मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक; 100 पैकी दोन महिलांना आहे अ‍ॅनिमिया

महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक; 100 पैकी दोन महिलांना आहे अ‍ॅनिमिया

अ‍ॅनिमिया

अ‍ॅनिमिया

राज्य सरकारच्या कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीतील माहितीनुसार, प्रत्येक 100 महिलांपैकी जवळपास दोन महिला गंभीर अशक्तपणाचा म्हणजेच अ‍ॅनिमियाचा सामना करत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 डिसेंबर: कुटुंब व्यवस्था सुरळीत चालवण्याची सर्वांत मोठी जबाबदारी स्त्रिया पार पाडतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानात लहान गोष्टींची काळजी त्या घेतात. मात्र, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. भारतामध्ये तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. नुकतीच आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्याबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीतील माहितीनुसार, प्रत्येक 100 महिलांपैकी जवळपास दोन महिला गंभीर अशक्तपणाचा म्हणजेच अ‍ॅनिमियाचा सामना करत आहेत. त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन पातळी प्रति डेसीलिटर 8.0 ग्रॅमपेक्षा कमी आढळली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडांनुसार, प्रौढ महिलांमध्ये प्रति डेसीलिटर 12 ग्रॅमपेक्षा कमी आणि पुरुषांमध्ये प्रति डेसीलिटर 13 ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असेल तर त्यांना अ‍ॅनिमिया असल्याचं ग्राह्य धरलं जातं. या शिवाय, पुरुष आणि महिलांच्या रक्तात प्रति डेसीलिटर 8.0 ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असेल तर ते अतिअशक्त असल्याचं मानलं जातं. सप्टेंबर महिन्यापासून महाराष्ट्रात ‘आई सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही राज्यव्यापी आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास 4.01 कोटी महिलांची तपासणी झाली आहे. त्यापैकी 7 लाखांहून अधिक (7 सात लाख 34 हजार 679) स्त्रियांना गंभीर अ‍ॅनिमिया असल्याचं आढळलं आहे. हे प्रमाण तपासणी केलेल्या स्त्रियांच्या एकूण संख्येच्या 1.8 टक्के आहे.

हेही वाचा - Heart Attack: तारुण्यात हार्ट अटॅक टाळायचा असेल तर काही गोष्टींना पर्याय नाही

"गंभीर अशक्तपणा आढळलेल्या सर्व स्त्रियांना उपचार आणि आरोग्य सेवेसाठी थर्ड-केअर हॉस्पिटलमध्ये पाठवलं जात आहे. सामान्यतः अशक्तपणा शोधण्यासाठी गर्भवती महिलांची चाचणी केली जाते. पण, नव्यानं सुरू केलेल्या सर्वेक्षणामुळे सर्व महिलांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे अशक्तपणाचं प्रमाण मोजण्यास मदत होत आहे," अशी माहिती आरोग्य सेवा संचालनालयातील असंसर्गजन्य रोग सेलच्या संयुक्त संचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दिली.

अ‍ॅनिमिया हा राज्यातील सर्वांत सामान्य न्युट्रिशनल डेफिशिअन्सी विकार आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-4 च्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील 54.2 टक्के महिलांना अ‍ॅनिमिया आहे. तरुण स्त्रियांमध्ये अॅनिमिया हे चिंतेचं सर्वांत गंभीर कारण आहे. अॅनिमियामुळे स्त्रियांच्या संज्ञानात्मक विकासावर आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. ज्यामुळे दैनंदिन कामं करताना गंभीर समस्या निर्माण होतात. जेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण 8 टक्क्यांपेक्षा कमी होतं तेव्हा आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होतो.

"प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये तीव्र अशक्तपणा ही सर्वांत मोठी चिंतेची बाब ठरते. कारण, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे गरोदर आईसह न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो," मुंबईतील सायन रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण नायक यांनी सांगितलं. सायन रुग्णालयात दरवर्षी सर्वांत जास्त प्रसूती होतात.

अशक्तपणाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, महिलांना नियमित औषधांसह ब्लड ट्रान्सफ्युजनचीदेखील आवश्यकता भासू शकते. महाराष्ट्रातील दुर्गम जिल्ह्यांमध्ये योग्य आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे अशा महिलांच्या उपचारांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन हा सर्वांत मोठा अडथळा ठरतो. उदाहरणार्थ, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात दोन महिला रुग्णालयं मंजूर झाली आहेत. एक नंदुरबार तालुक्यातील सरकारी रुग्णालयाच्या आवारात आणि दुसरं धडगाव तालुक्यात. मात्र, ही दोन्ही रुग्णालयं कागदावरच अस्तित्वात आहेत. परिणामी, कर्मचार्‍यांच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णालयातील रक्त युनिटही अकार्यक्षम पडून आहेत.

राज्य-नियुक्त कोअर कमिटी आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या (एनबीए) सदस्या लतिका राजपूत यांनी सांगितलं की, महिलांसाठीच्या रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. म्हणूनच त्यांच्यासाठी रक्तपेढ्या महत्त्वपूर्ण आहेत. अनेक महिलांना तीव्र अशक्तपणाचा त्रास होतो. बाळाच्या जन्मादरम्यान रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी इतर हॉस्पिटलमधून रक्त नेण्याची वाट पाहत असताना एखाद्या महिलेचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रक्तपेढ्या अत्यावश्यक आहेत. आरोग्य व्यवस्थेचं नाजूक स्वरूप आणि गरोदर महिलांतील अशक्तपणा या दोन गोष्टी महाराष्ट्रातील माता मृत्यूला सर्वांत जास्त कारणीभूत ठरतात.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle