मुंबई, 31 मार्च : विमान प्रवासादरम्यान सहप्रवासी अशा अनेक गोष्टी करतात, ज्यामुळे इतरांना खरोखरच त्रास होतो. उदा. तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा काही जण तुमच्याकडे सीट बदलण्याची मागणी करू लागतील. काही जण मोठ्याने बोलू लागतील. अलीकडे अनेक जण मोबाइलवर चित्रपट बघतात. तथापि यापेक्षा सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे तुमच्या शेजारी बसलेला प्रवासी त्याचे बूट आणि मोजे काढून बसतो. काही जण तर विमानात अनवाणी फिरतात; पण या गोष्टी टाळल्या पाहिजेत. एका फ्लाइट अटेंडंटने यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. तसंच सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचेही म्हटलं आहे.
प्रादेशिक फ्लाइट अटेंडंट लीशा पेरेझ यांनी 'इनसाइडर'शी बोलताना सांगितलं की, विमानातल्या लेनमध्ये शूज काढणं हे केवळ असभ्यपणाचं लक्षण नाही तर ते आरोग्यासाठीही धोकादायक आहे. तुम्ही केव्हा तरी पाहिलं असेल की बाथरूमच्या फरशीवर पाण्यासारखा द्रव पदार्थ पसरलेला असतो. तुम्ही बाथरूममध्ये त्यावरून चालत जाता. तिथं अस्वच्छता असू शकते, हे तुमच्या कधीच लक्षात येत नाही. कारण विमानातील टॉयलेट नियमित साफ करणं शक्य नसतं. सहसा क्युबिकल उड्डाणापूर्वी साफ केले जातात. त्यानंतर उड्डाणादरम्यान, दर अर्ध्या तासाने त्यांची तपासणी केली जाते. परंतु बऱ्याचदा 'लू'जची स्वच्छता करण्यास उशीर होतो.
हेही वाचा - T-Shirts वरही दिसेल मराठीची गंमत, 'इथं' करा खरेदी, सर्वच होतील इम्प्रेस! Video
संसर्गाचा धोका जास्त
'पायाला हा द्रव पदार्थ लागलेला असेल तर पडण्याची शक्यता जास्त असते',असं पेरेझ यांनी सांगितलं. अमेरिकेतल्या एका क्रू मेंबरनेही त्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. तो लिहितो, 'प्रत्येक गोष्टीसाठी शूजचा वापर करावा. विमानात अनवाणी फिरणं किंवा नुसते मोजे घालून फिरणं किळसवाणं आहे'. आरोग्य विभागातले अधिकारी प्रा. जगदीश खूबचंदानी म्हणाले, 'लांबच्या विमान प्रवासादरम्यान काही जण किंवा लहान मुलं विमानात अनवाणी फिरतात किंवा बाथरूममध्ये जातात. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. कोणाच्या पायाला जखम झाली असेल तर संसर्ग वेगाने पसरू शकतो'.
ही बाब खूप महत्त्वाची
संभाव्य गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी ही बाब अत्यंत आवश्यक आहे. सामान्यतः विमानाच्या केबिन पूर्णपणे स्वच्छ नसतात. कारण साफसफाईसाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. अशा परिस्थितीत सीटच्या पाठीमागच्या बाजूला टाकलेला कचरा उचलण्यात आणि टॉयलेटच्या दाराचं हँडल स्वच्छ करण्यात जास्त वेळ जातो. सहसा कार्पेट फक्त व्हॅक्यूम केलेली असतात. काही अन्नपदार्थ, पेय आदी सांडलं असेल तर सफाई कर्मचारी फक्त डाग काढून टाकतात. संपूर्ण भागाचं निर्जंतुकीकरण केलं जात नाही. यामुळे जंतू पसरू शकतात. विमानात पूर्ण स्वच्छता ही सामान्यपणे चार किंवा सहा आठवड्यातून एकदा केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle