मुंबई, 6 डिसेंबर : कोरोना व्हायरसमुळे (COVID19) 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी त्रासदायक ठरलं. सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वांचा या वर्षातील बहुतेक काळ हा घरांमध्येच गेला आहे. हे वर्ष कधी संपणार? याचेच वेध अनेकांना गेल्या काही महिन्यांपासून लागले आहेत. नव्या वर्षाला (New year 2021) नव्या उत्साहाने आणि नव्या संकल्पनांसह सामोरे जाण्याची त्यांची योजना आहे. 2020 मधील शेवटचा म्हणजे डिसेंबर महिना सध्या सुरू आहे. त्यामुळे आता जगभर 2021 चे काऊंटडाऊन (2021 Countdown) सुरु झाले आहे.
नवे वर्ष सुरु होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांचे नियोजन अनेकजण करतात. सहलीला बाहेरगावी जाण्यासाठी जोडून येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या आहेत? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. काही सार्वजनिक सुट्ट्या रविवारी आल्याने हिरमोड होणे स्वाभाविक आहे. 2021 मध्ये मात्र फक्त दोनच सुट्ट्या या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे आगामी वर्षात सर्वांना बहुतेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.
जानेवारी ते मार्च
जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिवसाची एकमेव सुट्टी आहे. यंदा प्रजासत्ताक दिन मंगळवारी आलाय. त्यामुळे सोमवारी रजा घेऊन शनिवार ते मंगळवार चार दिवसांच्या सहलीचं नियोजन तुम्ही करू शकता. फेब्रुवारी महिन्यात कोणतीही सुट्टी नाही. त्यानंतर 11 मार्चला गुरुवारी महाशिवरात्रीची सुट्टी आली आहे. 28 मार्चला होळीच्या दिवशी रविवार आल्याने ती सुट्टी वाया जाणार आहे.
सुट्टीचा वार बुधवार!
2021 च्या एप्रिलमध्ये 2 एप्रिलला गुडफ्रायडे आहे. तर 14 एप्रिलची आंबेडकर जयंती आणि 21 एप्रिलच्या रामनवमीच्या दिवशी बुधवार आलाय. 12 मे रोजी ईद उल फितरची सुट्टी असून त्या दिवशीही बुधवार आला आहे. तसेच 26 मे रोजी बौद्ध पौर्णिमेची सुट्टी देखील बुधवारीच आली आहे. जून महिन्यात एकही सुट्टी नाही. त्यानंतर 21 जुलै रोजी बकरी ईदची सुट्टी असून त्या दिवशी देखील बुधवार आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर
ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनी रविवार आल्याने ती सुट्टी यंदा मिळणार नाही. 19 ऑगस्टला गुरुवारी मोहरमची सुट्टी असून त्याला जोडून शुक्रवारची रजा घेतल्यास सलग चार दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येईल. 30 ऑगस्टला सोमवारी जन्माष्टमीची सुट्टी आहे. 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात कोणतीही सुट्टी नाही.
ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबर ( गांधी जयंती, शनिवार), 15 ऑक्टोबर (दसरा, शुक्रवार) आणि 19 ऑक्टोबर ( ईद-ए-मिलाद, मंगळवार) अशा तीन प्रमुख सुट्या आहेत. यामध्ये दसरा शुक्रवारी आल्याने तेंव्हा तीन सलग सुट्ट्या मिळणार आहेत.
दिवाळी कधी आहे?
2021 मध्ये दिवाळी 4 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्या दिवशी गुरुवार आहे. त्यामुळे सलग चार सुट्ट्या घेण्याचे नियोजन तुम्ही करु शकता. तसेच 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी शनिवारी आहे.