Home /News /lifestyle /

कॅन्सरग्रस्तांसाठी नवा आशेचा किरण; फोटोइम्युनोथेरेपीमुळे आयुर्मान अधिक वाढणार

कॅन्सरग्रस्तांसाठी नवा आशेचा किरण; फोटोइम्युनोथेरेपीमुळे आयुर्मान अधिक वाढणार

(प्रतीकात्मक फोटो- shutterstock.com)

(प्रतीकात्मक फोटो- shutterstock.com)

फोटोइम्युनोथेरपी (Photoimmunotherapy) या नव्या उपचारपद्धतीमुळे कॅन्सरच्या सर्व पेशी शरीरातून काढता येऊ शकतील.

मुंबई, 21 जून : कर्करोग (Cancer) पूर्ण बरा करता येतो किंवा रुग्णाची कर्करोगातून कायमस्वरूपी सुटका होऊ शकते, याची खात्री अजूनही तज्ज्ञांना देता येत नाही. कर्करोगाचं निदान, त्यावरचे उपचार, काळजी याबाबत अनेक नवीन उपचारपद्धतींचा शोध आता लागला आहे; मात्र कितीही उपचार केले, तरी रुग्णाची प्रतिकारशक्ती हळूहळू कमीच होत जाते, हे आजवर दिसून आलं आहे. तसंच एकदा बरा झाल्यावर काही वर्षांनी हा आजार पुन्हा उद्भवण्याचा धोकाही असतो. आता शास्त्रज्ञांनी फोटोइम्युनोथेरपी (Photoimmunotherapy) या नव्या उपचारपद्धतीचा शोध लावला आहे. या नव्या उपचारपद्धतीमुळे रुग्णाचं आयुष्य आणखी वाढू शकतं. रुग्णाची रोगप्रतिकारशक्तीही कमी होत नाही. फोटोइम्युनोथेरपीवर काम करणाऱ्या लंडनमधल्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही खूप वेगळी उपचारपद्धती आहे. त्यात रुग्णाच्या शरीरातल्या कर्करोगाच्या पेशी (Cancer cells) अंधारात चमकताना दिसतात. त्यामुळे त्या सहज शोधून काढून टाकता येतात. आजवर जे उपचार केले जात होते, त्यातून काही कॅन्सरपेशी रुग्णाच्या शरीरात राहून जायचा धोका होता. त्या पूर्णपणे काढून टाकणं शक्य नव्हतं; मात्र या नव्या थेरपीनं त्या सगळ्या पेशी काढता येऊ शकतील. हे वाचा - सावधान! किडनी कॅन्सरची लक्षणं असतात किडनी स्टोनसारखीच; चुकीचं निदान झाल्यावर काय कराल? टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार ‘द गार्डियन’मधल्या रिपोर्टमध्ये संशोधकांनी असा दावा केला आहे, की या उपचारपद्धतीनंतर रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणार नाही. रुग्णांना पुन्हा मेंदूच्या कर्करोगाची लक्षणं दिसू लागली, तर त्यावर नियंत्रण मिळवणं यामुळे सोपं होईल. संशोधक डॉ. गॅब्रिएला यांच्या म्हणण्यानुसार, मेंदूच्या कर्करोगावर उपचार करणं कठीण आणि आव्हानात्मक असतं. ट्यूमर काढण्यासाठी एखादी नवीन पद्धत शोधता आली, तर ते कर्करोगाच्या उपचारासाठी सोपं होईल. कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटनं यासाठीचा प्रयोग उंदरांवर केला. या उंदरांना ग्लियोब्लास्टोमा नावाचा मेंदूचा कर्करोग (Brain Cancer) झाला होता. त्यांच्या उपचारपद्धतीत फोटोइम्युनोथेरपी वापरल्यामुळे बहुतेक सर्व कॅन्सरपेशी काढून टाकता आल्या. ज्या काढता आल्या नाहीत, त्या इतर उपचारपद्धतींच्या साह्याने काढून टाकण्यात आल्या. उंदरांवर हा प्रयोग यशस्वी झाला. आता माणसांवर याचा लवकरच प्रयोग केला जाईल. तिथेही हा प्रयोग यशस्वी झाला, तर कर्करोगाच्या इतर प्रकारांमध्ये ही उपचारपद्धती कशी काम करते, याबाबत संशोधन केलं जाईल. त्यानुसार कोणत्या प्रकारच्या कर्करोगासाठी या फोटोइम्युनोथेरपीचा किती फायदा होतो हे कळण्यास मदत होईल. हे वाचा - Shocking! जन्मानंतर 2 वर्षांतच चिमुकला 'तरुण' झाला; प्रायव्हेट पार्टमधील बदल पाहून डॉक्टरही शॉक कर्करोगावर उपचार करण्यासाठी सध्या केमोथेरपी (Chemotherapy), रेडिओथेरपी (Radiotherapy), इम्युनोथेरपी अशा उपचारपद्धती वापरण्यात येत आहेत; मात्र यात काही कॅन्सरपेशी शरीरातच राहण्याचा धोका असतो. नव्या उपचारपद्धतीमुळे जास्तीत जास्त कॅन्सरपेशी शोधणं व काढून टाकणं शक्य होईल. हे कॅन्सररुग्णांसाठी खूप फायद्याचं ठरू शकेल.
First published:

Tags: Cancer, Health, Lifestyle, Serious diseases

पुढील बातम्या