुग्ण रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदतीची वाट पाहत असेल, अशावेळी हा उपाय वापरण्याची शिफारस डॉ. पांडे यांनी केली आहे.
हा उपाय एक तात्पुरता पर्याय आहे. रूग्णालयातील उपचार किंवा ऑक्सिजन सिलेंडर हा पर्याय नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं लक्षात आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Oxygen supply