नासाला चंद्रावर आढळलं पाणी; मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा

नासाला चंद्रावर आढळलं पाणी; मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (Nasa)ने चंद्रावर पर्यायी स्वरूपात पाणी सापडल्याचा दावा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (Nasa)ने चंद्रावर पर्यायी स्वरूपात पाणी सापडल्याचा दावा केला आहे. सूर्याची किरणं पोहोचू शकणाऱ्या चंद्रावरील भागामध्ये हे पाणी आढळून आल्याचं नासाने म्हटलं आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा केवळ भविष्यात मानवाच्या चंद्रावरील मिशनला होणार नसून पिण्यासाठी आणि रॉकेट इंधन म्हणून देखील उपयोग होणार आहे. नासाच्या स्ट्रेटोस्फियर ऑब्झर्व्हेटरी फॉर इंफ्रारेड अ‍ॅस्ट्रॉनॉमी (सोफिया)ने या पाण्याचा शोध लावला आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठ्या खड्ड्यांपैकी एक असणाऱ्या क्लेवियस क्रेटरमध्ये पाण्याचे अणू असल्याचा सोफियाने शोध लावला आहे. याआधी झालेल्या संशोधनात चंद्रावर हायड्रोजनचे काही घटक आढळून आले होते. पण तिथं हायड्रॉक्सिलचा शोध लावला नव्हता. याविषयी बोलताना वॉशिंग्टनमधील नासाच्या मुख्यालयातील विज्ञान मिशन संचालनालयामध्ये अस्ट्रोफिजिक्स विभागातील निदेशक पॉल हर्ट्ज म्हणाले, ‘चंद्रावर ज्या भागात सूर्याची किरण पोहोचतात त्या भागात पाणी असल्याचा अंदाज आम्हाला आला होता.  त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला असता पाणी आढळून आले.’

मानवी वस्ती निर्मितीची नासाची योजना

नासाने आधीच 2024 मध्ये आर्टेमिस योजनेच्या माध्यमातून चंद्रावर माणूस पाठवण्याची योजना तयार केली आहे. या माध्यमातून चंद्रावर माणसाच्या हालचाली वाढवण्याचा नासाचा मानस आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेला माणूस चंद्रावरील आजपर्यंत कुणीही पोहोचू न शकलेल्या ठिकाणांचा शोध घेऊ शकेल तसंच जिथे माणूस या आधी पोहोचला त्या ठिकाणचा अधिक अभ्यास करू शकेल.

नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अंकातील अभ्यासानुसार, या स्थानावरील डेटामध्ये दर दशलक्ष एकाग्रतेच्या क्षेत्रात 100 ते 412 भाग इतकं पाणी दिसून आले. त्या तुलनेत चंद्राच्या पृष्ठभागावर सोफियाने जितके पाणी शोधले आहे ते आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातील पाण्याच्या प्रमाणापेक्षा 100 पट कमी आहे. अल्प प्रमाणात असूनही, या शोधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते हा सर्वात मोठा प्रश्न तयार होत आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे चंद्राच्या कठीण आणि हवारहित वातावरणात पाणी कसं टिकून राहतं हा आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 27, 2020, 4:32 PM IST
Tags: science

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading