निसर्गाचा प्रकोप होण्याची चिन्हं! हिमालयातला बर्फ वितळतोय; समोर आलं नवं कारण

निसर्गाचा प्रकोप होण्याची चिन्हं! हिमालयातला बर्फ वितळतोय; समोर आलं नवं कारण

आफ्रिका आणि आशिया खंडातल्या औद्योगिकीकरणामुळे उडणारी आणि हिमालयात जावून साठणारी धूळ हे निसर्गाच्या प्रकोपाचं नवं कारण ठरू शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : हिमनद्या वितळत आहेत त्यामागचं ग्लोबल वॉर्मिंग (Global warming) हे कारण आता सर्वज्ञात आहे. प्रदूषण, ग्रीन हाउस वायूंमुळे पृथ्वीचं तापमान वाढत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील आणि विशेषत: हिमालयातील बर्फ वितळत आहे ही गोष्ट आता जगाला माहीत आहे. पण हिमालयातला बर्फ वितळायला आणखी एक कारण असल्याचं संशोधकांनी शोधून काढलं आहे. त्यामुळे हिमालय वितळण्याचा वेग वाढला आहे आणि त्यातून नवीन संकटाला आपण आमंत्रित करत आहोत. बर्फ वितळण्याचा वेग कायम राहिला तर निसर्गाच प्रकोप कोणी रोखू शकणार नाही.

काय आहे नवं कारण?

आफ्रिका आणि आशिया खंडातील धूळ उडून हिमालयांतील शिखरांवर पडते आणि त्यामुळे हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांवरील बर्फ भराभर वितळत आहे, असं नवं संशोधन नेचर क्लायमेंट चेंज या ऑनलाइन लेखात प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे तापमानवाढीसोबतच ही नवी समस्या पुढे आली आहे.

अमेरिकेतील पर्यावरणतज्ज्ञ युन किआन आणि मद्रास आयआयटीतील तज्ज्ञ चंदन सारंगी यांनी एकत्रितपणे हा अभ्यास करून आपला निष्कर्ष मांडला आहे. सामान्यपणे पांढरा रंग सूर्यकिरण परावर्तित करतो त्यामुळे हिमालयातील बर्फ तितक्या वेगाने वितळत नाही. या परावर्तनाच्या परिणामालाच अल्बेडो इफेक्ट म्हणतात. पांढरा शुभ्र बर्फ असेल तर सूर्यप्रकाश अधिक परावर्तित होतो त्याला हाय अल्बेडो म्हणतात, तर धूळ जमलेल्या बर्फामुळे परावर्तन कमी होतं ते लो अल्बेडो इफेक्ट म्हणून ओळखलं जातं.

याच धुळीमुळे हिमालयातील शिखरांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचं परावर्तन होत नाही. धूळ सूर्यप्रकाश शोषून घेते त्यामुळे बर्फ वेगाने वितळतो, असं निरीक्षण या संशोधकांनी नोंदवलं आहे. या आधी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनेही हिमालयातील बर्फावर साठणाऱ्या धुळीबद्दल माहिती दिली होती.

Phys.org शी बोलताना किआन म्हणाले, ‘आशिया आणि आफ्रिकेतील धूळ शेकडो मैल प्रवास करून हिमालयातील उंचच उंच शिखरांवर पडते. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या हिमपर्वतातील बर्फाच्या चक्रावर या धुळीचा परिणाम होतो.’

धुळीचं कारण काय ?

प्रचंड प्रमाणात वाढलेलं औद्योगिकरण, शहरांतील सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती, ग्रामीण भागाचं होणारं शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड या सगळ्या कारणांमुळे धूळ निर्माण होत आहे. ही धूळच हिमालयातील शिखरांपर्यंत पोहोचत आहे. त्याचे दुष्परिणाम आता लक्षात येऊ लागले आहेत.

वृत्तांवर (Polar Caps) असलेलं बर्फ वितळत आहे  ही चिंतेची बाब आहे. निसर्गचक्रानुसारही बर्फ वितळतं त्या पाण्यामुळेच अग्नेय आशियातील सुमारे 70 कोटी नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होता. भारतातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि चीनमधील यांगत्झे आणि हुआंग हे या महत्त्वाच्या नद्या हिमालयातच उगम पावतात त्यांच्या पाण्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेती, वन्यजीवसृष्टी अवलंबून आहे.  त्यामुळे या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 7, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या