वॉशिंग्टन डीसी, 13 ऑक्टोबर : गेल्या महिन्यात अमेरिकेतल्या कॅटलिनाच्या आकाशात एका छोट्या चंद्रासारखा दिसणारा लघुग्रह दिसू लागला. या 'मिनी मून'चं रहस्य अखेर NASA ने उलगडलं आहे. अमेरिकेच्या या अवकाश संस्थेच्याच 54 वर्षांपूर्वीच्या अंतराळ मोहिमेतून या कथित चंद्राची निर्मिती झाली आहे. सप्टेंबरमध्ये पृथ्वीभोवती फिरताना एक नवा 'चंद्र'सदृश गोळा दिसला असं नासाकडून सांगण्यात आलं होतं. नवा लघुग्रह असल्याचं मानलं जात असतानाच आता वेगळीच माहिती उजेडात आली आहे. हा लघुग्रह नसून एका अयशस्वी स्पेस मिशनचा तो रॉकेटचा तुकडा असल्याचं NASA नेच स्पष्ट केलं आहे.
1966 मध्ये नासाने मून लॅंडिंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही चुकांमुळे ते रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाण्याऐवजी सूर्याच्या कक्षेत गेलं. नासाने त्यांचे हे महागडं रॉकेट पुन्हा कधीच पाहिलं नाही. ते अवकाशात भरकटलं. गेल्या महिन्यात मिनी मून दिसला, म्हणून गफलत झाली ती याच रॉकेटमुळे. याच रॉकेटचा एक भरकटलेला तुकडा पृथ्वीच्या कक्षेत आला आहे. आणि काही शास्त्रज्ञांच्या गोंधळामुळे तो लघुग्रह असल्याचं समजलं गेलं. पण तब्बल 54 वर्षांनंतर या रॉकेटचा एक तुकडा निदर्शनास आला आहे.
अंदाजे 26 फूट लांब असणारी ही वस्तू हवाई येथील एका दूर्बिणीतून दिसली होती. 1,500 mph (2414 km) वेगाने फिरणाऱ्या या वस्तूला एक अस्ट्रॉइड म्हणजे लघुग्रह मानलं गेलं आणि त्याचे नाव 'asteroid 2020 SO' असं ठेवण्यात आले. परंतु आता हे सिद्ध झाले आहे की हा एक लघुग्रह नसून सर्व्हेअर 2 साठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचा तुकडा आहे.
त्यावेळी ठरल्याप्रमाणे रॉकेट पुढे गेलं नाही आणि ते चंद्राऐवजी सूर्याच्या कक्षेत गेले. पण त्या रॉकेटचा लॅंडर हा एका चुकीमुळे रॉकेट सोबत न जाता चंद्रावर जाऊन पडला.
परंतु विश्वाच्या नियमानुसार जे दूर जातं ते परत सुद्धा येतं. तसंच हे निघून गेलेलं रॉकेट खरोखरच परत येताना दिसून आलं आहे.
NASA च्या सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजचे संचालक पॉल चोदास यांनी सप्टेंबरमध्ये एक दावा केला की हे कुठलंही स्पेस ऑब्जेक्ट नसून ते नासाचं रॉकेट आहे. त्यांचा दावा आता खरा ठरला आहे.
त्यांनी सांगितलं की, "या बाबतीत थोडा मीसुद्धा आश्चर्यचकित झालो होतो. अशा काही गोष्टी शोधणे आणि त्यांचा संबंध अनेक गोष्टींशी लावणे हा माझा छंद आहे. परंतु या बाबतीत माझा अंदाज चुकीचा ठरू शकतो त्यामुळे मी खूप आत्मविश्वासाने तेव्हा बोललो नाही."
1966 च्या मोहिमेची तारीख आणि तो तुकडा पृथ्वीच्या दिशने येण्यासाठी लागणारा संभाव्य काळ याचं गणित मांडलं तर ते अचूक येतं, असं पॉल यांनी सांगितलं. त्यामुळे तो रॉकेटचा तुकडा असल्याचं सिद्ध झालं. त्याचा वेग हा लघुग्रहांच्या नियमित वेगापेक्षा कमी आहे. आणि इतर लघुग्रहांप्रमाणे ते पृथ्वीकडे झुकलेलं नसून पृथ्वीच्या समान पातळीवर फिरत आहे.
तरीसुध्दा हा लघुग्रह असो किंवा एखाद्या रॉकेटचा तुकडा काही दिवसांनी कोणीही पाहायचा म्हटलं तर तो पृथ्वीवरून कोणालाच पाहता येणार नाही. हा तुकडा पुढील चार महिन्यांसाठी पृथ्वीच्या कक्षेत राहून मग तो सूर्याच्या कक्षेत फेकला जाईल. आणि तो एका अयशस्वी मिशनचा पुरावा म्हणून अवकाशातच राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.