पुणे, 15 जानेवारी : भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Pune serum institute of india) तयार केलेल्या (Covishield) कोरोना लशीसह (corona vaccine) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (covaxin) लशीला आपात्कालीन मंजुरी दिली. यानंतर जगातील बहुतेक देशांचं लक्ष हे भारताकडे आहे. बऱ्याच देशांना भारतातील कोरोना लस हवी आहे. अगदी यूकेतील (UK) ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाचीही भारतात तयार झालेल्या लशीला मागणी आहे. भारतातील कोव्हिशिल्ड लशीला आता नेपाळमध्येही (Nepal) परवानगी देण्यात आली आहे.
भारतातील कोव्हिशिल्ड लशीला नेपाळनं आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या लशीला अटींसह परवानगी देण्यात आल्याची माहिती नेपाळ सरकारनं दिली आहे.
दरम्यान याआधी ब्राझीलनंही (Brazil) भारताकडे कोरोना लशीची मागणी केली आहे. ब्राझील सरकारनं तर भारतामधून ही लस आणण्यासाठी विशेष विमान तयार असल्याचं जाहीर केलं आहे. अजुल एअर लाईन्सची एअरक्राफ्ट एअरबस A330neo मुंबईमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे, असं ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या विमानातून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून 20 लाख लस थेट ब्राझीलमध्ये आणण्यात येतील असा त्यांचा दावा आहे.
भारत सरकारचं उत्तर काय?
“देशातील कोव्हिड 19 लशीचा उत्पादन कार्यक्रम आणि उपलब्धता याची समीक्षा करण्याचं काम सध्या सुरू आहे. दुसऱ्या देशांच्या मागणीची पूर्तता करण्याबाबतचा निर्णय घेण्यास आणखी थोडा वेळ लागू शकतो,’’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे. भारतामधून लस आणण्यासाठी ब्राझीलचं विमान सज्ज असल्याच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
इतर देशांना लशीचा पुरवठा कधी केला जाणार? या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीवास्तव यांनी "भारत लशीचं उत्पादन आणि पुरवठ्याबाबत भारताच्या क्षमतेचा वापर या संकटाच्या प्रसंगी मानवी कल्याणपूर्तीसाठी करणार आहे", या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची आठवण त्यांनी करून दिली.
हे वाचा - काळजीची बातमी! अमेरिकेत येत्या 3 आठवड्यात कोरोनामुळे होणार 90,000 जणांचा मृत्यू?
“देशातील लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशांना होणाऱ्या पुरवठ्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं हे घाईचं ठरेल’’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
भारतामधील कार्यक्रम काय?
न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया(SII) सरकारला साडेचार कोटी डोस देणार आहे. एक 1 कोटी 10 लाख डोस हे पहिल्या टप्प्यात देण्यात असून असून भारत बायोटेककडून देखील लवकरच 55 लाख डोस देण्यात येणार आहेत. एकूण 1 कोटी डोसची ऑर्डर भारत बायोटेकला देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 38.5 लाख तर दुसऱ्या टप्प्यात 16.5 लाख आणि त्यानंतर आणखी 45 लाख डोस देण्यात येणार आहेत.
हे वाचा - एकदा कोरोना होऊन गेलाय? मग आठ महिने तरी पुन्हा होण्याची शक्यता नाही!
लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राथमिकता दिली जाईल. या सर्वांची संख्या सुमारे 3 कोटी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine