मुंबई, 03 सप्टेंबर : आपण स्टार व्हावं, फिल्ममध्ये झळकावं असं स्वप्नं कुणाचं नसतं. दररोज कित्येक लोक हे स्वप्नं आपल्या उराशी बाळगून मुंबईत येतात. मात्र वरवर झगमगणाऱ्या या इंडस्ट्रीत किती स्ट्रगल करावं लागतं याची कल्पनाही कुणी केली नसेल. सध्या या इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर असलेला अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीने (Nawazuddin siddiqui) इंडस्ट्रीतील आपला स्ट्रगल मानला आहे. त्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्याचं इंडस्ट्रीतील स्वप्नंंही एक-दोन नव्हे कर तब्बल 20 वर्षांनी पूर्ण झालं आहे.
नवाजुद्दिन सिद्दीकीने ट्वीटरवर आपला इंडस्ट्रीतील स्ट्रगलचा अनुभव शेअर केला आहे. त्याचा खुजलीचा एक किस्सा एक त्याने सांगितला आहे. नवाझुद्दीनची ही खुजली म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांना भेटण्याचं स्वप्नं.
नवाजुद्दीन म्हणाला, "2000 साली 'कलकत्ता मेल'च्या शूटिंगदरम्यानची ही गोष्ट. अखेर एका सहाय्यक दिग्दर्शकाने मला प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी भेटवून देण्याचं आश्वासन दिलं. सहाय्यक दिग्दर्शकाने मला सेटवर बोलावलं, मात्र मी हात वर करेन तेव्हाच तू भेटायला ये असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार मी सेटवर पोहोचलो. मी दूर एका गर्दीत उभा होतो. कधी एकदा सहाय्यक दिग्दर्शक हात वर करतो आणि मी मिश्रा यांना भेटतो याची उत्सुकता मला होती. त्याचीच वाट मी पाहत होतो"
"जवळपास एका तासाने त्या सहाय्यक दिग्दर्शकाने हात वर केला. मी इतक्या गर्दीतून मार्ग काढत त्या सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत पोहोचलो. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं 'काय आहे?' मी म्हणालो, 'तुम्ही म्हणाला होता ना की हात वर केल्यावर ये. मी आलो'. मग तो सहाय्यक म्हणाला, 'अरे मला थोडी खाज आली होती म्हणून हात वर केला होता. तू पुन्हा तुझ्या जागेवर जा आणि मी हात वर करेन तेव्हाच ये' मी पुन्हा गर्दीत गेलो. आता हा सहाय्यक दिग्दर्शक हात खाजवण्यासाठी वर करतो की मला बोलावण्यासाठी याकडे माझे डोळे लागून राहिले होते"
"खूप वेळ मी वाट पाहिली मात्र ना त्या सहाय्यक दिग्दर्शकाचा हात वर झाला, नाही त्याला खाज आली. त्यानंतर ते आपल्या कामात व्यस्त झाले आणि मी नेहमीप्रमाणे मुंबईतल्या गर्दीत. या स्वप्नासह सहाय्यकाने आपले हात वर करून आपली खुजली तर घालवली मात्र सुधीर मिश्रांना भेटण्याच्या माझ्या खुजलीचं काय? ती आता 20 वर्षांनी मिटते आहे"
इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या लोकांना कसा स्ट्रगल करावा लागतो त्याचं हे नवाजुद्दीनने दिलेलं उत्तम असं उदाहरण आहे