Home /News /lifestyle /

कोरोनाच्या भीतीने इतर आजारांकडे दुर्लक्ष नको; घरगुती उपचार महागात पडतील

कोरोनाच्या भीतीने इतर आजारांकडे दुर्लक्ष नको; घरगुती उपचार महागात पडतील

आता नॉन कोविड रुग्णानांही रुग्णालयात जाण्याची भीती वाटू लागली आहे.

    21 जुलै, मुंबई : दिवसेंदिवस कोविड 19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या तसेच शहरातील एकंदरीत परिस्थिती पाहता मुंबईकर पुरते घाबरले असून हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती नागरिकांना वाटते आहे. भीतीपोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून स्वतःच्या मनानेच औषधोपचार करण्याचा धोका पत्करत आहेत. एकीकडे पावसाळी आजार तर दुसरीकडे कोरोना यांची लक्षणे काही प्रमाणात सारखी असून डॉक्टरांनाही उपचारांमध्ये अनेक आव्हाने पेलावी लागत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांनी सांगितलं, "पावसाळी आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये ताप, सर्दी, श्वसन विकारांनीही डोके वर काढले आहे. या आजारांची लक्षणे तसेच कोविड 19 ची लक्षणे जवळपास सारखी असल्याने रोगाचे निदान करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरत आहे" झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूरचे सल्लागार डॉक्टर आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत शाह सांगतात, "डेंग्यू आणि मलेरियासारखे पावसाळी आजार वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत डेंग्यू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार केले आहेत. मलेरियासारखा आजार प्राणघातक असू शकतो आणि सद्यपरिस्थितीत कोविड 19 आणि पावसाळी आजार यांचे अचूक निदान करणे डॉक्टरांना आव्हानात्मक ठरणार आहे. बरेचशे नागरिक जे कोरोनाव्हायरस बाधित असू शकतात हे माहित असूनही डॉक्टरांकडे जाण्याची भीती बाळगतात" हे वाचा - पावसात मनसोक्त भिजायला आवडतं, पण आजारी पडण्याची भीती; अशी घ्या आरोग्याची काळजी विविध लक्षणे दिसत असूनही नागरिक कोरोनाच्या भीतीपोटी नातेवाईक, परिसरातील शेजारी तसेच डॉक्टरांना याविषयी माहिती न देता घरबसल्या स्वतःच्या मनाने औषधोपचार करत आहेत. असे करणे त्यांच्या आरोग्यास घातक असून त्याची मोठी किंमत या नागरिकांना मोजावी लागू शकते असेही डॉक्टरांनी सांगितले. "गुंतागुंत वाढल्यास, तब्येत खालावल्यास शेवटच्या क्षणी नागरिक रुग्णालयाला भेट देत असल्याने डॉक्टरांना अशा वेळी रुग्णाला धोक्याबाहेर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. अशा वेळी कमीत कमी वेळात योग्य निदान करणे डॉक्टरांकरिता अवघड झाले असून उपाचारास विलंब झाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे", असे डॉ राणे यांनी स्पष्ट केले. हे वाचा - कोरोना फक्त फुफ्फुस नव्हे तर मेंदूवरही करतोय हल्ला; ही आहेत लक्षणं लक्षणांकडे दुर्लक्ष करुन उपचारांना उशीर केल्याने हे आजारपण जीवावरही बेतू शकते. स्वतःच्या मर्जीने औषधे न घेता त्याऐवजी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि परिस्थिती आणखी खराब होण्यापूर्वीच उपचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health

    पुढील बातम्या