मुंबई, 15 सप्टेंबर : मुंबईत राहणाऱ्या 55 वर्षांच्या रेखा सिंह (नाव बदललेलं) यांना गेल्या काही आठवड्यांपासून पोटदुखीचा (stomach) त्रास जाणवत होता. खाल्ल्यानंतर अॅसिडिटी (acidity) होत असल्याने त्यांना अस्वस्थपणा वाटत होता. मात्र कोविड-19 मुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात न जाता त्यांनी घरगुती उपचार करणं पसंत केलं. पोटात वेदना जाणवत असल्याने वेदनाशामक औषधही त्या घेत होत्या. मात्र वेदना असह्य होऊ लागल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी त्यांना पोटाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. या सोनोग्राफी अहवालात त्यांच्या पित्ताशयात खडे (gallbladder stone) असल्याचं निदान झालं.
साधारणतः आठवडाभर या महिलेवर घरीच औषधोपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस ओटीपोटात तीव्र वेदना, ताप, उलट्या होणं आणि रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना तातडीने कांदिवली येथील नामहा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत त्यांच्या पित्ताशयात फक्त 5 ते 6 खडे होते. मात्र उपचारासाठी उशिरा आल्याने हे खडे फुटून पोटाच्या उजव्या भागात संसर्ग झाला. तिला सेप्टीसीमियाही (संसर्ग रक्तात पसरणे) झाला.
अशा स्थितीत गुतांगुत वाढल्याने शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. मात्र डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून महिलेच्या पित्ताशयातून हे खडे काढले आहे. कांदिवलीतील नामहा रुग्णालयात या महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णालयातील लॅप्रोस्कोपिक आणि बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं, "सामान्य परिस्थितीत पित्ताशयात दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक) शस्त्रक्रिया करण्यास एक तासापेक्षा कमी वेळ लागतो आणि रुग्णाला फक्त 48 ते 72 तास रुग्णालयात ठेवलं जातं. मात्र या प्रकरणात समस्येचं निदान उशिरा झालं होतं. त्यामुळे गुतांगुत जास्त वाढली होती. शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि अवघड होती. मात्र आम्ही हे आव्हान स्वीकारून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
हे वाचा - काय म्हणताय! व्हायरसपासून फक्त बचाव नाही तर इम्युनिटीदेखील वाढवू शकतो MASK
शस्त्रक्रियेनंतर या महिलेला आठवडाभरानंतर घरी सोडण्यात आलं. आता या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तीव्र वेदनेतूनही सुटका झाली आहे.
रुग्ण रेखा सिंह म्हणाल्या की, "कोविड-19 या आजाराचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे आम्ही रुग्णालयात जाणं टाळत होतो आणि घरगुती उपचार करत होतो. वेळीच निदान न झाल्यास अशाप्रकारची गुंतागुंत निर्माण होऊन इतका संसर्ग होऊ शकेल, असं आम्हालाही वाटलंही नव्हतं. मात्र डॉक्टरांनी माझ्यावर योग्य ते उपचार करून मला बरं गेलं, यासाठी मी त्यांचे आभारी आहे"
हे वाचा - शंखनाद, चिखलामुळे वाढते इम्युनिटी; दावा करणारा भाजप खासदारच आता कोरोना संक्रमित
मुळात पित्ताशयाचा त्रास होत असूनही काही लोक हे दुखणं अंगावर काढतात. वेळीच निदान आणि उपचार न मिळाल्याने त्रास वाढतो. त्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे येतो, अशावेळी उपचार करणं डॉक्टरांनाही कठीण जातं. त्यामुळे कुठलाही त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे", असा सल्ला डॉ. अपर्णा यांनी दिला.